অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्ट्रॉबेरी उत्पादनवाढीसाठी अन्नद्रव्य,पाणी व्यवस्थापन

शेतात स्ट्रॉबेरीच्या रोपांची गादीवाफ्यावर पुनर्लागण झालेली आहे. काही ठिकाणी स्ट्रॉबेरीचे पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे, तर काही ठिकाणी पीक पहिल्या बहारात आहे. अशा अवस्थेत स्ट्रॉबेरी झाडाची अन्नद्रव्य व पाण्याची गरज खूप वाढलेली असते. स्ट्रॉबेरी पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, योग्य पाणी व्यवस्थापन व आच्छादन हे घटकसुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.

 

खत व्यवस्थापन

स्ट्रॉबेरीच्या झाडांना योग्य प्रमाणात खते देणे गरजेचे असते. 
- खतांची मात्रा कमी पडल्यास, झाडाच्या वाढीवर, फूल व फळ धारणेसह एकूण उत्पादनावर विपरीत परिणाम दिसून येतो. रोपे कमकुवत राहिल्यामुळे विविध रोग, किडींना लवकर बळी पडतात. 
- गरजेपेक्षा जास्त प्रमाणात खते दिल्यास झाडांची शाखीय वाढ जास्त होते. पानांवरील रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. हिवाळ्यात थंडीमुळे पानांना जास्त इजा होते. त्यामुळे स्ट्रॉबेरीच्या झाडांना जमिनीचा मगदूर व कोणत्या जातीची लागवड केलेली आहे, याचा विचार करून खते द्यावीत. 
- सर्वसाधारणपणे स्ट्रॉबेरी पिकास प्रति हेक्‍टरी 40 ते 50 टन चांगले कुजलेले शेणखत व नत्र (N) 120 किलो, स्फुरद (P2O5) 100 किलो व पालाश (K2O) 75 किलो द्यावे. गादीवाफ्यावर रोप लावणीपूर्वी स्फुरद व पालाश एकत्र मातीत मिसळावे. नत्राचा हप्ता दोन किंवा तीन समान हप्त्यांत विभागून द्यावा. गादीवाफ्यावर रोप लावणीच्या वेळी (60 किलो/ हे.) व फुलधारणेच्या वेळी (60 किलो/ हे.) देण्याची शिफारस आहे.

विद्राव्य खते

ठिबक सिंचनाद्वारा स्ट्रॉबेरी पिकास विद्राव्य खतांची मात्रा देता येते. रोपाच्या चांगल्या वाढीच्या अवस्थेपर्यंत 19ः19ः19 या विद्राव्य खताची मात्रा ठिबकद्वारा 1 दिवसाच्या अंतराने एकरी 2.5 ते 3 किलो तसेच पिकाच्या फूल कळीच्या अवस्थेत साधारणतः 40 ते 45 दिवसानंतर 0ः52ः34 खत 1 दिवसाच्या अंतराने एकरी 3 ते 4 किलो दिल्यास उत्पादनात वाढ होते. तसेच ही खते 4 ते 5 ग्रॅम/ लि. गरजेनुसार फवारणी करावी.

सूक्ष्म अन्नद्रव्ये

पिकाच्या गरजेनुसार किंवा रोपांवरील लक्षणानुसार सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावीत. साधारणतः स्ट्रॉबेरी पिकास बोरॉन, मॅग्नेशियम, सल्फर, कॅल्शियम आणि लोहाची कमतरता भासते. ही सूक्ष्म अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाप्रमाणे द्यावीत.

आंतरमशागत व आच्छादन

  • लागवडीनंतर 2-3 दिवसांनी रोपाच्या सभोवतालची माती हाताने दाबावी. सुरवातीला (कोंबातील) माती अलगदपणे काढून टाकावी.
  • गरजेनुसार रोपांची जुनी व रोगट पाने काढून टाकावीत. मात्र रोपास 14 ते 15 पाने राहतील, याची काळजी घ्यावी.
  • लहान आणि अकाली येणारी फुले काढावीत. फळांचा आकार मोठा होण्यासाठी लहान आकाराची फुले काढून टाकावीत.

आच्छादन घालणे

लागवडीनंतर 30 दिवसांनी गादीवाफ्याची चांगल्याप्रकारे खुरपणी करून गादी वाफ्यावर काळ्या किंवा चंदेरी रंगाचे कागदाचे (50 मायक्रॉन) आच्छादन घालावे. स्पेन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया व अमेरिकेतील फ्लोरिडा व कॅलिफोर्निया येथे स्ट्रॉबेरी पिकात आच्छादनाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

आच्छादनामुळे होणारे फायदे

  • जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
  • फळांचा मातीशी येणारा संपर्क टाळता येतो व फळकूज रोखण्यास मदत होते.
  • तणांचे प्रभावी नियंत्रण होते. थंडीच्या दिवसांत जमिनीचे तापमान वाढून पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते.
  • सूर्यप्रकाशाचे परावर्तन असल्यामुळे उन्हाळ्यात मातीचे तापमान कमी होऊन फुलकळीचा कालावधी वाढतो.
  • एकंदर आच्छादनाचा वापर केल्याने स्ट्रॉबेरीचे उत्पादन व उत्पन्न वाढीस मदतच होते. कोल्हापूर जिल्ह्यासह अन्य काही भागांतील शेतकरी स्ट्रॉबेरीमध्ये मर होत असल्याच्या गैरसमजामुळे आच्छादनाचा वापर करीत नाहीत. मात्र स्ट्रॉबेरीमध्ये प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर जरूर करावा.

पाणी व्यवस्थापन

  • स्ट्रॉबेरी पिकास अति प्रमाणात पाणी मानवत नाही. जमिनीत जास्त काळ ओलावा राहिल्यास रोपे मर, फळकूज या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.
  • रोपांची गादी वाफ्यावर लागण करून ठिबक सिंचनाद्वारा पिकास पाणी द्यावे. गादी वाफ्यावर प्लॅस्टिक आच्छादन बसविण्यापूर्वी रोपांच्या दोन ओळींत मध्यभागी लॅटरल अंथरून चार रोपांमध्ये 4 लि. पाणी प्रति तास क्षमतेचे एक ड्रीपर ठेवावे.
  • रोपे गादीवाफ्यावर चांगल्याप्रकारे स्थिरावण्यासाठी 2 ते 3 दिवस दररोज पाणी द्यावे. यानंतर जमिनीच्या मगदुरानुसार 2 ते 3 दिवसांआड ठिबक सिंचनाद्वारा पाणी द्यावे.
  • याशिवाय दोन गादीवाफ्यांचे मध्यभागी पीक वाढीच्या काळात तुषार सिंचनाचा वापर करावा.

संजीवकांचा वापर

  • सामान्यतः संजीवकांचा वापर फुलांचे प्रमाण वाढविणे व फळांचे आकारमान वाढविण्यासाठी केला जातो.
  • जी. ए.-3 (50 पी.पी.एम.) 50 मिलिग्रॅम प्रति लिटर व एन.ए.ए. (200 पी.पी.एम.) 200 मिलिग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात लागवडीनंतर 60 दिवसांच्या अंतराने फवारणी करतात, त्यामुळे फळांचे आकारमान व संख्या वाढून उत्पादनात 25 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाल्याचे आढळून आले आहे.
  • संजीवकांचा वापर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व काळजीपूर्वक करावा.

फळांची काढणी

चांगला सूर्यप्रकाश आणि योग्य तापमान असल्यास स्ट्रॉबेरीला जातीपरत्वे 45 ते 65 दिवसांत फुले येण्यास सुरवात होते. हा कालावधी स्टरॉबेरीची जात व हवामानाची परिस्थिती यावर अवलंबून असते. तेथून 11 ते 16 दिवसांत फळ तयार होऊन ते 2 ते 3 दिवसांत तोडणीस योग्य होते.

  • फळांची काढणी शक्‍यतो सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करावी.
  • फिकट - लालसर किंवा गुलाबी रंगाची अर्धपक्व फळे तोडून त्वरित सावलीत ठेवावीत.
  • प्रतवारी करून, पुठ्ठ्याच्या खोक्‍यात झाडपाला किंवा कागदी तूस/ तुकडे ठेवून अर्धा किलो किंवा पाव किलो फळांचे प्लॅस्टिक पॅकिंग करून 24 तासांत बाजारात पोचतील अशी व्यवस्था करावी.
  • स्थानिक बाजारासाठी अर्धपक्व किंवा पक्व फळे तोडावीत. दूरच्या बाजारात फळे पाठविण्यासाठी झाडावरून फळे तोडल्यापासून दोन तासांच्या आत 4 अंश सें. तापमानात थंड करून त्याच तापमानात पाठवावी लागतात. शीतगृहात फळे 3.2 अंश सें. तापमानात 10 दिवसांपर्यंत ठेवता येतात.
  • फळांची काढणी एक दिवसाआड करावी. उबदार हवामानात फळांची दररोज तोडणी करावी लागते.

उत्पादन

स्ट्रॉबेरीच्या फळांचे उत्पादन ही बाब जमीन, हवामान, पिकाची जात, लागणीची पद्धत व लागणीचे अंतर, झाडावरील फळांची संख्या, पिकाचे व्यवस्थापन अशा विविध बाबींवर अवलंबून असते.

  • स्ट्रॉबेरीच्या उत्पादनात विविध देशांत प्रचंड तफावत आढळून येते.
  • एकरी सरासरी उत्पादन - कॅलिफोर्निया - 30 टन, इटली - 12 टन, पोलंड - 6 ते 7 टन व भारत - 5 ते 7 टन.
  • विदेशी जातींची उत्पादकता 45 ते 50 टन इतकी आहे. उत्तम व्यवस्थापनाद्वारा महाराष्ट्रातील काही स्ट्रॉबेरी उत्पादक सध्या प्रति एकरी 20 टनांपर्यंत उत्पादन घेतात.

- श्री. एस. बी. महाजन, 9421128333 
(लेखक विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र, महाबळेश्‍वर येथे कार्यरत आहेत.)

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate