অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भाजीपाला सल्ला

कलिंगड, खरबूज, काकडी

या पिकांमध्ये विषाणूजन्य रोग हे रस शोषणाऱ्या किडींमुळे (फुलकिडे, मावा इ.) पसरतात, तेव्हा या किडींचे योग्य वेळी नियंत्रण केल्यास विषाणूजन्य रोगाचा प्रसार कमी होऊ शकतो. त्याचप्रमाणे पांढरी माशी या रस शोषणाऱ्या किडीचेही नियंत्रण योग्यवेळी होणे गरजेचे आहे. यासाठी पिकाची उगवण झाल्यानंतर पिकास दोन-चार पाने आल्याबरोबर कीडनाशकाची पहिली फवारणी करावी. यात थायामेथोक्‍झाम चार ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यातून फवारावे. त्यानंतर दुसऱ्या फवारणीसाठी ट्रायऍझोफॉस 20 मि.लि. किंवा कार्बोसल्फान दहा मि.लि. प्रति दहा लिटर पाण्यातून दहा दिवसांच्या अंतराने फवारावे. या फवारण्या फुले येण्यापूर्वी पूर्ण कराव्यात. फुले आल्यानंतर शक्‍यतो फवारणी करू नये. फळे लागल्यानंतर फळमाशीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी शेतातील फक्त कडेच्या ओळींवरच फवारणी करावी. फवारणीसाठी एन्डोसल्फान 20 मि.लि. प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात वापरावे. सेंद्रिय शेतीमध्ये किंवा जैविक पद्धतीने रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी ऍझाडिरेक्‍टीन (1500 पीपीएम) अडीच मि.लि. प्रति लिटर किंवा व्हर्टिसिलियम लेकॅनी 40 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यातून किंवा बिव्हेरिया बॅसियाना 40 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यातून फवारावे. फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी. उन्हात करू नये. फळमाशीच्या नियंत्रणासाठी क्‍युल्युर रसायनयुक्त सापळे एकरी पाच या प्रमाणात शेतात काठीला बांधावेत. बाजारात हे ल्यूर उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे या पिकांमध्ये केवडा, कवडी आणि करपा रोगांची लक्षणे दिसताच किंवा उगवण झाल्यापासून 20 दिवसांपासून दहा दिवसांच्या अंतराने वरील कीटकनाशकात मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा क्‍लोरोथॅलोनील 25 ग्रॅम किंवा मेटॅलॅक्‍झील अधिक मॅन्कोझेब हे संयुक्त बुरशीनाशक 25 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्‍झीक्‍लोराईड 25 ग्रॅम मिसळून या बुरशी नाशकांची आलटून-पालटून फवारणी करावी.

भेंडी

या पिकात भुरी रोगाचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारा गंधक (80 टक्के) 25 ग्रॅम किंवा डिनोकॅप दहा मि.लि. प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून दोन ते तीन फवारण्या कराव्यात.

कांदा

या पिकावरील करपा आणि फुलकिडीच्या नियंत्रणासाठी लागवडीनंतर 25 दिवसांपासून दर 15 दिवसांच्या अंतराने मॅन्कोझेब किंवा क्‍लोरोथॅलोनील किंवा कॉपर ऑक्‍झिक्‍लोराईड अधिक फिप्रोनील 15 मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस दहा मि.लि किंवा कार्बोसल्फान दहा मि.लि. प्रति दहा लिटर पाण्यातून स्टिकरसहित फवारावे.

टोमॅटो

या पिकावर लवकर येणाऱ्या करपा रोगाची लक्षणे दिसताच मॅन्कोझेब 25 ग्रॅम आणि टेब्युकोनॅझोल पाच मि.लि. या बुरशीनाशकांची प्रति दहा लिटर पाण्यातून 15 दिवसांच्या अंतराने प्रत्येकी दोन फवारण्या आलटून-पालटून अशा एकूण चार फवारण्या कराव्यात किंवा मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्‍झीक्‍लोराईड 30 ग्रॅम किंवा क्‍लोरोथॅलोनील 25 ग्रॅम यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारावे. आवश्‍यकतेनुसार तीन-चार फवारण्या कराव्यात.


- 02426-२४३३४२

प्रा. सी. बी. बाचकर, डॉ. एम. एन. भालेकर भाजीपाला सुधार प्रकल्प,

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate