गोड्या पाण्यात मत्स्य व्यवसाय करायचा असेल तर भारतीय तीन प्रमुख कार्प म्हणजेच कटला, रोहू व मृगल या माशांचे संगोपन करणे फायदेशीर ठरते. मत्स्यपालनासाठी तलावाची जमीन सुपीक, काळी, गाळाची किंवा चिकणमातीयुक्त असणे आवश्यक असते, तसेच जमिनीलगत पाण्याचा पुरवठा बारमाही (कमीत कमी आठ ते दहा महिने) असणे आवश्यक आहे. जमीन नदीनाल्यांच्या पुराच्या क्षेत्रात येणारी नसावी. मत्स्यबीजांची मुबलक उपलब्धता असावी.
तलावाजवळ मूलभूत सुविधा (वीज, वाहतूक व मनुष्यबळ) सहज उपलब्ध असाव्यात. मासे विक्रीकरिता बाजारपेठ (स्थानिक किंवा मोठ्या शहरामध्ये) उपलब्ध असणे आवश्यक आहे. मत्स्यपालनासाठी लागणारे तलाव हे शक्यतो आयताकृती असावेत. ज्यामुळे मासे पकडण्यासाठी जाळे फिरवणे सोईस्कर ठरते. तलावाची खोली 1.2 ते दोन मीटर इतकी असावी. हा व्यवसाय करताना व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे असून, त्यावरच नफ्याचे प्रमाण अवलंबून असते. अधिक मत्स्य उत्पादनासाठी तलावातील पाण्याचा दर्जा उत्कृष्ट प्रतीचा असावा. कारण यावरच माशांची वाढ व उत्पादन अवलंबून असते. तेव्हा माशांची तपासणी नियमितपणे करावी. गोड्या पाण्यात कोळंबीसंवर्धन करावयाचे असल्यास संवर्धनासाठी तलावाचे क्षेत्र कमीत कमी 0.50 हेक्टर असावे. तलावाची खोली कमीत कमी दीड ते दोन मीटर असावी. तलावात कोळंबीचे बीज सोडण्याच्या 15 दिवस अगोदर हेक्टरी एक टन शेणखत, 200 किलो चुनाखत म्हणून टाकावे.
यानंतर प्रत्येक महिन्यात 500 किलो शेण व 50 किलो चुना मिसळावा. शासनाच्या मत्स्यबीज विभागातून सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात कोळंबी बीज उपलब्ध होत असल्याने, साधारणतः सप्टेंबर महिन्यात तलावसंवर्धनाकरिता तयार असावा. हेक्टरी 40,000 बीज लागते. कटला, रोहू जातींबरोबर संगोपन करायचे झाल्यास 15,000 ते 20,000 कोळंबी बीज आणि 3000 ते 4000 मत्स्य बोटुकली या प्रमाणात बीज सोडावे. मत्स्यबीजांच्या उपलब्धतेसाठी जिल्हा मत्स्यविकास अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधल्यास मत्स्यपालनाबाबत संपूर्ण माहिती मिळू शकते. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे कार्यालय असते. याबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा.
- 02352 - 232995
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी
- 02352 - 232241
मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, जि. रत्नागिरी
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
मोटार लाँचेसचा मासेमारी आणि वाहतुकीसाठी प्रायोगिक ...
शोभेचे/अलंकारिक मासे पाळणे हा अनेकांचा छंद आहे. हा...
गोड्या पाण्यातील कोळंबी ही दुसर्या क्रमांकाची सर्...
भारतात आणि इतरत्र मोत्यांची मागणी वाढत असूनसुध्दा...