फलधारणा झाल्यानंतर सुमारे 140 दिवसांनी कोकमाची फळे काढणीसाठी तयार होतात. कोकमाची फळे ही काढणीसाठी एप्रिल - मे महिन्यापासून पुढे तयार होऊन बऱ्याचदा पावसात सापडतात. हे लक्षात घेऊन विद्यापीठाने कोकमाची फळे लवकर तयार होण्यासाठी संशोधन केले आहे.
कोकम हे कोकणामध्ये अत्यंत महत्त्वाचे; पण आंबा, काजूच्या तुलनेत दुर्लक्षित पीक आहे. कोकम फळापासून केले जाणारे कोकम सरबत, आगळ, आमसुले हे मूल्यवर्धित पदार्थ संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. कोकम हे हृदय विकारावर, लठ्ठपणावर व आम्लतेवर अत्यंत गुणकारी समजले जाते. कोकमाच्या सालीपासून मूल्यवर्धित पदार्थ तर होतातच; पण कोकमाच्या बीपासून तेल देखील मिळते. हे तेल सर्वसामान्य तापमानात घन राहते आणि या तेलाचा वापर औषधात व अनेक औषधी प्रसाधनांत केला जातो.
कोकमामध्ये नर आणि मादी अशा दोन प्रकारची झाडे आढळतात. कोकमाच्या मादी झाडांनाच फुले व फळे लागतात, तर नर झाडांना फक्त फुले लागतात. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकमाच्या "कोकम अमृता' व "कोकम हातिस' या सुधारित जाती विकसित केल्या आहेत. या दोन्ही जातींपासून उत्पन्न जास्त मिळते. फळे मध्यम ते मोठी असल्याने प्रक्रिया उद्योगासाठी चांगली आहेत.
कोकमाच्या झाडाला जून झालेल्या फांदीला नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात फुले लागतात. कळीपासून फुले उमलण्याचा कालावधी व त्यानंतर फलधारणा यासाठी सुमारे महिन्याभराचा कालावधी लागतो. फलधारणा झाल्यानंतर सुमारे 140 दिवसांनी कोकमाची फळे काढणीसाठी तयार होतात.
कोकमाची फळे ही काढणीसाठी एप्रिल - मे महिन्यापासून पुढे तयार होतात व बऱ्याचदा पावसात सापडतात. कोकमाची फळे लवकर तयार होण्याबाबत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन केले आहे. कोकमाची फलधारणा ज्यावेळेस होते (जानेवारी ते फेब्रुवारी), त्यावेळेस तीन टक्के पोटॅशियम नायट्रेटची (13ः0ः45) फवारणी करावी. पुन्हा ही फवारणी 20 दिवसांनंतर करावी. या फवारणीमुळे कोकमाची फळे झाडावर लवकर पिकतात, त्याचबरोबरीने झाडाचे उत्पन्न देखील वाढते. फळांची प्रत देखील सुधारते.
कोकमाच्या पूर्ण वाढलेल्या एका मादी झाडापासून किमान 30 ते 50 किलो फळांचे उत्पादन मिळेल. कोकमाच्या बाबतीत हंगामाच्या सुरवातीला फळांचा दर जास्त म्हणजे 10 ते 15 रुपये प्रति किलो असतो. जसा हंगाम वाढत जातो, तसा तो कमी कमी होत जातो. पावसाच्या नंतर तर नगण्य किमतीला कोकम फळे विकली जातात. हे लक्षात घेऊन फळे कशा पद्धतीने लवकर पिकतील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
संपर्क - 9421809721
(लेखक उद्यानविद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी येथे कार्यरत आहेत.)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
आंब्याची फुले १० ते ४० सेंटीमीटर लांबीच्या गुच्छाम...
भारतात ह्या वंशातील एकूण १४ जाती असून त्यांपैकी ३-...
या विभागात अंजीर या फळ पिकाविषयी माहिती दिली आहे.
या विभागात आंब्याच्या झाडाला अनियमित फळे का येतात...