साग लागवडीसाठी थोडीफार चढ-उताराची, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन लागते. खडकाळ किंवा मुरमाड जमिनीत साग चांगल्या प्रकारे वाढतो. काळी चिकट माती असेल, तर सागाची वाढ समाधानकारक होत नाही. तसेच उथळ, निचरा न होणारी, फार दलदलीची जमीन साग लागवडीस अयोग्य आहे.
सागाचे बियाणे पेरून, रोपांची लागवड करून किंवा खोडमूळ (स्टंप) लावून लागवड करता येते. सागाच्या बियांवरील कवच मऊ करून अंकुर येण्यास सुलभ करण्यासाठी पावसाळ्यात मोकळ्या जागेत सिमेंटच्या चबुतऱ्यावर किंवा टणक पृष्ठभागावर बियाणे पसरावे व दररोज दाताळ्याने खालीवर करावे. असे केल्याने सुमारे चार ते सहा आठवड्यांनंतर बियांवरील कवच मऊ होऊन बी रुजण्यास मदत होते. बीजप्रक्रिया केलेल्या बियाण्यापासून सागाची रोपे पॉलिथिन पिशवीत अथवा गादीवाफ्यावर करावीत.
पॉलिथिन पिशवीत रोपे तयार करण्यासाठी एक भाग माती, एक भाग वाळू व एक भाग शेणखत यांचे मिश्रण करून ते 10 x 20 सें.मी. पिशवीत बीजप्रक्रिया केलेले बी पेरावे. गादीवाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी 12 मी. x 1 मी. आकाराच्या वाफ्यावर दहा सें.मी. अंतरावर व पाच सें.मी. खोलीवर प्रक्रिया केलेले बियाणे पेरावे.
खोडमूळ (स्टंप) बनविण्यासाठी एक वर्षानंतर रोपे गादीवाफ्यावरून उपटावीत. तीक्ष्ण धार असलेल्या चाकूने मुळाकडील 15 ते 20 सें.मी. भाग ठेवून बाकीचा भाग कापून टाकावा. तसेच मुळाचा खोडाकडील 1.5 ते 2 सें.मी. भाग ठेवून बाकीचा भाग कापावा. हे करताना तिरपा एकच घाव घालावा. पाने व छोट्या मुळ्या काढाव्यात. तयार केलेले खोडमूळ जितक्या लवकर रोपवनात लावले जाईल, तितके चांगले.
जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर 2 x 2 मीटर अंतरावर 30 x 30 x 30 सें.मी आकाराचे खड्डे घेऊन त्यामध्ये सागाची लागवड करावी. सागाचे स्टंप घट्ट लावावेत. लागवड केल्यानंतर स्टंपच्या शेजारी पाणी साचणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. सागाची वाढ जोमाने होण्यासाठी प्रति रोप दहा ग्रॅम नत्र व दहा ग्रॅम स्फुरद अळी पद्धतीने द्यावे. सागाची लागवड केल्यानंतर पावसाळ्यानंतर एक वर्षापर्यंत पाण्याची आवश्यकता असते. प्रति वर्षी सागाची उंची साधारणपणे 1 ते 1.5 मी. व घेर दोन ते पाच सें.मी.ने वाढतो.
संपर्क - 02358- 283655वनशास्त्र महाविद्यालय, दापोली
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवण...
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...