स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून 17 सप्टेंबर 1994 रोजी झाली. विद्यापीठाने कमी कालावधीत नॅककडून 'अ' दर्जा प्राप्त करून उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात सर्वांगीण विकासाकडे आगेकूच केली आहे. नांदेड, लातूर, हिंगोली आणि परभणी हे चार जिल्हे मराठवाडा या प्रदेशातील असून हा प्रदेश अनेक वर्षे निजामाच्या वर्चस्वाखाली होता. विद्यापीठाला संलग्नित असलेल्या या चार जिल्ह्यांमध्ये शहरी, ग्रामीण आणि आदिवासी अशा भूप्रदेशाचा समावेश होतो. हा भूप्रदेश मुख्यत: आर्थिक आणि शैक्षणिक निकषावर अविकसित अशा स्वरूपाचा राहिलेला आहे. तथापि, या भूप्रदेशाला पूर्वाश्रमीचे मराठवाडा विद्यापीठ स्थापन होण्यापूर्वी पासून उच्च शिक्षण विषयक एक समृद्ध अशी परंपरा राहिलेली आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारख्या अनेक समाजसुधारकाचा प्रयत्न व त्यागाच्या आधारे या भागात अनेक शैक्षणिक संस्थाचा विकास झाला.
नयनरम्य वातावरण असलेल्या 550 एकरावर पसरलेल्या या विद्यापीठात समृद्ध अशी जैव-विविधता आहे. अतिशय अद्ययावत अशा पायाभुत सुविधा आणि स्थापनेपासुनच अतिशय तरल असे शैक्षणिक वातावरण आहे. विद्यापीठातल्या प्राध्यापकांनी नॅककडुनच्या पुनर्मुल्यांकनानंतर 55 ग्रंथाची निर्मिती केलेली असून 10 पर्यंत इम्पॅक्ट फॅक्टर असलेल्या नियतकालिकामध्ये 1,161 संशोधनपर निबंध प्रकाशित केले आहेत आणि 17 एकस्व मिळविले आहेत. कमी जीईआर (सर्व साधारण प्रवेश दर) असलेल्या या प्रदेशात उच्च दर्जाच्या शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या या विद्यापीठाने समकालिन गरजांना अनुसरून स्वत:चा दृष्टीकोन विकसीत केला आहे. हे विद्यापीठ युरोपियन युनियनच्या ERASMUS-MUNDUS या कार्यक्रमाचा भाग असून विज्ञान, कला, मानवविद्या, भाषा आणि साहित्य, माध्यमे आणि ललित कला या क्षेत्रामध्ये अभ्यासवृत्ती (Fellowships) स्थापन करण्यात आले आहेत.
या विद्यापीठाने स्थापनेपासूनच संकुलप्रणाली अनुसरली असून गेल्या 20 वर्षांहून अधिक कालावधीमध्ये या संकुलाचा योग्य असा विकास देखील झालेला आहे. विद्यापीठ आठ पदवी अभ्यासक्रम, 44 पदव्युत्तर अभ्यासक्रम, 11 प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि 8 पदवीका अभ्यासक्रम चालविते. सीजीपीए प्रणाली अनुसरून आणि तसेच आवडीनुसार विषय निवडण्याचे स्वातंत्र्य बहाल करणाऱ्या सीबीसीएस या प्रणालीचा अवलंब विद्यापीठात केला जातो. जैव-विविधता, पर्यावरणशास्त्र, व्यवस्थापन, वैद्यकीय भौतिकशास्त्र आणि स्त्री अभ्यास या विषयामध्ये आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम चालविले जातात. भूकंप प्रवण असलेल्या या प्रदेशात भूकंपी परिस्थितीचे पर्यवेक्षण करण्याविषयीची सेवा विद्यापीठ हे सातत्याने शासनाला देत आहे.
विद्यापीठाने अनेक प्रकारचे यश संपादित केले असून 5 संकुलांना DST-FIST आणि UGC- SAP या कार्यक्रमातंर्गत विशेष असे अनुदान प्राप्त झाले आहे. मागील पाच वर्षांमध्ये विद्यापीठातील प्राध्यापकांनी एकूण 696.52 लाख रूपये मूल्य असलेल्या 108 संधोधन प्रकल्पांची पूर्ती केली आहे. एकमेवाद्वितीय अशा स्वरूपाची भव्य अशी मध्यवर्ती ग्रंथालय, 16 क्रीडांगणे, विविध प्रकारची वसतिगृहे आणि अल्पसंख्याक विद्यार्थीनीसाठी वसतिगृह संकुलांना स्वतंत्र इमारती अशा प्रकारच्या पायाभुत सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. विद्यापीठ आणि उद्योगक्षेत्र यामधील संबंधाच्या क्षेत्रात देखील महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड अग्रिकल्चर या संस्थेसोबत सामजंस्य करार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संदर्भात सुसज्ज अशी प्लेसमेंट सेल स्थापन करण्यात आलेली आहे. विद्यापीठाने लिंगभाव, पर्यावरण आणि ऊर्जा लेखापरिक्षण पूर्ण केले आहे.
विद्यापीठाने शैक्षणिक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा गुणांना प्रोत्साहन देणारे अनेक उपक्रम राबविले आहेत. चालू शैक्षणिक वर्षात राज्यस्तरीय इंद्रधनुष्य सांस्कृतिक महोत्सवात विद्यापीठात दोन प्रथम, चार द्वितीय व दोन तृतिय क्रमांकाची पारितोषिके प्राप्त केली आहेत. इंदोर येथे झालेल्या राष्ट्रीय युवक महोत्सवात तृतिय पारितोषिक प्राप्त केले आहे. क्रीडा क्षेत्रातही विद्यापीठाने नाव लौकीक प्राप्त केले आहे.
श्रेयश दिलीप मार्कंडेय या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी चीन येथे झालेल्या चौथ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप योगासन स्पर्धेत कांस्य पदक प्राप्त केले आहे. त्याची पुन:श्च पाचव्या वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अखिल भारतीय तायक्वोंदो क्रीडा स्पर्धेत विद्यापीठाच्या कु. आशा वडजे हिने कांस्य पदक प्राप्त केले आहे. तर अखिल भारतीय ॲथलेटिक्स स्पर्धेत विद्यापीठाच्या स्वप्नील सावंत या विद्यार्थ्यांने अनुक्रमे दहा हजार व पाच हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय पारितोषिक मिळवून इतिहास घडविला. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत विद्यापीठाने लांब उडी, ट्रीपल जम्प, धावणे, फाऊल यासारख्या क्रीडा प्रकारात विविध पारितोषिके प्राप्त केली आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाने 2010 मध्ये पीएच.डी. संबंधी नव्या मार्गदर्शन पर सूचना प्रसिद्ध केल्यापासून या विद्यापीठाने आजपर्यंत चार वेळा पीएच.डी. प्रवेश चाचणीचे आयोजन केले आहे आणि त्याद्वारे महत्त्वाच्या अभ्यासक्षेत्रांमध्ये संशोधन करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. अफगानिस्तान, इराण, लिबीया, कतार, सुदान, येमेन, झांबिया, कांगो, केनिया, तुवलु, व्हिएतनाम आणि इटली या देशामधुन एकूण 129 आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आकर्षित करण्यात या विद्यापीठाला यश आलेले आहे. विद्यापीठाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थासोबत संयुक्तपणे काम करण्याविषयीचे करार केले आहेत. शैक्षणिक आणि संशोधनातील महत्त्वाच्या योगदानासोबतच विद्यापीठाने सामाजिक पाहणी, सामाजिक न्याय, वंचितांचे सबलीकरण या क्षेत्रामध्ये विस्तारसेवा प्रकल्पांच्या माध्यमातुनही सेवा बहाल केली आहे. आता पारंपरिक शिक्षणासोबतच कौशल्यांच्या शिक्षणांचे एकात्मीकरण साधण्याचा काळ आला आहे. या दिशेने पुढे एक पाऊल म्हणून भारतातील कदाचित पहिली अशी एक शिक्षण एक कौशल्य ही नवी योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
लातूर, हिंगोली, परभणी आणि किनवट या ठिकाणी उपकेंद्र आणि विशेष केंद्र विकसित करण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न विद्यापीठाने केला आहे. यापैकी लातूर उपकेंद्र विकासात पुढे आले आहे. हिंगोली येथील 'न्यु मॉडेल डिग्री कॉलेज' हा एक अभिनव प्रकल्प आहे; तसेच परभणी व किनवट येथील केंद्रांना संजिवनी देणे आवश्यक आहे.
विद्यापीठाच्या परिसरात चैतन्यदायी शैक्षणिक आणि सामाजिक पर्यावरण निर्माण करण्यासाठी विविध सामाजिक आणि सांकृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यापीठाने जाणिवपुर्वक प्रयत्न केले आहेत. यातुन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत आहे. संवाद कट्टा असा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांसाठी निर्माण करण्यात आला आहे. विद्यापीठाचे संकेतस्थळ हे अद्ययावत असून हे न्याय आणि मानवीय समाजाच्या प्रस्थापनेसाठी कटीबद्धता राखत विद्यापीठ विद्यार्थी, शिक्षक आणि व्यापक समाजाच्या सदस्यांच्या सहभातून मार्गक्रमण करीत आहे. उच्च शिक्षणातील अध्ययन-अध्यापन आणि संशोधनातील गुणवत्ता टिकुण ठेवण्यासाठी अंतर्गत आणि बाह्य गुणवत्ता मुल्यमापन आणि गुणवत्तेची निरंतरता हे घटक लक्षात घेणे आवश्यक आहे. नॅक या संस्थेकडुन या विद्यापीठाने सातत्याने स्वत:चे मूल्यमापन करून घेतले आहे.
नजिकच्या काळात विद्यापीठ पदवीपूर्व आणि पदव्युत्तार स्तरावर 'चॉईस बेसड क्रेडिट सिस्टीम' (सीबीसीएस) कार्यान्वीत करणार आहे. व्हर्च्युअल कॅपस योजनेंतर्गत शंभर महाविद्यालयासाठी वेब बेस लर्निगची सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आहे. नेतृत्व देणारे विद्यापीठ ही ओळख निर्माण करण्याकडे हे विद्यापीठ आत्मविश्वासपूर्वक वाटचाल करीत आहे.
संपर्क
या विद्यापिठाशी संपर्क करण्याकरिता लॅन्डलाईन क्रमांक 02462 - 229242, 2292243 याशिवाय विद्यापिठाचे संकेतस्थळ www.srtmun.ac.in अथवा जनसंपर्क अधिकारी यांच्या 02462 229325 यावर फोन करू शकता.डॉ. पंडीत विद्यासागर, कुलगुरु
माहिती स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 5/22/2020
ईजिप्तमधील एक प्रसिद्ध व प्राचीन इस्लामी विद्यापीठ...
आंध्र प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ.
मध्य प्रदेशातील एक विद्यापीठ.
उत्तर प्रदेश राज्यातील अलीगढ येथे १९२० मध्ये स्थाप...