অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सांस्कृतिक पश्चायन (कल्चरल लॅग)

मानवी समाजाच्या सांस्कृतिक बदलांची सापेक्ष संक्रमणावस्था. पश्चायन हा संस्कृत शब्द पश्च (पाठीमागे) आणि अयन (मार्गक्रमण-कालक्रमण) या दोन शब्दांचा सामासिक शब्द बनला असून त्याचा शब्दशः अर्थ परागती असा आहे. समाजांमध्ये सतत सामाजिक बदल होतात; परंतु या बदलांची गती आणि दिशा सारख्या नसतात. हा सांस्कृतिक बदल म्हणजे संकल्पनात्मक सूत्रीकरण होय. या बदलात विविध समाज आपली संरचना बदलतात. त्याला समाजांतर्गत व बाह्य अशी दोन्ही कारणे असतात. प्रागैतिहासिक व इतिहासकाळातील अनेक पुराव्यांवरून असे जाणवते की, संस्कृतीच्या आकृतिबंधात सतत बदल होत असतात. त्यांचे प्रकार, गती आणि दिशा भिन्न असतात. ते संथ असतात. हे सांस्कृतिक पश्चायन स्थितिशीलतेविरुद्घ बदलणाऱ्या सांस्कृतिक बदलांची समस्या होय.

सांस्कृतिक बदलांविषयी चार मूलभूत उदभवनारे  प्रश्न

  1. समाजांतर्गत व बाह्य बदल घडविणारे घटक कोणते?
  2. कोणत्या प्रक्रियेद्वारे सांस्कृतिक बदल घडतात?
  3. या बदलांचा अभ्यास करण्यासाठी सांप्रत कोणत्या पद्घती आणि नमुने उपलब्ध आहेत? आणि
  4. सांस्कृतिक बदल ही संकल्पना नवप्रवर्तन, क्रमविकास, अभिसंस्करण आणि जन्मस्थळ या नैसर्गिक घटकांच्या अभिसरणाशी संलग्न असते का? अर्थात सांस्कृतिक बदलाची गती आणि दिशा यांना एकच एक घटक कारणीभूत नाही. काही मानवशास्त्रज्ञ परिस्थितिविज्ञान व आसमंत या घटकांवर भर देतात; तर  माक्स वेबरसारखे समाजशास्त्रज्ञ धार्मिक सैद्घान्तिक उपपत्ती याला कारणीभूत ठरते, असे मानतात; पण बहुतेक सर्व विद्वानांचे असे मत आहे, की परिस्थितिविज्ञान, दोन भिन्न संस्कृतींचा संपर्क वा अभिसरण आणि क्रमविकास (परिस्थितीनुसार जीवनशैलीत होणारे बदल) हीच प्रमुख कारणे असावीत; कारण संस्कृतीच्या भिन्नभिन्न अंगांच्या आपापसांतील संबंधांच्या अभ्यासानेच सांस्कृतिक पश्चायनाच्या सिद्घान्तास जन्म दिला आहे

सांस्कृतिक पश्चायन ही संकल्पना विल्यम ऑगबर्न (१८८६–१९५९) या समाजशास्त्रज्ञाने सोशल चेंज (१९२२) या ग्रंथात मांडली. त्याने असे निदर्शनास आणले की, एखादा महत्त्वाचा शोध संस्कृतीच्या एका अंगावरच परिणाम करतो; मात्र अन्य सांस्कृतिक क्षेत्रांत त्यासाठी सोय करावी लागते. आधुनिक संस्कृतीच्या विविध क्षेत्रांत एकाच गतीने परिवर्तन होत नाही. एखादे अंग कमी वेगाने परिवर्तित होते; तर दुसरे एखादे अधिक वेगाने परिवर्तित होते.

हा कालावधी सांस्कृतिक प्रक्रियेवर अवलंबून असतो. कित्येक वेळा कित्येक वर्षे हा बदल घडून येत नाही. त्यामुळे या अवस्थेस सांस्कृतिक अव्यवस्था म्हणतात. ऑगबर्न भौतिक आणि आध्यात्मिक संस्कृतींमध्ये फरक करतो. नवीन शोधांच्या द्वारे शास्त्र आपली भौतिक संस्कृती फार वेगाने बदलते. आध्यात्मिक संस्कृतीमध्ये साहित्य, कला, धर्म, चालीरीती, कौटुंबिक संबंध, वैवाहिक रिवाज इत्यादींचा वेगवेगळ्या स्वरूपांत समावेश असतो. या बाबींमध्ये बदल संथ गतीने होतात. याचा परिणाम असा होतो की, आपल्या संस्कृतीत सुव्यवस्था राहात नाही. भौतिक संस्कृती सुलभतेने आत्मसात केली जाते; परंतु आध्यात्मिक संस्कृती काही मर्यादेपर्यंतच आत्मसात केली जाते.

उदा., इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्षे राज्य केले. त्यांची पाश्चात्त्य भौतिक संस्कृती येथे रुजली; परंतु आध्यात्मिक संस्कृतीत भारतीयत्व अद्याप अवशिष्ट आहे; तथापि पाश्चात्त्य संस्कृतीची छाया भारतीयांच्या आचार-विचारांवर पडली आहे. हा सांस्कृतिक पश्चायनाचा परिणाम होय. सांस्कृतिक पश्चायनामुळे दोन सांस्कृतिक अवस्थांमध्ये सामाजिक अंतर पडते. याची विविध उदाहरणे समाजात दिसतात. नवीन शोधांच्या बदलांमुळे येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्याची सामाजिक स्थिती आधी निर्माण होणे आवश्यक असते, तसे झाले नाही तर पश्चायन होते.

ऑगबर्नची संकल्पना बऱ्याच समाजशास्त्रज्ञांनी मान्य केली आणि अनेकांनी त्यावर टीकाही केली. त्यांचा भौतिक-आध्यात्मिक संस्कृतीतील फरक अशास्त्रीय वाटतो. सर्वत्र तो फरक आढळत नाही. पश्चायन ही संकल्पना अमूर्त वाटते. ही संकल्पना विश्वव्यापी स्वरूपात लागू करता येत नाही. या बदलांचे अचूक मोजमाप करता येत नाही. ऑगबर्न यांच्या सांस्कृतिक पश्चायनाच्या सिद्घांताला निश्चितच मर्यादा आहेत.

 

संदर्भ : 1. Barnett, Homer G. Innovation : The Basis of Cultural Change, New York, 1951.

2. Ogburn, William Fielding, Social Change, New York, १९२२.

३.बाळ, शरयू; मेहेंदळे, य. श्री. समाजशास्त्र परिचय, पुणे, १९५९.

लेखिका: सुधा काळदाते

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate