जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये तुती लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना रोपांची उपलब्धता होईल या दृष्टीने जानेवारी- फेब्रुवारी महिन्यापासून तुती रोपवाटिकेच्या नियोजनास सुरवात करावी.
तुती रोपवाटिकेचे संपूर्ण एक वर्षाचे नियोजन करावे, जेणेकरून व्यापारी दृष्टिकोनातून तुती रोपवाटिका व्यवसाय करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांची जमीन मोकळी राहणार नाही. तुती रोपवाटिकेसाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन आवश्यक असते. क्षारयुक्त, दगड-गोटेयुक्त जमीन नसावी.
जमिनीचा सामू 6.5 ते 7.5च्या दरम्यान असावा. जमिनीची खोली किमान तीन फूट असावी. जमीन कृमी, वाळवी आदी रोगकारक किडींपासून मुक्त असावी.जमिनीची दोनदा नांगरट करून घ्यावी. त्यानंतर जमिनीत प्रति एकर दहा मेट्रिक टन शेणखत एकसारखे पसरावे. जमिनीच्या प्रतीनुसार दहा-20 मेट्रिक टन वाळू जमिनीत पसरून बैलजोडीच्या साह्याने नांगरटीद्वारे खत-वाळू जमिनीत एकसारखे मिश्रण करून जमीन एकसमान करून घ्यावी, जेणेकरून तुती रोपवाटिकेस पाणी देणे सुलभ होईल.
रोपवाटिकेसाठी तीन मीटर लांब, एक मीटर रुंद आणि दहा सें.मी. उंच व चारही बाजूंनी पाण्यासाठी चर असलेले गादीवाफे तयार करून घ्यावेत. एक एकर तुती रोपवाटिका क्षेत्रामध्ये सुमारे 1065 गादीवाफे तयार होतात. गादीवाफ्यामध्ये कलमे लावण्याच्या 15 दिवस अगोदर गादीवाफे पाण्याने भिजवून घ्यावेत, जेणेकरून जमिनीत असलेल्या तणांचे बी उगवेल व कलमे लावण्यापूर्वी गादीवाफ्यातील तण हलकेच काढून त्यांचे नियंत्रण करता येईल.
रोपवाटिकेसाठी तुती वाणांची निवड करताना बाल्यावस्थेतील कीटकसंगोपनासाठी एस-36 वाण, अधिक पाला उत्पादनासाठी व्हिक्टरी-1 अथवा व्ही-1, एस-1635, कमी पाण्यात - उच्च तापमानात येणारे एस-13, एस-34 इत्यादी तुती वाणांची निवड करावी. तुती रोपवाटिकेसाठी वापरल्या जाणाऱ्या तुती बेण्याचे वय किमान सहा-आठ महिने असावे. तुती बेणे रोगमुक्त, कीडमुक्त असावे.
कलमे तयार करण्यापूर्वी रोग, कीडयुक्त तुती बेणे काढून टाकावे. कलमे सुकू नयेत, यासाठी सावलीत तयार करावीत. तयार कलमे ओल्या बारदानाने झाकावीत; जेणेकरून उष्ण वातावरणामुळे कलमे सुकून नुकसान होणार नाही. तुती बियाणे (फांदी)चा वरचा कोवळा व खालचा जाड भाग धारदार कोयत्याने काढून टाकावा. प्रत्येक कलमास तीन डोळे ठेवावेत.
डोळ्यापासून दूर, बेणेची साल निघणार नाही, बेणे दुभंगणार नाही अशा पद्धतीने एकाच घावात धारदार हत्याराने कलमे तयार करावीत.बुरशीजन्य रोगांपासून कलमांचा बचाव होण्यासाठी कलमे 0.1 टक्का मॅन्कोझेबच्या द्रावणात 30 मिनिटे बुडवून ठेवावीत.
तयार गादीवाफ्यामध्ये 20 सें.मी. ु 10 सें. मी. अंतराने तुती कलमे लावावीत. (दोन ओळींतील अंतर 20 सें.मी., दोन कलमांतील अंतर दहा सें.मी.) तुती कलमे लावताना कलमांवरील दोन डोळे जमिनीत जाऊन एक डोळा जमिनीच्या वर राहील असे लावावेत. त्यानंतर कलमाभोवतीची माती बोटांनी दाबून घ्यावी. अशा प्रकारे एक एकर तुती रोपवाटिकेत 1.60 लाख रोपांची निर्मिती होते.
- 9823048440
( लेखक जिल्हा रेशीम कार्यालय,पुणे येथे कार्यरत आहेत)
स्त्रोत - अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
अमरावती येथील श्रमसाफल्य फाउंडेशनद्वारा संचालित व ...
मी रब्बी हंगामासाठी कांद्याची गादीवाफ्यावरच रोपवाट...
चिंचेची रोपवाटिका तयार करण्यासाठी बियांची (चिंचोक्...
२ लिटर क्षमतेच्या प्लास्टिकच्या वाया गेलेल्या बाटल...