जांभळाची अधिक उत्पादन देणारी जात
जांभूळ लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर 90 सें.मी. x 90 सें.मी. x 90 सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. हे खड्डे माती व दोन घमेली चांगले कुजलेले शेणखत, शिफारशीत कीडनाशक भुकटी, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेटच्या मिश्रणाने एप्रिल - मे महिन्यांत भरून घ्यावेत.
चांगला पाऊस झाल्यावर कोकण बहाडोली या जातीच्या कलमांची लागवड करावी. कलमाची लागवड केल्यावर त्याला काठीचा आधार द्यावा. आळ्यात आच्छादन करावे. कोकण बहाडोली जातीची फळे मोठी (23.4 ग्रॅम वजन) आहेत.
फळांचा रंग गर्द जांभळा असून फळे चार दिवस चांगली टिकतात. फळांचे उत्पादनही चांगले मिळते. झाडाच्या गरजेनुसार पाणी द्यावे.
दरवर्षी पावसाळ्याच्या सुरवातीला एक घमेले शेणखत द्यावे. पूर्ण वाढ झालेल्या पाच वर्षांच्या झाडास पाच घमेली चांगले कुजलेले शेणखत, एक किलो युरिया, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश आळ्यात मिसळून द्यावे. कलमांची भटक्या जनावरांपासून काळजी घ्यावी. लागवडीपासून सातव्या वर्षी उत्पादन सुरू होते.
लेखक- बाळासाहेब देशमुख, कळवण, जि. नाशिक
संपर्क - 02426- 243861
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी