অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आंब्याचे मोहोर संरक्षण

आंब्याचे मोहोर संरक्षण


आंब्याची फुले १० ते ४० सेंटीमीटर लांबीच्या गुच्छामध्ये येतात. प्रत्येक फुलाला पाच पाकळ्या असून त्यांची लांबी साधारणपणे ५ ते १० मिलीमीटर एवढी असते. आंब्याच्या फुलांना मोहोर असे म्हणतात. मोहोराला एक प्रकारचा मंद सुवास असतो.

जर पाऊस नियमित पावसाळा सोडून नोव्हेंबरमध्ये देखील पडत राहिला, तर आंब्याची मोहोर येण्याची प्रक्रिया रखडते, त्यामुळे आंब्याला मोहोर उशिरा येतो. काही वेळा आपल्याला असे दिसून येते, की ऐन पावसाळ्यात म्हणजे जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात ज्या वेळी भरपूर पाऊस सतत पडणे अपेक्षित असते, त्या वेळी जर मोठा खंड पडला म्हणजे पाऊस न पडता 15 ते 20 दिवस जर सतत ऊन पडले, तर अशा वेळेला या बागेमध्ये आंब्याला मोहोर यायला सुरवात होते. विशेषतः समुद्रानजीकच्या आंबा बागेमध्ये मोहोर अवकाळी येण्याची उदाहरणे याच कारणामुळे आढळतात. पाण्याचा ताण म्हणूनच महत्त्वाचा आहे. पावसाळ्यानंतर आंब्याच्या झाडाला सतत पाणी मिळत गेले, तर अशा आंब्याच्या झाडाला मोहोर उशिरा येण्याची दाट शक्‍यता असते. आंब्याच्या उत्पादनात मोहोर संरक्षणाला विशेष महत्त्व आहे. प्रमुख व दुय्य्म पोषण प्राण्यांची कामतरता, संजीवकांचा अभाव, योग्य पाणी व्यवस्थापन नासणे आणि किडी – रोगांचा प्रादुर्भाव आदि कारणांमुळे मोहोर आणि फलगळ होते.

तुडतुडे

हे कीटक पाचरीच्या आकाराचे असतात. रंग भुरकट असून, डोक्‍यावर तांबड्या रंगाचे तीन ठिपके असतात. हे कीटक अत्यंत चपळ असून, त्यांची चाल तिरपी असते. मादी हिवाळ्यात फुले व पाने यांच्या शिरांत अंडी घालावयास सुरवात करते. या अंड्यांतून आठ ते दहा दिवसांत पिल्ले बाहेर पडून रस शोषण करावयास लागतात. त्यांची संपूर्ण वाढ 15 ते 20 दिवसांत होते आणि त्यापासून प्रौढ तुडतुडे तयार होतात. या किडींची पिल्ले आणि प्रौढ कोवळ्या पानांतील व मोहोरातील रस शोषून घेतात, त्यामुळे मोहोर सुकून गळून पडतो. त्याशिवाय तुडतुडे मधासारखा चिकट पदार्थ शरीरावाटे बाहेर टाकतात. तो पानांवर पडून नंतर त्यावर काळी बुरशी वाढते, त्यामुळे झाडे, फळे काळी पडतात.

तुडतुडे वर्षभर झाडावर असल्यामुळे आंब्याच्या झाडाला मोहोर येण्यापूर्वी शिफारशीत कीडनाशकांचा वापर करावा, तसेच व्हर्टिसीलियम लेकॅनी या बुरशीजन्य कीटकनाशकाचा वापर करावा.

मिजमाशी

मोहोर तसेच पालवी फुटताच कोवळ्या दांडयामध्ये अंडी घालते, दोन ते तीन दिवसांत अंडी उबून आळी मोहोरच्या देठातील आतील भाग खाते, त्या ठिकाणी सुरवातीस लहान गाठ आल्याप्रमाणे दिसते. प्रादुर्भित मोहोर वाकडा झालेला दिसून येतो. कोवळ्या पालवीवर प्रादुर्भाव झाल्यास पाने काळी पडून गळून जातात.

भुरी

या रोगामुळे मोहोरचा देठ, फुले आणि लहान फळे यावर सूक्ष्म बुरशीची वाढ होते, त्यामुळे प्रादुर्भित भाग पांढरट, भुरकट दिसतो. रोगाचा प्रसार वार्याोमुळे होतो. फुले व लहान फळे गळून पडतात आणि फलधारणेवर अनिष्ट परिणाम होतो.दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विध्यापीठाने किडनाशक फवारणीचे वेळापत्रक तयार केले आहे. त्याची मदत घेऊन किडी – रोग नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

करपा


या रोगाच्या प्रादुर्भावाची विविध लक्षणे म्हणजे डहाळ्या वाळणे, फांद्यांचे शेंडे झडणे, मोहोर करपणे, पाने करपणे ही आहेत. पानांवर 20 ते 25 मि.मी. व्यासाचे अंडाकृती किंवा अनियमित वेडेवाकडे फिकट विटकरी किंवा गडद विटकरी ठिपके पडतात. आर्द्र वातावरणात बुरशीची वाढ जलद होते. रोगाचा प्रादुर्भाव जुन्या पानांपेक्षा नवीन पानांवर जास्त होतो. पानांची रोगग्रस्त देठे काळी पडतात, पाने खाली वाकतात, वाळतात, शेवटी गळून पडतात. पानगळ झालेल्या ठिकाणी काळे व्रण निर्माण होतात. रोगग्रस्त फांद्यांवर काळे ठिपके पडतात, फांद्यांचे शेंडे वरून वाळण्यास सुरवात होते. शेंडे झडल्याचे लक्षण दिसून येते. मोहरामध्ये फुलांच्या देठांवर काळसर विटकरी काळे डाग पडतात. उमललेल्या फुलांवरही छोटे काळे डाग पडतात. हे डाग मोठे होतात. नंतर मोहोर वाळतो. फळांवर सुरवातीस हे डाग गोल असतात; परंतु नंतर डागांचे एकत्रीकरण होते, मोठे अनियमित डाग तयार होतात. काही वेळा डागांमुळे संपूर्ण फळ पडते. डागांवर खोल चिरा निर्माण होतात. बुरशी फळात खोल शिरते व फळे नासतात.

 

 

अंतिम सुधारित : 5/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate