खत पेरणी अवजार
सुधारित खत पेरणी अवजाराच्या साह्याने ऊस लागणीपूर्वी सरी पाडल्यानंतर सरीमध्ये खत पेरून दिले जाते. यामध्ये स्फुरद व पालाशयुक्त खते एकत्र मिसळून दिली जातात. या खतामध्ये युरिया मिसळू नये, कारण युरियाचा हवेशी जास्त वेळ संपर्क आला, तर युरिया ओलसर होतो व खत पेरणीमध्ये अडचण येते, खत जमिनीत व्यवस्थित पेरता येत नाही, सारख्या प्रमाणात पडत नाही. खत पेरणी अवजार बैलजोडीच्या साह्याने ओढले जाते. या अवजाराच्या साह्याने खत पेरणी केली असता खत जमिनीमध्ये सारख्या प्रमाणात पाच ते सात सें.मी. खोलीवर पडते, यामुळे ते मुळांच्या कार्यक्षेत्रात पडल्यामुळे पिकांना शोषण करणे सोईस्कर होते, त्यामुळे उसाची उगवण चांगली होते.
कृषिराज
या अवजाराला तीन लोखंडी फण असतात म्हणूनच या अवजाराचा उपयोग उसाला भर देणे व सरी-वरंबा फोडण्यासाठी केला जातो; तसेच रिजर जोडून उसाची बांधणीही करता येते. कृषिराज अवजारामधील मधला फण काढल्यास हे अवजार ऊस लागणीनंतर दीड ते दोन महिन्यांनी उसामधील आंतरमशागतीसाठी वापरता येते. मधला लोखंडी फण काढल्यामुळे कडेच्या दोन्ही फणांमध्ये ऊस येतो व फणांच्या साह्याने उसाला दोन्ही बाजूंनी थोड्या प्रमाणात भर लागते. याच वेळी शिफारशीत नत्र खताचा दुसरा हप्ता (40 टक्के नत्र) द्यावा. म्हणजे दिलेली खतमात्रा मातीआड केली जाते. नत्र खते मुळांच्या सान्निध्यात दिली गेल्यामुळे व उसाला भर मिळाल्याने फुटव्यांची वाढ जोमदार होते. फुटवे फुटण्याचे प्रमाण वाढते व उसाच्या बगलेतील तणांचा बंदोबस्त करता येतो.
या अवजाराच्या साह्याने एका दिवसात एक बैलजोडी दीड एकर क्षेत्रात आंतरमशागतीचे काम पूर्ण करते. याच अवजाराला तीनही फण जोडून ऊस लागणीनंतर तीन ते साडेतीन महिन्यांनी सरी-वरंबा फोडण्यासाठी उपयोग करतात. सरी-वरंबा फोडल्यामुळे जमीन सपाट व भुसभुशीत होते व उसाला भर दिली जाते. याला उसाची बाळबांधणी असे म्हणतात. या वेळी शिफारशीत नत्र खताचा तिसरा हप्ता (दहा टक्के नत्र) द्यावा म्हणजे दिलेली खतमात्रा मुळांच्या सान्निध्यात मातीआड केली जाते, यामुळे उसाची वाढ जोमदार होते. या यंत्राच्या साह्याने एका दिवसात एक बैलजोडी दीड एकर क्षेत्र पूर्ण करते.
सायन कुळव
या अवजारास दोन लोखंडी फणांना आडवी पास जोडलेली असते. हे अवजार पाच ते साडेपाच महिन्यांनी ऊस लागवडीनंतर कृषिराज यंत्र चालविल्यानंतर लगेचच पाठीमागे चालवितात. या अवजारामुळे जमीन भुसभुशीत व सपाट होते, तणांचा बंदोबस्त होतो, त्यामुळे खुरपणीचा खर्च वाचतो व माती भुसभुशीत झाल्यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते. जमिनीतील अन्नद्रव्ये पिकास उपलब्ध होतात व पिकाची वाढ चांगली होते.
तीन पहारीचे अवजार
या अवजारास तीन लोखंडी पहारी 45 अंशांच्या कोनात जोडलेल्या असतात. या अवजाराचा उपयोग ऊस पिकातील सरी-वरंबा फोडण्यासाठी केला जातो. उसाच्या बाळ बांधणीच्या वेळी या अवजाराचा वापर सरी-वरंबा फोडण्यासाठी व जमीन भुसभुशीत करण्यासाठी, तणनियंत्रण करण्यासाठी केला जातो. ऊस साडेचार ते पाच महिन्यांचा झाल्यावर उसाची मोठी बांधणी केली जाते. या वेळी तीन पहारीच्या यंत्राच्या साह्याने वरंबा फोडून जमीन भुसभुशीत केली जाते. त्यानंतर रिजरच्या साह्याने मोठी बांधणी केली जातो.
पॉवर टिलर
पॉवर टिलरच्या साह्याने उसामधील आंतरमशागतीची कामे केली जातात. या यंत्रामध्ये कामानुसार बदल करता येतो. हे यंत्र स्वयंचलित असून, सरी-वरंबा फोडणे, उसाला भर देणे, उसाची बांधणी करणे, उसातील जमीन सपाट करणे, तणनियंत्रण करणे इ. कामे केली जातात. आंतरमशागतीच्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बचत करता येते. या यंत्राच्या साह्याने एक मजूर एक ते दीड एकर क्षेत्र एका दिवसात पूर्ण करतो. अशा प्रकारे सुधारित अवजारांचा व यंत्रांचा वापर आंतरमशागतीसाठी केल्यास येणारा खर्च कमी होतो, वेळेत बचत होते व उत्पादनातही वाढ होते.
- 02169 - 265335
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा
माहिती संदर्भ : अॅग्रोवन