अति थंडी, तसेच धुके पडल्यास मुगा रेशीम अळ्यांना बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यातून मोठ्या संख्येने अळ्यांची मरतूक होते. रेशीम व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे यामुळे खूप आर्थिक नुकसान होते. हे नुकसान कमी करण्यासंदर्भात आसाममधील सेंट्रल मुगा, एरी रिसर्च ऍण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी संशोधनातून "बिव्हेरिया बॅसियाना' या मित्रबुरशीचा वापर करून बुरशीनाशक तयार केले आहे. या बुरशीनाशकात असलेल्या मित्र बुरशीमुळे अळ्यांना हानिकारक बुरशीचा नायनाट होतो. या बुरशीनाशकाची अळ्यांवर धुरळणी केल्याने त्यांच्यावर एकप्रकारे संरक्षण कवच तयार होते, त्यामुळे रोगांपासून चांगल्याप्रकारे संरक्षण होत असल्याचे संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ के. दास यांनी सांगितले.
आसाममधील जोऱ्हाट जिल्ह्यातील लाहडोईगड येथे सेंट्रल मुगा, एरी रिसर्च ऍण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कार्यरत आहे. या राज्यात मुगा रेशमाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या रासायनिक बुरशीनाशकाला याच गावाच्या नावावरून "लाहडोई' असे नाव दिले आहे. संस्थेने या संशोधनासंदर्भात दिल्लीस्थित राष्ट्रीय संशोधन विकास मंडळाकडून पेटंटही मिळविले आहे. संस्थेने उत्पादित केलेल्या या बुरशीनाशकाचे विपणन स्वतः संस्थेकडून केले जात आहे.
हिवाळ्यात बुरशी झपाट्याने वाढते. कमी तापमान व धुके या दोन बाबी बुरशी वाढण्यास कारणीभूत असतात. या कालावधीत अंडीपुंजातून निघालेल्या अळ्यांना बुरशीजन्य रोग होतात. दरवर्षी हिवाळ्यात ही समस्या जाणवते. आसाममध्ये गेल्या वर्षी व चालू वर्षी शिवसागर आणि लखीमपूर जिल्ह्यांत बुरशीजन्य रोगाने बाधित रेशीम अळ्यांचा नायनाट करावा लागला. ही समस्या लक्षात घेऊन बुरशीचा नायनाट करणारे लाहडोई हे बुरशीनाशक संस्थेने तयार केले आहे. मुगा रेशीम अळ्या या वातावरणाला अतिशय संवेदनशील असतात. वातावरणातील विविध घटकांद्वारे उदा.: पक्षी, किडी किंवा माश्यांमुळेदेखील बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, पाणी किंवा हवेद्वारे होणारा बुरशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी हे बुरशीनाशक प्रभावीपणे काम करत असल्याचे दास यांनी सांगितले.
याबाबत संस्थेच्या शास्त्रज्ञा रंजना दास यांनी सांगितले, की पावडर स्वरूपात असलेल्या या बुरशीनाशकाचा वापर त्यात पाणी मिसळून फवारणीसाठी देखील करता येऊ शकतो. मुगा रेशीम अळ्यांना सोम झाडांचा पाला खाद्य म्हणून दिला जातो. या पानांद्वारे वातावरणातील काही घटकांमार्फत अळ्यांना बुरशीजन्य रोगांची बाधा होऊ शकते, त्याचा प्रतिबंध करण्यासाठी या बुरशीनाशकाची फवारणी झाडाच्या पानांवर व फांद्यावरदेखील करणे गरजेचे आहे, तसेच जमिनीतून आळवणी पद्धतीने दिल्यानेही चांगला फायदा होतो आळवणी करावयाची असल्यास रेशीम अळ्यांची प्रौढावस्था येईपर्यंत दर 15 दिवसांच्या अंतराने द्रावण सोम झाडांना जमिनीतून द्यावे. फवारणीतून पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्यांचा जसे कॅल्शिअम, मॅंगेनिज यांचादेखील पुरवठा होतो. पाल्यातून अळ्यांनाही हे सर्व घटक मिळतात. मुगा रेशीम व्यवसाय करणारे शेतकरी बेणू फुकण याबाबत म्हणाले, की लाहडोई बुरशीनाशकाच्या फवारणीमुळे बुरशीजन्य रोगांचे चांगले नियंत्रण मिळाले; तसेच पिकाचे होणारे नुकसानदेखील कमी झाले आहे.
शास्त्रज्ञांच्या संपर्कासाठी -
प्रा. रंजना दास, 09435357210
सेंट्रल मुगा, एरी रिसर्च ऍण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, लाहडोईगड, जोऱ्हाट, आसाम
शास्त्रज्ञ के. दास यांच्या म्हणण्यानुसार, मागणीच्या तुलनेत रेशीम अंडीपुंजांचा पुरवठा अपुरा पडतो. त्यामुळे रेशीम व्यवसायाचा विकास झपाट्याने होत नसल्याचे दिसत आहे. मुगा रेशीमसंदर्भात संशोधन करणारी ही देशात एकमेव संस्था असल्याने देशाची अंडीपुंजांची मागणी पूर्ण करण्यात कमतरता जाणवते. त्यामुळे येत्या काळात संस्थेची कार्यक्षमता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
मुगा रेशीम उद्योगात रेशीम अळ्यांना सोम, सोलू झाडांचा पाला खाद्य म्हणून दिला जातो. या अळ्यांपासून जे रेशीम मिळते त्याला मुगा रेशीम असे म्हणतात. या रेशीम धाग्याचा रंग निसर्गतःच सोनेरी असतो. हा धागा मजबूत व टिकाऊ असतो. धागा अल्ट्रा व्हायोलेटविरोधी असतो. या धाग्याला निर्यातीत मोठी संधी आहे. कापड उद्योगांना भरपूर पैसा मिळवून देण्याची ताकद या धाग्यात आहे. भारतात फक्त आसाममध्ये मुगा रेशमाचे उत्पादन घेतले जाते. जागतिक स्तरावर भारत हा मुगा रेशमाचे उत्पादन घेणारा एकमेव देश आहे.
--------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
अॅडिसन रोग : (बाह्यकज-प्रवर्तक-न्यूनता). अधिवृक्क...
अमिबिक यकृत फोड हा आंतड्यातील परजीवी एन्टामिबा हिस...
डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरिय...