दुष्काळात शेतकर्याला ज्वारीचा आधार
दुष्काळात शेतकर्याला ज्वारीचा आधार
टेक्सास (अमेरिका) येथील कृषी शास्त्रज्ञांचा अभ्यास
“यंदा सरासरीच्या तुलनेत खूप कमी पाऊस झाला. खरीप हंगाम शेतकर्याच्या हातून गेला. अशा स्थितीत रबी हंगामासाठी कमी पाण्यात येणार्या इतर कोणत्याही पिकापेक्षा ज्वारी हेच पीक घेणे अधिक संयुक्तिक ठरणार आहे. कारण कमी पाण्यात येणार्या विविध पिकांच्या तुलनेत ज्वारी हे पीक अधिक ताण सहन करू शकणारे आहे. किंबहुना त्यातून मिळणारे उत्पन्न हे कोरडवाहू क्षेत्रात येणार्या उत्पन्नाच्या दुप्पटीने अधिक असू शकते, असा दावा अमेरिकेत नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून करण्यात आला आहे. या अभ्यासातील काही ठळक बाबी ‘वनराई’च्या वाचकांसाठी प्रसिद्ध करीत आहोत...”
महाराष्ट्राप्रमाणेच अमेरिकेतील टेक्सास प्रांतात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळ पडत आहे. जमिनीतील पाण्याची पातळी प्रचंड खालावली असून, अनेक जलस्रोत कोरडे झाले आहेत. परिणामी, या भागातील मका उत्पादक अनेक शेतकरी ‘ज्वारी’ पिकाकडे वळत आहेत. मक्याच्या तुलनेमध्ये ज्वारी हे पीक अधिक ताण सहनशील असून, त्यातून कमी पाण्यामध्ये बर्यापैकी उत्पादन मिळवणे शक्य होते. म्हणूनच, कमीत कमी पाण्यावर ज्वारीचे अधिकाधिक उत्पादन मिळविण्यासाठी अमेरिकेतील कृषी संशोधक अभ्यास करत आहेत आणि या अभ्यासातील निष्कर्षाच्या आधारे शेतकर्यांना मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुळे पाण्याची कमतरता असतानाही ज्वारी उत्पादक शेतकर्यांना ज्वारीचे अधिक उत्पादन घेणे शक्य होणार आहे.
काय आहे हा अभ्यास?
- अमेरिकेतील ‘अॅग्रिकल्चर रीसर्च सर्व्हिस’ या संस्थेतील माती व जलव्यवस्थापन विभागात कार्यरत असलेल्या कृषी अभियंत्या ‘सुझान ओ शाऊघ्नेस्सी’ आणि त्यांच्या सहकार्यांनी ज्वारी पिकासाठी लागणारे पाणी आणि मिळणार्या उत्पादनाचा अभ्यास केला आहे.
- लवकर पक्व होणार्या आणि उशिरा पक्व होणार्या ज्वारीच्या वाणांसाठी एकूण किती पाणी लागते आणि त्यापासून किती उत्पादन मिळते, यांचा तुलनात्मक अभ्यास सुझान आणि त्यांच्या सहकार्यांनी केला.
- या प्रयोगामध्ये खरीप, रबी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामात लवकर पक्व होणार्या आणि उशिरा पक्व होणार्या अशा दोन्ही प्रकारच्या वाणांची लागवड करण्यात आली.
- मे महिन्याच्या शेवटच्या आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उशिरा पक्व होणार्या ज्वारीच्या वाणांची लागवड केली, तर लवकर पक्व होणार्या ज्वारीच्या वाणांची लागवड जून महिन्याच्या शेवटच्या काळात केली. मात्र या दोन्ही प्रकारच्या पिकांची काढणी एकाच वेळी कशी होईल, याचीही काळजी सुझान आणि त्यांच्या सहकार्यांनी घेतली.
- तिन्ही हंगामातील हवामानाची माहिती, पावसाचे प्रमाण आणि बाष्पोत्सर्जनाचा दर याबाबतच्या नोंदी ठेवल्या. यातून तिन्ही हंगामातील पिकांना नेमके किती पाणी लागते, याविषयीची माहिती जमा झाली.
- हा प्रयोग सन 2009 ते 2011 या कालावधीत करण्यात आला. या तीन वर्षांच्या कालावधीतील 2009 व 2010 या वर्षांमध्ये सरासरीपेक्षा (अनुक्रमे 7.5 टक्के आणि 35 टक्के) अधिक पाऊस झाला, तर 2011 मध्ये सरासरीपेक्षा (71 टक्के) कमी पाऊस झाला.
अभ्यासाचे निष्कर्ष काय सांगतात?
- लवकर पक्व होणार्या आणि उशिरा पक्व होणार्या अशा दोन्ही प्रकारच्या वाणांच्या ज्वारी पिकासाठी जेवढे पाणी लागते, त्याच्या केवळ 55 टक्के पाणी मिळाले, तरी चांगले उत्पादन मिळते.
- दोन्ही प्रकारच्या ज्वारीच्या वाणांसाठी जेवढे पाणी लागते, त्याच्या केवळ 30 टक्के पाणी दिल्यानंतरही त्या पिकांपासून मिळालेले उत्पादन कोरडवाहू क्षेत्रातील पिकांपासून मिळणार्या उत्पादनाच्या दुप्पटीहून अधिक असल्याचे दिसून आले. म्हणजेच या पिकांची पाणी वापर कार्यक्षमताही वाढलेली आढळली.
- दोन्ही प्रकारच्या ज्वारीच्या वाणांसाठी जेवढे पाणी लागते त्याच्या 80 टक्के पाणी दिल्यानंतर लवकर पक्व होणार्या वाणाच्या तुलनेत उशिरा पक्व होणार्या वाणापासून अधिक उत्पादन मिळू शकले.
- दुष्काळी स्थितीत मात्र उशिरा पक्व होणार्या वाणापेक्षा लवकर पक्व होणार्या ज्वारीच्या वाणापासून समाधानकारक उत्पादन मिळू शकले.
- दुष्काळी स्थितीमध्ये ज्वारी उत्पादकांनाही मोठा फटका बसतो. त्यांच्या पिकाचे संपूर्ण नुकसान होते. मात्र, संरक्षित पाण्याची सोय केल्यास त्यांना हा फटका बसणार नाही. पिकांच्या संवेदनशील अवस्था ओळखून सिंचनाचे नियोजन केले पाहिजे.
- या अभ्यासाचे निष्कर्ष अनियमित पाऊस, सातत्याने बदलणारे तापमान आणि तीव्र हवामान स्थिती (गारपीट, पूर) अशा स्थितीतही चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकर्यांना उपयोगी ठरू शकतात.
- पाण्याचा योग्यरीत्या वापर केल्यास पिकांना पाण्याच्या चार पाळ्या कमी दिल्या, तरी चांगले उत्पादन मिळू शकते, हे या प्रयोगातून दिसून आले आहेे.
- सुझान आणि त्यांचे सहकारी टेक्सास प्रांतातील शेतकर्यांना कार्यक्षम पाणी वापराविषयी मार्गदर्शन करीत आहेत. त्याचा फायदा शेतकर्यांना होत आहे.
(स्रोत ः अॅगरीसर्च मॅगझिन- जुलै 2015)
स्त्रोत: वनराई
अंतिम सुधारित : 8/16/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.