पारंपरिक सांस्कृतिक आशय असलेली व मौखिक परंपरेने जतन केली जाणारी कथा म्हणजे लोककथा होय. समग्र लोकसाहित्याप्रमाणेच लोककथा हीसुद्धा समूहनिर्मित, समूहरक्षित असते. ती परंपरागत तरीही परिवर्तनशील आणि प्रवाही असते. मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ती संक्रमित होत असते व अशा रीतीने पिढ्यान्पिढ्या जतन केली जाते. कित्येक लोककथा ह्या एका भौगोलिक प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात, तसेच एका संस्कृतीतून दुसऱ्या संस्कतीत प्रवास करतात व अशा प्रवासात त्यांची रूपेही बदलत जातात. त्या त्या भौगोलिक प्रदेशाच्या, सांस्कृतिक वैशिष्ट्यांच्या पृथगात्म स्वरूपांनुसार त्या कथा वेगवेगळी रूपे धारण करतात. लोककथा ह्या मूळ मौखिक परंपरेतून आल्या असल्या, तरी कालांतराने लिखित रूपात ग्रंथबद्ध होऊ शकतात. लोककथांमध्ये मिथ्याचे घटक असतात आणि कित्येकदा हे मिथ्य धर्मेतरही असू शकते.
काही आद्य मूलबंध आणि रचनात्मक प्रारूप-आराखडे अनेक लोककथांतून पुनरावृत्त होताना दिसतात. लोककथांचा उगम अनिश्चित असून तो कुठेही, केव्हाही झालेला असो; त्यांत स्थलकालदृष्ट्या एक प्रकारची वैश्चिकता आढळून येते. कथक आणि श्रोता यांचे एक सनातन नाते दिसून येते. काही कथक अगदी साध्यासुध्या गोष्टी सांगतात; तर काही कमालीच्या गुंतागुंतीच्या! पण मौखिक परंपरेने कथक व श्रोता यांचे अगमापासूनचे सनातन नाते पुढेही कायम जतन झालेले दिसून येते. आजीने नातवाला गोष्टी सांगणे हा या परंपरेचाच एक हृद्य आविष्कार होय. पारंपारिक कथाकथकांचरू पारावर रंगणाऱ्या गोष्टी ह्याही अशाच कथक-श्रोता प्रकारातच मोडतात. लोककथा एका कथनाकडून दुसऱ्या कथनाकडे, एका पिढीकहून दुसऱ्या पिढीकडे अगदी सहज विनासायास प्रवास करतात. लोककथेचा विस्तार हा विशिष्ट भौगोलिक प्रदेशापेक्षाही विस्तीर्ण अशा सांस्कृतिक परिसरोन नियंत्रित होतो.
लोककथेचे स्वरूप हे तिचे भाषिक घाटापेक्षा त्या कथेचा आद्य मूलबंध व रचनात्मक प्रारूप यांतून सिद्ध होत असल्याने, अशी कथा एका भाषेतून दुसऱ्या भाषेत सहजपणे संक्रमित होते. कालौघात राजकीय आक्रमणे, व्यापार, प्रादेशिक विस्तार, सांस्कृतिक, स्थित्यंतरे यांमुळे माणसामाणसांमधले परस्पर-अभिरसण वाढत गेल्याने लोककथा आपल्या प्रादेशिक सीमा ओलांडून सहजपणे दुसऱ्या प्रदेशात स्थिरावताना दिसून येतात.
अठराव्या शतकात ‘मुलांच्या आणि घरगुती कथा’ यांचे संकलन करून आधुनिक काळात लोककथांच्या शास्त्रीय अभ्यासाचा पाया घातला गेला. एकोणिसाव्या शतकात माक्स म्यूलर यांनी भाषाशास्त्राचा अभ्यास करीत असताना तौलकिन दैवतकथांच्या व मिथ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष वेधले. याच काळात संस्कृत पंचतंत्राचे भाषांतरकार बेन्फाय यांचे भारतीय कथासंभाराकडे विशेषत्वाने लक्ष वेधले आणि ‘भारत ही जागतिक कथावाङ्मयाची गंगोत्री आहे’, असा सिद्धांत त्यांनी मांडला. पुढे अनेक संशोधकांनी तो मान्य केला
भारतातील कथांची परंपरा अत्यंत प्राचीन आहे. वैदिक वाङ्मयात अनेक कथांची बीजे आढळतात व नंतरच्या पुराणवाङ्मयात ‘पुरुरवा-उर्वशी’ कथेसारख्या अनेक कथा त्यातूनच विकसित झालेल्या दिसतात. प्रथम वररुचीने प्राकृतामध्ये व नंतर गुणाढ्याने पैशाची प्राकृतमध्ये लोककथांचा प्रचंड संग्रह करण्याचा खटाटोप केला. बृहत्कथा या नावाने अखिल भारतीय स्वरूपाचा हा संग्रह प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्रात १८६८ ते १९१६ या कालावधीत सदाशिव काशीनाथ छत्रे, राजारामशास्त्री भागवत, कृष्णशास्त्री चिपळूकर व विष्णुशास्त्री चिपळूणकर, महादेव मोरेश्वर कुंटे, ए.एम्.टी. जॅक्सन, वासुदेव गोविंद आपटे इ. विद्वानांनी लोकसाहित्य−संकलनाच्या संदर्भात भरीव कार्य केले. गाणी, म्हणी, उखाणे, कहाण्या यांचे संग्रह धार्मिक वृत्तीचा परिपोष व भाषाशिक्षण ह्या हेतूंनी प्रसिद्ध करण्यात आले. स.का. छत्रे यां नी बाळमित्र (१८२८) हे मूळ फ्रेंच कथाग्रंथाच्या बर्क्विन्स चिल्ड्रेन्स फ्रेंड ह्या इंग्रजी रूपांतराच्या साहाय्याने केलेले मराठी भाषांतर व इसप नीतिकथा (१८२८) हा अनुवाद, ही पुस्तके मराठी लोककथांच्या भांडारात मोलाची भर घालणारी आहेत.
कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी विष्णुशास्त्र्यांच्या सहाकर्याने अनुवादिलेल्या आरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टींनी (१९१३) मराठी बालवाङ्मय समृद्ध केले. तसेच वा.गो. आपटे यांनीही मराठी बालकथांच्या क्षेत्रात भरीव कार्य केले. साधारणपणे १९१६ ते १९३८ हा काळ मराठी लोकसाहित्याच्या अभ्यासाच्या प्रतिष्ठापनेचा काळ मानला जातो. ह्य काळात ⇨वि.का. राजवाडेयांनी पांरपरिक कथांसाठी ‘लोककथा’ व पारंपरिक गीतांसाठी ‘लोकगीत’ या संज्ञा प्रथम वापरल्या आणि त्यांच्या चिकित्सक अभ्सासाची मुहूर्तमेढ रोवली. ना.गो. चापेकर यांनी लोकसाहित्याचे अनेक प्रकार विपुल प्रमाणात प्रकाशित केले. शं.ग. दाते यांनी लोककथांचा एक संग्रह प्रसिद्ध केला. डॉ. श्री. व्यं.केतकर, दुर्गाबाई भागवत, डॉ.रा.चिं. ढेरे, डॉ. प्रभाकर मांडे, डॉ. तारा भवाळकर या अभ्यासकांनी एकूणच मराठी लोकसाहित्याची चिकित्सक अभ्सासशाखा समृद्ध केली आहे.
माक्स म्यूलर यांच्या मते मिथ्यकथा हा भाषेचा एक रोग आहे; तर मानसशास्त्रज्ञ कार्ल युंग यांच्या मते ती समूहमनाची स्वप्ने आहेत. लोककथांची निर्मिती, संग्रह व जपणूक करण्याचे काम अबोध लोकमानसच करत असते.
लोककथांच्या निर्मितीसंबंधीची विविध मते प्रचलित आहेत : मानवी अस्तित्वाच्या प्रारंभावस्थेतील मानवाने सृष्टीच्या ज्या अनंतरूप घडामोठी अनुभवल्या, त्यांचे जे अर्थ लावले त्यातून निसर्गरूपकवादी कथांचा जन्म झाला. नंतर सृष्टिविषयक ज्ञान व आकलन जसजसे वाढले आणि ‘देव’ कल्पनेचा जन्म झाला, तसतसे प्राथमिक सृष्टिविषयक कथांमध्ये देवविषयक कल्पना व तज्जन्य श्रद्धा यांची भर पडली आणि त्यातूनच मिथ्यकथा वा दैवतकथा जन्माला आल्या. निसर्कघटितेच या सर्व प्राक्कथांची जन्मभूमी आहेत. नंतर धर्मसंबद्ध विधींसाठी विधि कथा जन्माला आल्या. या सर्व कथा बहुधा विधींच्या स्पष्टीकरणकथा असतात. त्यातूनच आलेल्या नीतिकथा, बोधकथा यांनी लोकरंजनाचे कार्यही केले.
भौगोलिकदृष्ट्या दूर अंतरावरील प्रदेशांतील कथांमध्ये अनेकदा लोकविलक्षण साम्य का आढळते? या प्रश्नाचा शोध घेताना भटक्या जमाती व व्यापारी तांडे यांच्याबरोबर या कथा मूळ स्थानापासून दूरवर पसरत गेल्या, असे अनुमान बांधले गेले. देशकालपरत्वे या कथांना अनेक उपाफाटे फुटले, बदल झाले व त्यांची अनेक रूपे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक परंपरेने गेली हजारो वर्षे चालत आली, पसरत गेली. त्या त्या समाजमनाशी त्या कथा एकरूप झाल्या, विस्तारात व बदलतही गेल्या आहेत. काही लोककथांना कालांतराने सुबद्ध वाङ्मयीन रूपे लाभल्याचेही दिसून येते. मौखिक गद्य कहाणीचे विकसित वाङ्ममयीन स्कँडिनेव्हियन रूप म्हणजे ‘सागा’ होय. मध्ययुगीन रेनर्ड द फॉक्ससारख्या बोधकथांना कालौघात वाङ्मयीन मूल्य प्राप्त झाल्याचे दिसून येते.
भारतात सूत, मागध, चारण, भाट, नट, नर्तन यांनी परंपरेने अनेक कथागीते रचली, जतन केली व त्यांचा प्रसारही केला. बृहत्कथा, पंचतंत्र, कथासरित्सागर, हितोपदेश, वेताळपंचविशी, शुकबहात्तरी, जातककथा, जैन चूर्णी या सर्व लोककथाच असून मूलतः त्या लोकभाषेत आहेत. मौखिक परंपरा लिपिबद्ध करण्याच्या एका टप्प्यात संस्कृतमध्ये त्यांची रूपांतरे व अनुवाद झाले. संस्कृतमधील ऋग्वेद हे जगातील आद्य लोकवाङ्मय आहे. त्याची रचना सहजस्फूर्त असून मौखिक परंपरेने ते जतन केले आहे. त्याचे कर्तृपद कोण्या एका व्यक्तीकडे नसून समूहनिर्मिती, सामूहिक जतन व समूहस्वीकृती ही लोकसाहित्याची वैशिष्टे येथेही आहेत.
भारतीय लोककथांच्या संकलनांचे काही पद्धतशीर प्रयत्न झाले. मेरी फ्रीअर या लेखिनकेने ओल्ड डेक्कन डेज (१८६८) हे लोककथांचे संकलन प्रसिद्ध केले. इंडियन फेअरी टेल्स (१८८०) हे आयोध्या प्रांतातल्या लोककथांचे संकलन मिस् स्टोक्स यांनी केले. सर रिचर्ड टेंपल यांनी लोककथांच्या संग्रहाची काटेकोर छाननी व शास्त्रोक्त वर्गीकरण करण्याचे पद्धतीशीर प्रयत्न प्रथम केले. लेजंड्स ऑफ पंजाब (१८८३) हे त्यांचे संकलन प्रसिद्ध आहे. स्विनर्टनच्या ‘राजा रसालूच्या कथा’ व फ्लोरा ॲनी स्टीलचे द वाइड अवेक स्टोरीज ही ह्या काळातील आणखी काही संकलने होत. इंडियन अँटिक्वेरी या नियतकालिकामुळे लोकसाहित्याच्या अभ्यासाला खरी प्रेरणा मिळाली. मराठीतील लोककथांचे वर्गीकरण रचनादृष्ट्या मुख्यतः गद्य व पद्य या दोन गटांत करता येईल. परंपरेत पद्यबद्ध कथासंभार विपुल असून काही कथांची रचना चूर्णिकेसारखी (म्हणजे लयताबद्धता गद्य-पद्य मिश्रित अशी) आहे.
लोककथांचे स्वरूपदृष्ट्या वर्गीकरण धर्मसंबद्ध मिथ्यकथा आणि धर्मेतर मिथ्यकथा अशा दोन गटांत करता येईल. सर्व पुराणकथा धर्मबंद्ध असून त्या आद्य सृष्टि-उत्पत्तिविष्ज्ञयक कथांतून निर्माण झाल्याने त्यांना ‘प्राक्कथा’ ही संज्ञा दिली जाते; तर समूहप्रतिभेच्या कल्पनेनुसार दिव्यलोकीचे वर्णन त्यांत असल्याने त्यांना ‘दिव्यकथा’ असेही म्हटले जाते. यांखेरीज लोकभाषेतील धार्मिक कहाण्या, व्रतकथा, भगतांचया गीतकथा, तीर्थक्षेत्रांसंबंधीच्या व्युत्पत्ति-कथा, स्पष्टीकरणकथाही यात येतात. धर्मेतर कथांत दंतकथा, आख्यायिका, स्थलनामकथा, परीकथा, तंत्राख्याने, चातुर्यकथा, हास्यकथा, नीतिकथा, बोधकथा, रूपकथा, शृंगारकथा, वीरगाथा या सर्वांचा समावेश होतो. ‘मार्चेन’ ही जर्मन संज्ञा सामान्यतः अदभुतरम्य लोककथा वा परीकथा यांसाठी वापरली जाते.
ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ⇨याकोप ग्रिम व व्हिल्हेल्म ग्रिम या बंधूंनी एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी द किंडर-उण्ड हौसमार्चेन ह्या शीर्षकाने केलेले परिकथांचे संकलन होय. मार्चेन या प्रकारात ‘द ड्रॅगन स्लेयर’, ‘द डान्स्ड-आउट शूज’, ‘द स्वान मेडन’, ‘क्यूपिड अँड सायकी’, ‘स्नो व्हाइट’, ‘सींड्रेला’, ‘हॅन्सेल अँड ग्रीटेल’ आदी कथांचा समावेश होतो. ⇨इसापच्या बोधप्रद नीतिकथा ह्या आद्य प्रारंपांसारख्या आहेत. त्या जगभर फिरलेल्या आहेत. त्या बव्हंशी प्राणिकथा आहेत. त्यांतून नित्य नवनवी रूपे- कथांतरे उदित झाली आहेत. प्राणिकथांमध्ये प्राणी कधी त्यांच्या नैसर्गिक रूपांत अवतरतात; तर कधी मानवरूपे धारण करून चालताना-बोलताना दिसतात. धैर्यवान माणसे व त्यांचे वेगवेगळे साहसी अनुभव यांवर आधारलेल्या साहसकथाही खूप प्रचलित आहेत.
लोककथांचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणजे ठकसेनांच्या चातुर्यकथा. ह्या कथांचा नायक धूर्त, लबाड, ठकवणारा असला, तरी त्याच्या चातुर्याने आकर्षक ठरतो. भारतातील बिरबलाच्या गोष्टी, तेनालीरामच्या गोष्टी ही चातुर्यकथांची उत्तम उदाहरणे होत. ह्या कथांना कित्येकदा विनोदाची फोडणी असते. मराठीत चतुर म्हातारी अनेक कथांतून भेटते. जावयाच्या कथा या तर विनोदाचे भांडारच आहेत. आख्यायिका ह्या वास्तवाभासावर भर देणाऱ्या कथा असतात. ह्या संतपुरुषांच्या जशा असतात, तशाच ऐतिहासिक वीरपुरुषांच्याही असतात. व्हिल्हेल्म ग्रिमचा Die Deutsche Heldensoge (१८२९) हा जर्मन वीरकथांचा संग्रह उल्लेखनीय आहे. भारतातील रामायण, महाभारताच्या लोकपरंपरेतील कथा या वीरकथाच आहेत.
बदलत्या विज्ञानयुगात पारंपरिक श्रद्धा, रूढी व तत्संबद्ध कथा मानवी जीवनातून लोप पावत चालल्या आहेत, ही वस्तुस्थिती असली, तरी मानवाच्या आद्य अबोध समूहमनाच्या अनुभवांचे काही साचे आपोआप पिढ्यान् पिढ्या जतन होऊन जगभरच्या आधुनिक साहित्यातही ते पुनःपुन्हा येतात. आद्य अनुभवांचे काही कल्पनाबंधही (मोटिफ) वारंवार पुनरावृत्त होताना दिसून येतात. त्यात अनेक आदिकल्पनाबंध (आर्किटाइम) असतात व ते अत्याधुनिक साहित्यातही लेखकाच्या नकळत अवतरतात. एका अर्थाने आधुनिक युगातही लोककथांच्या जतन-संवर्धनाची ही मूलभूत प्रवृत्ती भूत, वर्तमान, भविष्याशी सांधे जोडत असल्याचे दिसून येते.
लेखिका: तारा भवाळकार
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/25/2020
मानवी समाजाच्या सांस्कृतिक बदलांची सापेक्ष संक्रमण...
राज्यातील संस्कृतीचे जतन करण्यासाठी तसेच त्यामध्ये...
चित्रपट उद्योगाचे संस्थापक श्री.दादासाहेब फाळके या...
गुजरातची राजधानी गांधीनगर असून राज्याचे भौगोलिक क्...