অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लोकसाहित्याचा अभ्यास

परंपरा, नव्या दिशा, नवे संशोधन-लोकसाहित्य ही अभ्यासक व वाङ्‌मयेतिहासकार या दोघांकडूनही दीर्घकाळ उपेक्षित राहिलेली साहित्यशाखा आहे. शिवाय लोकसाहित्याची पू्र्ण व्याप्ती लक्षात न घेता केवळ वाङ्‌मयवाचक शाब्द रुपांवरच अधिक भर दिल्याने घोटाळे झाले आहेत. लोकसाहित्याचे अभ्यासक म्हणवणाऱ्यांनीही लोकसाहित्याची व्याप्ती पूर्णपणे ध्यानात न घेतल्याने केवळ पारंपारिक कथा, गीते, फार तर म्हणी, उखाणे यांच्या संकलनपुतीच लोकसाहित्याची व्याप्ती गृहीत धरली जाते. फार तर स्त्रीगीतांचे प्रशंसापर, आस्वाद्य रुपच वर्णिले जाते. यापेक्षा अधिक चिकित्सा होत नाही.

भारतीय लोकसाहित्याच्या अभ्यासाचा पाया

भारतीय लोकसाहित्याचे वर्गीकरण व व्यासंगपूर्ण निर्देश प्राचीन काळापासून आढळतात. तोल्काप्पियनररचित तोल्काप्पियम् (इ.स.पू.सु. तिसरे शतक) या प्राचीन तमिळ व्याकरण व साहित्यशास्त्राविष्यक ग्रंथांत लोकसाहित्यांसंबंधीचे सर्वांत आद्य निर्देश आढळतात. त्यात लोकसाहित्याचे काही घटक व वर्गीकरण यांसंबंधी विवेचन करण्याचा प्रयत्न आढळतो. म्हणी, उखाणे, दैवतकथा, लोकगीते आदींच्या व्याख्या त्यात दिल्या आहेत.

भारतीय संस्कृती, आचार, रुढी, दैवतकथा, भाषा यांच्या अभ्यासाला प्रारंभ यूरोपीय अभ्यासकांनी केला. त्यातून कलकत्ता येथे १७८४ मध्ये  एशियाटिक सोसायटी या संस्थेची स्थापना झाली. विल्यम जोन्स हे १७८२ मध्ये कलकत्त्याला सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून गेले होते. त्यांनी संस्थेचे मुखपत्रही सुरु केले होते व ते त्यातून आशियातील पुरातन कला, परंपरा, आचार विज्ञान, वाङ्‌मय यांवरील संशोधनपर लेखन प्रकाशित करीत असत. १८०४ मध्ये याच हेतूने मुंबईत ‘लिटररी सोसायटी’ ची स्थापना झाली. कर्नल जेम्स टॉड यांनी ॲनल्स अँटिक्विटीज ऑफ राजस्थान (२ खंड, १८२९-३२) हा ग्रंथ लिहून या क्षेत्रात पायाभूत कार्य केले.

रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना मुंबईतही झाली. संस्थेच्या इंडियन अँटिक्वरी या मुखपत्रातून लोकसाहित्यांतर्गत अनेक बाबींवर संशोधनपर लेखन प्रसिद्ध होत असे. प्रारंभी हे लेखन मानवशास्त्र व पुरावशेष (अँथ्रपॉलॉजी अँड अँटिक्विटीज) या विषयांखाली होत असे. भारतीय लोकजीवनाची व पुरातन मौखिक व लिखित साहित्याची अनेकांगांनी तपासणी करणारे हे लेखन होते. त्यात कथा-गाथांबरोबरच जादूटोणा, चेटूक, भुतेखेते, अंगात येणे, नरबलीप्रथा, प्राणी व वनस्पती यांच्या दैवतकथा, प्रर्वत, नद्या, सरोवरे यांच्या पूजा, जन्म-विवाह व मृत्युविषयक विधी, शपथा, प्रायश्चित्त अशा अनेक विषयांचा धांडोळा घेतला आहे. इंडियन अँटिक्वरी हे नियतकालिक १८७२ ते १९३३ या काळात चालू होते. या नियकालिकाने भारतीय लोकसाहित्याची बैठक पक्की केली. ते बंद पडल्यावर पुढे १९३८ पासून डॉ. प. कृ. गोडे यांच्या संपादकत्वाखाली न्यू इंडियन अँटिक्वरी नावाचे नियतकालिक पुणे येथून प्रकाशित होऊ लागले. पण तेही अल्पजीवीच ठरले.

यांखेरीज ‘बाँबे अँथ्रपॉलॉजिकल सोसायटी’ च्या (स्थापना १८८६) नियतकालिकानेही लोकसाहित्याभ्यासाला पोषक अशी कामगिरी बजावली. भारतीय लोकजीवनाच्या विविध अंगांचा मानवशास्त्राच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणे हा या संस्थेचा उद्देश होता.

भारतीय अभ्यासकांनी लोकसाहित्याचा अभ्यास पद्धतशीरपणे व जाणतेपणाने विसाव्या शतकात सुरु केला असला, तरी भारतविद्येचा अभ्यास जगाच्या पाठीवर आधीच सुरु झाला होता. भारतात इंग्रजी अंमस सुरु झाल्यावर सर विल्यम जोन्स (१९४६-९४) यांनी संस्कृत भाषाध्ययनाच्या रुपाने तौलनिक भाषाशास्त्राच्या निमित्ताने भारतीय साहित्य व संस्कृती यांविषयी जागतिक अभियासकांमध्ये कुतूहल निर्माण केले. पाठोपाठ तौलनिक दैवतशास्त्र आणि तौलनिक आचारशास्त्र, इतिहास इ. विषयांकडे अभ्यासक आकर्षित झाले.

भारतीय संस्कृती, आचार, रुढी, दैवतकथा, भाषा यांच्या अभ्यासाला प्रारंभ यूरोपीय अभ्यासकांनी केला. त्यातून कलकत्ता येथे १७८४ मध्ये एशियाटिक सोसायटी या संस्थेची स्थापना झाली. विल्यम जोन्स हे १७८२ मध्ये कलकत्त्याला सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून गेले होते. त्यांनी संस्थेचे मुखपत्रही सुरु केले होते व ते त्यातून आशियातील पुरातन कला, परंपरा, आचार विज्ञान, वाङ्‌मय यांवरील संशोधनपर लेखन प्रकाशित करीत असत. १८०४ मध्ये याच हेतूने मुंबईत ‘लिटररी सोसायटी’ ची स्थापना झाली. कर्नल जेम्स टॉड यांनी ॲनल्स अँटिक्विटीज ऑफ राजस्थान (२ खंड, १८२९-३२) हा ग्रंथ लिहून या क्षेत्रात पायाभूत कार्य केले.

रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना मुंबईतही झाली. संस्थेच्या इंडियन अँटिक्वरी या मुखपत्रातून लोकसाहित्यांतर्गत अनेक बाबींवर संशोधनपर लेखन प्रसिद्ध होत असे. प्रारंभी हे लेखन मानवशास्त्र व पुरावशेष (अँथ्रपॉलॉजी अँड अँटिक्विटीज) या विषयांखाली होत असे. भारतीय लोकजीवनाची व पुरातन मौखिक व लिखित साहित्याची अनेकांगांनी तपासणी करणारे हे लेखन होते. त्यात कथा-गाथांबरोबरच जादूटोणा, चेटूक, भुतेखेते, अंगात येणे, नरबलीप्रथा, प्राणी व वनस्पती यांच्या दैवतकथा, प्रर्वत, नद्या, सरोवरे यांच्या पूजा, जन्म-विवाह व मृत्युविषयक विधी, शपथा, प्रायश्चित्त अशा अनेक विषयांचा धांडोळा घेतला आहे. इंडियन अँटिक्वरी हे नियतकालिक १८७२ ते १९३३ या काळात चालू होते. या नियकालिकाने भारतीय लोकसाहित्याची बैठक पक्की केली. ते बंद पडल्यावर पुढे १९३८ पासून डॉ. प. कृ. गोडे यांच्या संपादकत्वाखाली न्यू इंडियन अँटिक्वरी नावाचे नियतकालिक पुणे येथून प्रकाशित होऊ लागले. पण तेही अल्पजीवीच ठरले.

यांखेरीज ‘बाँबे अँथ्रपॉलॉजिकल सोसायटी’ च्या (स्थापना १८८६) नियतकालिकानेही लोकसाहित्याभ्यासाला पोषक अशी कामगिरी बजावली. भारतीय लोकजीवनाच्या विविध अंगांचा मानवशास्त्राच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणे हा या संस्थेचा उद्देश होता.

अनेक आय्. सी. एस्. ब्रिटिश अधिकारी स्वत: या विषयात रस घेत. भारतातल्या वेगवेगळ्या जातिजमातींच्या चालीरीतींचे निरीक्षण करून भारतीय लोकसंस्कृतीचा मागोवा घेण्याचे कार्य त्यांनी केले. विविध  जातिजमातींविषयी माहितीपर पुस्तके त्यांनी लिहवून घेतली. सर रिचर्ड टेंपल, क्रुक, ए. एम्. टी. जॅक्सन, एन्थोवेन या आधिकाऱ्यांना भारतीय लोकजीवन व संस्कृती यांत विशेष रस होता. त्यांनी स्वत: लोकसाहित्याचा सूक्ष्म शोध घेतलेला दिसतो विशेषत: सर रिचर्ड टेंपल यांचे लेजंड्स ऑफ पंजाब (१८८३) हे पुस्तक महत्त्वाचे आहे. त्यांनीच लोककथांच्या संग्राहाची शास्त्रीय वर्गीकरणानुसार छाननी करण्याचे पहिले कार्य केले. हे वर्गीकरण आजही मार्गदर्शक ठरण्याजोगे आहे. भारतीय लोकसाहित्याच्या अभ्यासाला चालना देण्याच्या संदर्भात सर जॉर्ज ग्रीअर्सन यांनीही मौलिक कामगिरी बजावली. भारताच्या सर्व प्रदेशांतील भाषिक सर्वेक्षणाच्या (अ लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया ही ग्रंथमाला) अनुषंगाने त्यांनी भारतीय लोकसाहित्याच्या विविध घटकांवर उद्‌बोधक प्रकाश टाकला. यांखेरीज फोकलोअर फ्रॉम ईस्टर्न गोरखपूर (१८८३), सम बिहारी फोकसाँग्ज (१८८४), सम भोजपुरी फोकसाँग्ज (१८८६) इ. लोकसाहित्यविषयक ग्रंथांचे संकलन-संपादनही त्यांनी केले.

मराठी लोकसाहित्यावर इंग्रजी लिखाण करणाऱ्यांमध्ये मेरी फ्रीअर हिचा आरंभीच उल्लेख करावा लागेल. भारतावरील ब्रिटिश सत्तेच्या काळात मुंबईचे काही काळ गव्हर्नर असलेले सर बार्टल फ्रीअर ह्यांची मेरी ही कन्या. तिची दाई ॲना लिबर्टा डिसूझा हिचे घराणे मूळचे कालिकतचे. तिने मेरीला काही मराठी लोककथा सांगितल्या आणि मेरीने त्या ओल्ड डेक्कन डेज (१८६८) ह्या नावाने प्रसिद्ध केल्या. इंग्रजीत आणलेल्या ह्या मराठी लोककथांना यूरोपमधअये फार मोठी लोकप्रियता मिळाली.

