অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कैलास

कैलास

कैलास

हिमालयातील पवित्र यात्रास्थान. तिबेटच्या नैॠत्येस, लडाख पर्वतश्रेणीच्या पलीकडे ८१ किमी. वर, सु. ८०पू. ते ८५पू. यांदरम्यान काश्मीर ते भूतानपर्यंत पसरलेल्या ३२ किमी. रुंदीच्या कैलास पर्वतश्रेणीत ३१ ५' उ. ८१ २०' पू. येथे ल्हाचू व झेंगचू टेकड्यांनी वेढलेला कैलास पर्वत आहे. येथील हवा थंड व कोरडी आहे.

मानसरोवराजवळ उगम पावणाऱ्या सतलज व ब्रह्मपुत्रा यांचे उगम कैलास पर्वताच्या दक्षिणेस व सिंधूचा उगम त्याच्या उत्तरेस आहे. त्याच्या पूर्वेस गौरीकुंड आहे. कैलास पर्वताचे उत्तर टोक म्हणजे कैलास शिखर, त्याची उंची ६,७१४ मी. असून त्याला चार बाजू आहेत. हे सदैव हिमाच्छादित असते. याच्याभोवती तांबूस रंगाचे १६ डोंगर आहेत. शिखराचा आकार प्रचंड शिवलिंगासारखा असून ते सोळा पाकळ्यांच्या कमळात ठेवल्यासारखे दिसते.

पुराणांतरी याला शिवपार्वतीचे वसतिस्थान मानले आहे. कुबेराची अलकानगरीही येथेच होती असे वर्णन आहे. हिंदूंना हे स्थान अत्यंत पवित्र वाटते आणि कैलासाची व त्याच्या दक्षिणेच्या मानसरोवराची यात्रा झाली, म्हणजे जन्माचे सार्थक झाले असे ते मानतात. जैन याला अष्टापद म्हणतात व पहिला तीर्थंकर ऋषभदेव यांचे निर्वाण येथे झाले असे मानतात. तिबेटी साहित्यात याला कांग्रेन पोचे म्हणतात. तिबेटी बौद्धांच्या मते येथील अधिष्ठात्री देवता धर्मपाल (डेमचोक) हा त्रिशूळ व डमरुधारी, गळ्यात रुंडमाळा असलेला, व्याघ्रचर्म पांघरणारा आहे.

हिंदूंच्या प्राचीन धर्मग्रंथांत व साहित्यात याला मेरू, हेमकूट, हिरण्यशृंग, शंकरगिरी, कुबेरशैल, गण, रजताद्री, वैद्युत इ. अनेक नावे आहेत. शिव, ब्रह्मा, मरीची, रावण, भस्मासूर इत्यादींनी येथे तप केले. व्यास, श्रीकृष्ण, अर्जुन, भीम, दत्तात्रय व अनेक ऋषिमुनिसाधकादींनी येथे वास्तव्य केले होते असे उल्लेख आहेत. कैलास शिखरावर चढून जाणे अशक्यप्राय असल्यामुळे यात्रेकरू कैलास पर्वतालाच प्रदक्षिणा घालतात. ही परिक्रमा ५२ किमी. आहे.

उत्तर प्रदेशातील अलमोड्याहून अस्कोट, खेल, गर्बिअँग, लिपूलेह खिंड, तक्लाकोट व कैलास हा प्रवासमार्ग ३८६ किमी. आहे. तक्लाकोट - तारचेन मार्गावर मानसरोवर असून तारचेन ते परत तारचेन अशी केलासाचे परिक्रमा आहे. १९६२ च्या चीन - भारत संघर्षानंतर चिनी निर्बंधामुळे भारतीयांना या यात्रेस जाणे अशक्यप्राय झाले आहे.

 

कुमठेकर, ज. ब.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate