त्रिपुरा राज्यामध्ये अननस, फणस, पपई, केळी, आंबा आणि लिचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्रिपुरामध्ये दरवर्षी या फळांचे उत्पादन सुमारे पाच लाख टनांपर्यंत पोचले आहे, त्यापैकी 2,14,000 टन फळे राज्यात विकली जातात. उर्वरित फळे पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यात फळे विक्रीसाठी पाठविली जातात. या फळांमध्ये त्रिपुरातील अननसाला गुणवत्तेमुळे परराज्यात चांगली मागणी आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील फलोद्यान विभागाने हिवाळी हंगामातही अननसाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
याबाबत फलोद्यान विभागातील तज्ज्ञ सुजीत साहा याबाबत माहिती देताना म्हणाले, की हिवाळ्यात फळधारणा होण्यासाठी आम्ही तज्ज्ञांच्या शिफारसीनुसार विशिष्ट रसायनांचा वापर केला. गेल्यावर्षी हिवाळ्यात फळांचे उत्पादन घेण्यासाठी 30 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली होती. या लागवडीमध्ये पीक उत्पादनवाढीच्या दृष्टीने विविध प्रयोग घेण्यात आले. त्यातून योग्य पद्धतीची निवड करण्यात आली. गेल्या वर्षी तसेच यंदाच्या वर्षीही पश्चिम त्रिपुरामधील फिरोझ मिया यांच्या एक हेक्टर क्षेत्रावर आम्ही अननसाची लागवड केली होती. अननस लागवडीसंदर्भात उद्यानविद्या विभागाने या शेतकऱ्याला तांत्रिक मार्गदर्शन केले होते. यंदाच्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरू झालेल्या हंगामात त्यांना 5000 फळांचे उत्पादन मिळणार आहे. या फळांच्या विक्रीपासून त्यांना सुमारे 1,50,000 रुपये मिळतील.
हिवाळ्यातील अननस उत्पादनाबाबत फिरोझ मिया म्हणाले, की पहिल्यांदा हिवाळ्यात अननसाच्या फळांचे उत्पादन घेण्याबाबत मी साशंक होतो, परंतु फलोद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी मला लागवड आणि पीक व्यवस्थापनाबाबत तांत्रिक मार्दर्शन केले, तसेच रोपांच्या खरेदीसाठी अनुदानही दिले. त्यामुळे मी अननसाचे दर्जेदार उत्पादन घेऊ शकलो. हिवाळी हंगामात अननसाला चांगले दर असल्याने या लागवडीतून मला चांगला नफा मिळेल अशी आशा वाटते.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
द्राक्षास सर्वाधिक दर मुंबई बाजारपेठेत डिसेंबरमध्य...
जमिनीत वाढणाऱ्या खोडाच्या टोकास सु. १मी. लांब, बिन...
मध्यम, ओलावा टिकवून ठेवणारी; परंतु पाण्याचा निचरा ...
या विभागात अंजीर या फळ पिकाविषयी माहिती दिली आहे.