जर्मन, हंगेरियन, डॅनिश अशा यूरोपीय भाषांत मेरीचे हे पुस्तक अनुवादिले गेले आणि अशा प्रकारे मराठी लोककथा ह्या युरोपीय भाषांत निवेदिल्या गेल्या. हिंदी आणि गुजारातीतही ह्या लोककथांची भाषांतरे झाली. सशस्त्र क्रांतिकारकांच्या गोळीला बळी पडलेले नाशिकचे जिल्हाधिकारी ए. एम्.टी. जॅक्सन ह्यांनीही मराठी व गुजराती लोकसाहित्याचा अभ्यास चालविला होता. फोकलोअर ऑफ द कोंकण हा त्यांचा ग्रंथ १९१५ साली प्रसिद्ध झाला. ह्यात सणवार, व्रतवैकल्ये इ. विषयांचा परामर्श घेतला असून त्यांच्याशी संबंधित अशा दंतकथाही अंतर्भूत केलेल्या आहेत. फोकलोअर ऑफ बॉम्बे (१९२४) हे आर्. इ. एन्थोवेन ह्यांचे पुस्तक म्हणजे जॅक्सन ह्यांच्या पुस्तकाची सुधारुन वाढविलेली आवृत्ती आहे, म्हटले तरी चालेल. लौकिक दंतकथा ह्या नावाने गो. म. कालेलकर ह्यांनी केलेला ह्या पुस्तकाचा अनुवाद १९३४ मध्ये प्रसिध्द झाला. किंकेड ह्यांच्या डेक्कन नर्सरी टेल्स (१९२४) मध्ये  मराठी कहाण्या इंग्रजीत अनुवादिल्या आहेत.

शरच्चंद्र रॉय यांच्या संपादकत्वाखाली आणि वरील पाश्चिमात्य अभ्यासकांच्या मदतीने १९२१ मध्ये मॅन इन इंडिया हे मानवशास्त्रविषयक नियतकालिक सुरु झाले. पण त्यांनी केवळ अनुवादच केले. प्रांतीय लोकसाहित्य-संकलनाला मात्र त्यामुळे उत्तेजन मिळाले.

मानवशास्त्रांतर्गत संस्कृती व लोकसाहित्य या दृष्टीने पाश्चिमात्य संशोधकांना भारत ही नेहमीच समृद्ध भूमी वाटत आली आहे. त्यांचे प्रयत्न सैद्धांतिक विश्लेषणाचे आहेत. भारतीय अभ्यासक मात्र अजूनही बरेचसे संकलन-संग्रहाच्या भूमिकेतच गुंतलेले आहेत. फार तर काहीशी आत्मगौरवपर, भाबडी, रसग्रहणात्मक भूमिका काहींनी घेतली आहे. लोकसाहित्याच्या पाश्चिमात्य अभ्यासकांचे विविध संप्रदाय आहेत. समाजशास्त्र, मानवशास्त्र, भाषाशास्त्र, मानसशास्त्र इ. विविध अभ्यास-संप्रदायाच्या दृष्टिकोणांतून हे अभ्यासक काम करताना दिसतात.

भारतीय लोकसाहित्याभ्यासकांनी मात्र स्वत:ला कोणत्याच संप्रदायाशी बांधून घेतलेले नाही. त्यांचे क्षेत्र मुक्त आहे. कोणतीच सैद्धांतिक भूमिका नसल्याने, भारतीय अभ्यासकांमध्ये एक प्रकारचा विस्कळीतपणा आहे. परंतु ते पूर्वग्रहांपासून अलिप्त आहेत. तरीही आता भारतीय अभ्यासकांनी सैद्धांतिक विश्लेषण करणे आवश्यक आहे. गेल्या शंभर-दीडशे वर्षात भारतभर लोककथा, लोकगीत,. म्हणी व वाक्‌प्रचार व अन्य लोकसाहित्यविषयक संकलने मात्र मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. उदा., बंगालमध्ये १८३२ मध्ये म्हणी व  वाक्‌प्रचार यांच्या संकलन - प्रकाशनास प्रारंभ झाला. रेव्ह्. डब्ल्यू. मार्टनने बेंगॉली प्रॉव्हर्ब्ज दोन खंडांत (१८३२, १८३५) प्रकाशित केले. रेव्ह्. जेम्सचे बेंगॉली प्रॉव्हर्ब्ज (दोन खंडांत - १८६८,१८७२) प्रकाशित झाले. कनाईलाल घोष यांनी १८९१ मध्ये आपले म्हणी व वाक्‌प्रचार ह्याचे संकलन प्रकाशित  केले. १८९६ मध्ये सम आसामीज प्रॉव्हर्ब्ज हे संकलन गूरदॉने प्रसिद्ध केले. त्यानंतर जमशेटजी पेटिट यांनी गुजराती म्हणींचा संग्रह प्रसिद्ध केला. नटेशशास्त्री यांनी फेमिलिअर तमिळ प्रॉव्हर्ब्ज प्रकाशित केल्या.

१८६८ मध्ये रविपती गुरुवायुरु यांनी अ कलेक्शन ऑफ तेलुगू प्रॉव्हर्ब्ज प्रसिद्ध केले. १८४५ मध्ये जी. रोचीराय यांनी हँडबुक ऑफ सिंधी प्रॉव्हर्ब्ज प्रसिद्ध केले. बंगाली लोकसाहित्याच्या अभ्यासास चालना देऊन त्यात लोकरुची निर्माण करण्यात रवींद्रनाथ टागोर यांचे कार्य प्रेरणादायक ठरले. कलकत्ता विद्यापीठ व ‘वंगीय साहित्य परिषद’, कलकत्ता या संस्थांनीही मोलाचे कार्य केले आहे.  डॉ. दिनेशचंद्र सेन यांनीही लोकसाहित्याच्या व्यासंगात अभ्यासकांना रूची निर्माण व्हावी, म्हणून पायाभूत कार्य केले.  डॉ. कालिदास नाग यांच्या अध्यक्षतेखाली ‘वंगीय लोकसंसस्कृती परिषदे’ स्थापना १९५० मध्ये झाली. बंगालमध्ये १९६२ मध्ये ‘रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ फोक कल्चर’ या लोकसाहित्य-संशोधन केंद्राची स्थापना झाली. या संस्थेने विपुल लोकगीतांचे संकलन केले व एन्‌सायक्लोपीडिया ऑफ बेंगॉली फोकसाँग्ज हा कोश चार खंडांत प्रकाशित केला. याखेरीज इंग्रजी अंमलापासूनच जिल्हा गॅझेटीअरांमधून त्या त्या जिल्ह्याची सांस्कृतिक माहिती देण्याची प्रथा सुरु झाल्याने लोकसाहित्याची जिल्हावार थोडीफार माहिती त्यातून मिळू शकते. राजस्थान, म्हैसूर या ठिकाणी लोकसाहित्याभ्यासाची स्वतंत्र केंद्रे स्थापन झाली आहेत.

महाराष्ट्रातही स्वातंत्र्योत्तर काळात ‘लोकसाहित्य समिती’ स्थापन झाली (१९५६). चिं. ग. कर्वे हे तिचे पहिले अध्यक्ष होते. या समितीने महाराष्ट्रातील लोकसाहित्यसंकलनाचे व्यापक प्रयत्न केले आहेत. मात्र ही संकलने मोठ्या प्रमाणावर कथा-गीतांचीच संकलने आहेत. महाराष्ट्रातील सण-उत्सवांची माहिती संगृहीत करण्याचा एक प्रयत्न अलीकडे झाला आहे. परंतु लोकसाहित्याच्या सैद्धांतिक अभ्यासाचे प्रयत्न या समितीने अद्याप केलेले नाहीत. लोकसाहित्य-संकलनाची पंचविसांपेक्षा अधिक लहानमोठी पुस्तके समितीने प्रकाशित करून पुढील अभ्यासकांसाठी भरपूर सामुग्रीचे संकलन करून ठेवले आहे. १९७९-८० मध्ये काही नवीन अभ्यासकांनी डॉ. प्रभाकर मांडे यांच्या पुढाकाराने एकत्र येऊन ‘लोकसाहित्य संशोधन मंडळ’ या संस्थेचा प्रारंभ केला. आधीपासूनच लोकसाहित्यामध्ये चिकित्सक अभ्यास व संशोधन करणारे डॉ. मांडे, डॉ. रा. चिं. ढेरे, दुर्गा भागवत, प्रा. नरहर कुरुंदकर यांनी या मंडळांची मुहूर्तमेढ रोवली. तेव्हापासून दर वर्षी लोकसाहित्य संशोधन मंडळ महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी अभ्यासकांची एक परिषद घेते. औपचारिक-अनौपचारिक पद्धतीने अभ्यास करणारे लोकसाहित्याचे अभ्यासक तेथे एकत्र येतात आणि शोधनिबंध सादर करतात.

गेल्या पंधरा वर्षात महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतून मराठी साहित्याच्या विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर स्तरावर लोकसाहित्य हा विषय अभ्यासक्रमात नेमला गेला असल्यानेही अभ्यासकांचे लक्ष या विषयाकडे विशेषत्वाने वेधले आहे.

संदर्भ : 1. Danieis, C. L.; Stevans, C. M. Ed. Encyclopedia of Superstitions, Folklore, and the Occult Sciences of the World, London, 1971.

2. Dorson, Richard, Ed. Folklore : Selected Essays, Bloomington, 1972.

3. Leach, Maria, Ed. Dictionary of Folklore, Mythology qnd  Legend, New York, 1949.

4. Reaver, J. Russell; Boswell, George W. The Fundamentals of  Folk Literature, London, 1962.

5. Thompson, Stith, Motif-Index of Folk- Literature Bloomington,  1955-58.

६. अग्रवाल, वासुदेवशरण, प्राचीन भारतीय लोकधर्म, अहमदाबाद, १९६४.

७. गोडसे, द. ग. लोकघाटी, मुंबई, १९७९.

८. जोशी, लक्ष्मणशास्त्री, संपा. राजवाडे लेखसंग्रह, दिल्ली, १९५८.

९. ठाकुर, रवींद्रनाथ, अनु. व संपा. भागवत, दुर्गा, लोकसाहित्य, मुंबई, १९६७.

१०. ढेरे, रा. चि. लोकसंस्कृतीची क्षितिजे, पुणे, १९७१.

११. ढेरे, रा. चि. लोकसंस्कृतीचे उपासक, पुणे, १९६४.

१२. ढेरे, रा. चि. लोकसाहित्य : शोध आणि समीक्षा, पुणे १९९०.

१३. ढेरे, रा. चि. संतसाहित्य आणि लोकसाहित्य : काही अनुबंध, पुणे, १९७८.

१४. दाते, शं. ग. लोककथा, भाग १ व २, पुणे १९२९.

१५. परांजपे, तारा, आंध्र-महाराष्ट्र : सांस्कृतिक अनुबंध, औरंगाबाद, १९९१.

१६. बाबर, सरोजिनी, संपा. लोकसाहित्य : भाषा आणि संस्कृति, पुणे, १९६३.

१७. भवाळकर, तारा, लोकनागर रंगभूमी, पुणे १९८९.

१८. भवाळकर, तारा, लोकसंचित, पुणे १९९०.

१९. भवाळकर, तारा, लोकसाहित्यातील स्त्रीप्रतिमा, पुणे, १९८६.

२०. भागवत, दुर्गा, लोकसाहित्याची रुपरेखा, पुणे, १९७७.

२१. मराठे, रा. वि. संपा. गावगाडा शब्दकोश, मुंबई, १९९०.

२२. मांडे, प्रभाकर, लोकसाहित्याचे अंत:प्रवाह, पुणे, १९७५.

२३. मांडे, प्रभाकर, लोकसाहित्याचे स्वरुप, औरंगाबाद, १९८९.

२४. मोरजे, गंगाधर, लोकसाहित्य : एक स्वतंत्र अभ्यासक्षेत्र, पुणे, १९८५.

२५. व्यवहारे, शरद, लोकसाहित्य : उद्‌गम आणि विकास, नागपूर, १९८७.

लेखिका : तारा भवाळकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate