অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मार्केटचा अभ्यास करीत शेतीत घडवले बदल

मार्केटचा अभ्यास करीत शेतीत घडवले बदल

भात, ढेमसे, काकडी यांची सुधारित शेती

शेतीत प्रयोगशीलता व मार्केटचा अभ्यास या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.महाराष्ट्रातील तुमसर (जि. भंडारा) येथील सुनील पारधी त्याच गुणांचा अवलंब करीत भात, ढेमसे (ढेणस), काकडी व अन्य भाजीपाला पिकांची सुधारित पद्धतीने शेती करतात. शेती अधिकाधिक सुलभ व्हावी यासाठी विविध तंत्रांचा होणारा वापर त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला आहे. 
भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील सुनील पारधी यांचे वडील संपतराव पारधी पारंपरिक पद्धतीने धान (भात) शेती कसत होते. त्यांच्याकडे जेमतेम अडीच एकर शेती. सुनील यांनी 2001 पासून शेतीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. तत्पूर्वी वडिलांसोबत त्यांनी शेतीचे धडे गिरविले होते. सन 2002-03 मध्ये त्यांनी सिंचन सुविधा बळकटीकरणांतर्गत बोअरवेल घेतले.

खरिपात धान आणि रब्बी गहू

खरीप हंगामात भंडारा जिल्ह्यात सर्वदूर धान लागवड होते. सुनीलदेखील आपल्या शिवारात धान लागवड करतात. मॉन्सूनच्या पावसावर धान शेती असताना सुमारे 110 दिवसांत परिपक्‍व होणाऱ्या वाणांवर त्यांचा भर असायचा. पाण्याची सुविधा झाल्यानंतर आता सुमारे 140 दिवसांत परिपक्‍व होणाऱ्या वाणांना त्यांनी पसंती दिली आहे.

सुधारित पद्धतीची भात लागवड

पारधी हे सघन पद्धतीने (एसआरआय) भात लागवड गेल्या सहा ते सात वर्षांपासून करीत आहेत. त्यातून पूर्वीच्या एकरी बियाणे वापरात बचत होऊन एकरी केवळ दोन क्विंटल बियाणे ते लागवडीसाठी वापरतात. गादीवाफ्यावर नर्सरी तयार करून सुमारे 18 ते 21 दिवसांच्या रोपांची पुनर्लागवड ते करतात. नऊ बाय 12 व नऊ बाय 18 इंच अशा दोन लागवड पद्धतींचा प्रयोग त्यांनी केला आहे. पारंपरिक भात शेतीत एकरी 12 ते 14 क्‍विंटल उत्पादन त्यांना मिळायचे. एसआरआय पद्धतीत मागील वर्षी एकरी 28 क्विंटल व यंदाही त्यांना एकरी त्या दरम्यानच उत्पादन मिळाले आहे.

माल वखारीत ठेवून योग्य वेळी विक्री

भाताचा एकूण खर्च (काढणी, मळणीसह) 17 हजार रुपयांपर्यंत येतो. पारधी पीककाढणीनंतर त्वरित विक्री करीत नाहीत. भाताला एरवी क्विंटलला 2100 ते 2200 रुपये दर असतो. मात्र वखार महामंडळाकडे चार ते पाच महिने शेतमाल ठेवल्यानंतर अनुकूल दर स्थितीत भाताची 2700 ते 2800 रुपये दराने विक्री केली जाते.

मार्केटनुसार भाजीपाला लागवड

पारधी पूर्वी गव्हाची शेती करायचे; परंतु मार्केटची मागणी लक्षात घेऊन त्यांनी गव्हाऐवजी विविध भाजीपाला लागवडीला प्राधान्य दिले आहे. अलीकडील काळात ढेमसे (ढेणस,हिंदी-टिंडा) व काकडी या पिकांवर त्यांनी भर दिला आहे. त्यासाठी प्लॅस्टिक आच्छादनाचा (मल्चिंग) चा वापर केला आहे. मागील वर्षी या पिकांची अनुक्रमे 15 गुंठे व 20 गुंठे क्षेत्रावर लागवड केली. ढेमसे 45, 54 व कमाल 60 रुपये प्रति किलो दराने विकले. त्याचे उत्पादन 7200 किलो झाले. काकडीला सरासरी 15 रुपये प्रति किलोचा दर मिळाला. आठ टनांपर्यंत उत्पादन झाले. या दोन पिकांव्यतिरिक्त कारली, वांगी, भेंडी यासारख्या पिकांची देखील उर्वरित क्षेत्रावर लागवड केली जाते. तुमसर येथे मार्केट आहेच; पण ढेमसे व काकडी भंडारा, गोंदिया, नागपूर येथेही पाठवली जाते. नजिकच्या मध्य प्रदेशातही काही वेळा माल पाठवला जातो. हा भाजीपाला सतत काढणीस येत असतो, त्यामुळे त्यापासून ताजा पैसा मिळत राहतो. मार्केटची मागणी लक्षात घेत लागवडीचे नियोजन करीत असल्याने दरातील तेजीचा फायदाही मिळतो.

कमी खर्चाचे शेतीला कुंपण

मासेमारीच्या "आठ बोटी' जाळीचा वापर कमी खर्चाच्या कुंपणासाठी केला आहे. सुमारे सातशे रुपये प्रति किलो दराने ही जाळी बाजारात मिळते. नऊ किलो जाळीचा वापर केला जातो. जाळी लावण्यासाठी बांबूचा वापर होतो. जाळीची दहा फुटांची उंची असल्याने शिवारात गुरे, जंगली प्राणी, माकड येत नाहीत. जाळी पांढरी असल्याने उन्हामुळे किरणे "रिफ्लेक्‍शन'चा भास होऊन जनावरे कुंपणापासून लांब जातात असे पारधी यांनी सांगितले.

शेणखताचा वापर

एकरी चार ट्रॉली शेणखताचा वापर दर वर्षी करतात. शेणखताच्या उपलब्धतेकरिता चार जनावरांचे संगोपन केले आहे. जमिनीचा पोत राखण्याच्या हेतूने शेणखत उपयोगी पडते.

पाण्याचा टॅंक आणि मजुरांचा निवारा

बोअरवेल अवघी एक इंची असल्याने त्यामधून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या दाबातून ठिबक संच चालणे अवघड आहे. ही बाब लक्षात घेता शेतात कॉंक्रीटच्या टॅंकची उभारणी केली आहे. एक लाख 60 हजार रुपयांचा खर्च त्यासाठी आला. सुमारे 85 हजार लिटर क्षमतेचा हा टॅंक असून, या टॅंकच्या भोवतालच्या जागेचा वापर व्हावा याकरिता त्यावरील बाजूस मजुरांकरिता निवारा उभारला आहे. टॅंकमधील पाणी शेतात पोचवण्यासाठी सायफन पद्धतीचा अवलंब केल्याने विजेची बचत झाली आहे.

ठिबक संचाकरिता व्यवस्था

ठिबक संचाचे काम झाल्यानंतर काही शेतकरी शेतातील झाडाला नळीची गुंडाळी करून ठेवतात. झाडावरील नळ्यांना उंदीर तसेच अन्य प्राण्यांचा धोका राहतो. त्या पार्श्‍वभूमीवर पारधी यांनी शेताच्या बांधावर सिमेंट पोल लावत त्यावर लोखंडी ऍगल बसविले. हंगामात ठिबकचे काम संपल्यानंतर नळी त्या लोखंडी अँगलवर व्यवस्थित ठेवली जाते, त्यामुळे ठिबक नळीचे आयुष्य वाढण्यास मदत होते असे ते सांगतात. 
संपर्क- सुनील पारधी - ९४२२१३२६९६

स्त्रोत: अॅग्रोवन© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate