क्षेत्रफळाने व लोकसंख्येने जगातील पहिल्या क्रमांकाचे खंड. आशिया खंडाने पृथ्वीच्या एक अकरांश तसेच एकूण भूभागाच्या एक तृतीयांश व आफ्रिकेच्या दीडपट क्षेत्र व्यापले आहे. आशियाचे क्षेत्रफळ बेटांसह ४,४६,००,८५० चौ. किमी. व लोकसंख्या एकून पृथ्वीच्या लोकसंख्येच्या जवळजवळ दोन तृतीयांश, सु. १९८·८ कोटी (१९६९) आहे. विषुववृत्ताच्या एक अंश उत्तरेस आशियाचा मलेशिया भाग येतो, तेथपासून रशियाच्या केप चेल्यूस्किनपर्यंत (७८० उ.) आशियाचा दक्षिणोत्तर सलग भूभागाचा पसारा असून पूर्वपश्चिम पसारा २६० पू. ते १७०० प. इतका आहे.
आशियाचा मध्यभाग महासागरांपासून सु. ३,२०० किमी. हून अधिक दूर आहे. ग्रीकांनी सूर्य उगवणाऱ्या बाजूचा म्हणून ‘आसू’ नांव दिले तेच खंडाला रूढ झाले असून त्यात जगातील सर्वात उंच शिखर (एव्हरेस्ट), सर्वात खोल भूभाग (मृतसमुद्र), सर्वात जास्त तपमानाचे स्थान (जेकबाबाद), सर्वात कमी तपमानाचे स्थान (व्हर्कोयान्स्क), सर्वात जास्त पावसाचे समजले जाणारे ठिकाण (चेरापुंजी), सर्वात कमी पर्जन्यमानाचा वाळवंटी प्रदेश, जास्तीत जास्त दाट लोकवस्तीचा भाग (इंडोनेशिया, चीन, भारत), अगदी विरळ लोकवस्तीचा भाग (वाळवंटे, सायबीरिया) आढळून येतात. विविध लोक, वनस्पती व खनिज पदार्थ यांनी खंड समृद्ध असून जगातील मानवाची उत्पत्ती तसेच अनेक धर्माचे मूलस्थान आशियातच मिळते. आशिया खंडाच्या उत्तरेस आर्क्टिक महासागर असून दक्षिणेस हिंदी महासागर आहे.
या खंडात भारत, श्रीलंका (सिलोन), पाकिस्तान, बांगला देश, ब्रह्मदेश, नेपाळ, भूतान, सिक्कीम, अफगाणिस्तान, इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमीर राज्ये, कॉटार, बहरीन, ओमान, दक्षिण येमेन, येमेन, जॉर्डन, सिरिया, इझ्राएल, लेबानन, तुर्कस्तान, रशियाचा आशियांतर्गत भाग, मंगोलिया, चीन, तैवान, उत्तर व दक्षिण कोरिया, जपान, नाऊरू, फिलीपीन्स, उत्तर व दक्षिण व्हिएटनाम, लाओस, ख्मेर (कंबोडिया), थायलंड, मलेशिया, सिंगापूर, ब्रूनाइ, इंडोनेशिया व मालदीव हे देश असून, ब्रिटिश सत्तेखालील हाँगकाँग, पोर्तुगीज सत्तेखालील माकाऊ व तिमोर बेटांचा भाग आणि अरबस्तानातील काही अशासकीय प्रदेश यांचाही त्यात समावेश होतो. ईजिप्तचा सिनाई भाग आशियातच मोडतो; तसे काहींच्या मते सायप्रस बेटही आशियातच येते.
आशिया खंडाची घडण अतिशय जटिल स्वरूपाची समजली जाते. आशिया व आफ्रिका खंडे पूर्वी जोडलेली होती. तुर्कस्तान ते जपानपर्यंत गेलेल्या अनेक पर्वतरांगांच्या ठिकाणी पुराजीव व मध्यजीव कालखंडांत टेथिस हा मोठा समुद्र होता. टेथिसच्या उत्तरेस अंगाराभूमी हा प्रतिकारी खडकाचा भूभाग होता तर दक्षिणेकडे गोंडवनभूमी हाही तसाच प्रदेश होता. टेथिसच्या भूद्रोणीमध्ये गाळाचे थर साठले आणि गिरिजनक हालचालींमुळे मध्यजीव कालखंडाच्या अखेरीस व विशेषत: नूतनजीव कालखंडात त्या भागावर दाब पडून तेथे वलीपर्वतांच्या अनेक मालांचा जटिल भूभाग तयार झाला. आफ्रिका व आशिया विभागले जाऊन अंगारा व गोंडवनभूमी एकत्र जोडल्या गेल्या.
अरबस्तान, दक्षिण आफ्रिका व दख्खनचे पठार ह्या भागांना मात्र धक्का लागला नाही; त्यांवर नंतरच्या काळातील थर साचले तरी मूळ गाभा कायम राहिला. तुर्कस्तानपासून पूर्वेकडे गेलेल्या पर्वतरांगांच्या दरम्यान विस्तीर्ण पठारे निर्माण झालेली आहेत. तुर्कस्तानच्या उत्तरेस पाँटस व दक्षिणेस टॉरस पर्वत असून त्यांच्यामध्ये ॲनातोलियाचे पठार आहे. पाँटस व टॉरस हे आर्मेनिया पर्वतमंडलात एकत्र येतात. तेथून पुढे उत्तरेकडून एल्बर्झ, खुरासान व दक्षिणेकडून झॅग्रॉस, मकरान पर्वतरांगा जातात. या दोन्हींच्या दरम्यान इराण-अफगाणिस्तानचे पठार आहे.
अफगाणिस्तानच्या पूर्वेस जगाचे छप्पर म्हटले जाणारे पामीरचे पठार आहे. हे वस्तुत: एक पर्वतमंडलच आहे. याच्या सर्व दिशांस अजस्र पर्वतरांगा दूरवर पसरल्या आहेत; नैर्ऋत्येस हिंदुकुश, त्याच्या दक्षिणेस सुलेमान, आग्नेयीस हिमालय व त्याच्या उत्तरेस काराकोरम, पूर्वेस कुनलुन व आस्तिन ता, ईशान्येस तिएनशान आणि वायव्येस ट्रान्सआलाई व हिस्सार या पर्वतरांगा आहेत. कुनलुन व हिमालय यांच्या दरम्यान तिबेटचे विस्तीर्ण पर्वतांतर्गत पठार आहे. तसेच कुनलुन व तिएनशान यांच्या दरम्यान ताक्ला माकान हे वाळवंटी पठार आहे. तिएनशानच्या ईशान्येस अल्ताई, सायान, याब्लोनाय, स्टॅनोव्हॉय, व्हर्कोयान्स्क, चेर्स्की, कोलीमा आणि अनादीर या पर्वतशाखा जवळजवळ बेरिंग समुद्रापर्यंत गेल्या आहेत. हिमालयाची रांग आग्नेयीकडे इंडोनेशियापर्यंत पसरली आहे; ईशान्य भारतातील गारो, खासी, जैंतिया वगैरे टेकड्या, तसेच उत्तर ब्रह्मदेशातील, अंदमाननिकोबारमधील व इंडोनेशियातील पर्वत हे हिमालयाचेच विस्तार होत.
कुनलुनचे फाटे चीनमध्ये गेले आहेत; चीनमध्ये त्याला चिनलिंग (त्सिनलिंग) नाव आहे. आस्तिन ताच्या चीनमधील फाट्यास नानशान व मंगोलियातील फाट्यास शिंगान पर्वत म्हणतात. चीनमध्ये यूनान, सेचवान आणि मंगोलियात गोबी वाळवंट हे पठारी प्रदेश वरील पर्वतरांगांनी व्यापले आहेत.
पर्वतनिर्मितीचे चार प्रमुख कालखंड आशियात होऊन गेलेले आहेत. दोन कँब्रियनपूर्व ढालप्रदेश येथे स्पष्ट दिसतात. उत्तरेकडे अंगाराभूमी आणि कारा व चुक्ची समुद्रात निमज्जन पावलेला भाग यांच्या मानाने दक्षिणेकडील अरेबिया व द्वीपकल्पीय भारत यांना समाविष्ट करणाऱ्या गोंडवनभूमिप्रदेशावर गिरीजनक हालचालींचा परिणाम कमी झालेला दिसतो. त्या काळात हे भूप्रदेश खूपच विस्तीर्ण होते; आणि त्या दोहोंमध्ये टेथिस नावाचा समुद्र होता. दक्षिण चीनमध्ये व चिहली आखाताभोवतीही असा एक स्थिर प्रदेश होता. कँब्रियनपूर्व काळात आशियात कोणत्या गिरिजनक हालचाली झाल्या त्याची माहिती फारशी उपलब्ध नाही; तथापि दक्षिण भारतात अशी हालचाल होऊन गेली असावी.
कँब्रियन ते डेव्होनियन काळात आलेल्या कॅलिडोनियन हालचालींचा पुरावा सायान व अल्ताई पर्वतात दिसून येतो; मात्र त्यांचा बराच भाग नंतरच्या व्हर्कोयान्स्क रांगेच्या बलीकरणामुळे झाकला गेलेला आहे. औटर मंगोलिया, इंडोचायना व हिमाचलप्रदेशातही ही हालचाल मोठ्या प्रदेशावर झाली असावी. कारा व चुक्ची समुद्रकेंद्रांभोवतीही सेव्हर्नाया झीमल्या व न्यू सायबीरियन बेटे येथे तिचे परिणाम दिसून येतात. कार्बॉनिफेरस ते ट्रायासिक काळात झालेली अल्ताइड गिरिजनक हालचाल अधिक विस्तृत प्रमाणावर होती. नॉव्हाया झीमल्याच्या पश्चिमेस कारा समुद्राभोवती पुन्हा वलीकरण झाले. आणि त्याचा परिणाम उरल पर्वतातही दिसून येतो.
पश्चिम सायबीरियन मैदानावर नंतर साचलेल्या गाळथरांखाली यावेळच्या वळ्या असाव्यात आणि कझाकच्या उंच प्रदेशातील रचनाही या वळ्यांचाच विस्तार असावा. त्यांचाच संबंध पुढे अंगाराभूमीच्या नैर्ऋत्यभागातील अल्ताईस तार्बगाताई व झुंगेरियातील अला-तौ इ. वलीपर्वतश्रेणींशी दिसतो. मध्यआशियाचा बराच भाग यावेळी तयार झाला. पश्चिमेस फरगाना, तारीम व पूर्वेस ऑर्डास हे भाग स्थिर होते; ते पुढे खचून तेथे द्रोणीप्रदेश तयार झाले व त्यांभोवती वलीपर्वतांच्या रांगा वर उचलल्या गेल्या. पूर्वपश्चिम गेलेले आस्तिन ता, नानलिंग व चिनलिंग पर्वत अल्ताइड हालचालींच्या अनुरोधानेच निर्माण झाले आणि हिमालयाचा काही भाग, ब्रह्मदेशाचा शान पठारप्रदेश व थायलंड, मलाया, पश्चिम बोर्निओ येथील पर्वतही त्याच प्रकारचे आहेत. चीनमधील स्थिरप्रदेशाभोवतीच्या फॉर्मोसा, जपान आणि कोरिया येथेही अल्ताइड वलीकरणच असावे. तथापि अतिपूर्वेकडील प्रदेशात ज्युरासिक-क्रिटेशस काळातील गिरिजनक हालचाली अधिक महत्त्वाच्या आहेत.
या प्रदेशात मध्यभागात वलीकरणापेक्षा गटविभंग, ज्वालामुखीक्रिया आणि ग्रॅनाइटीकरण हे विशेषत्वाने दिसून येतात. अंगाराभूमी व चुक्ची स्थिरकेंद्र यांच्या दरम्यानचे ट्रायासिक-ज्युरासिक गाळाचे जाड थर वलीकरण पावून व्हर्कोयान्स्क व चेर्स्की रांगा निर्माण झाल्या. याचा परिणाम रशियातील सीखोटे आलिन, दक्षिण कोरिया व दक्षिण होन्शू येथपर्यंत जाणवला; तसेच पूर्वचीन आणि ऑर्डास केंद्रांच्या दरम्यान शान्सी कोळसाक्षेत्राच्या वळ्या निर्माण झाल्या. पर्वतनिर्मितीच्या अखेरच्या अवस्थेत आधीच्या सर्व पर्वतश्रेणींच्या दक्षिणेस व पूर्वेस, अरेबिया व भारत यांच्या गिरिपिंडांस लागून पर्वतांची एक भली मोठी मालिकाच निर्माण झाली. अशा रीतीने टेथिस समुद्र नाहीसा होऊन तेथे निर्माण झालेल्या पर्वतश्रेणींनी उत्तरेचे व दक्षिणेचे ढालप्रदेश जोडले गेले. तुर्कस्तानात सुरू झालेल्या रांगा आर्मेनियाच्या गिरीमंडलात एकत्र येतात आणि आग्नेयीस पुन्हा दूर दूर जातात. कॅस्पियनच्या पलीकडे कोपेतदा म्हणून आलेला कॉकेशस या श्रेणींना ईशान्य इराणमध्ये मिळतो. उत्तरेकडे गेलेल्या कीर्थर आणि सुलेमान रांगा व पामीरचे गिरिमंडल यांवरून अफगाणिस्तान व बलुचिस्तान येथील पर्वतांवरील भारतीय ढालप्रदेशाचा परिणाम दिसून येतो.
भारताच्या उत्तरेच्या हिमालयाच्या रांगा ईशान्येस एकदम दक्षिणेकडे वळून उत्तर ब्रह्मदेशात जातात आणि तेथून पुढे अंदमान-निकोबार बेटांतून इंडोनेशियाच्या सुमात्रामधील व इतर वक्राकार पर्वतरांगांपर्यंत त्या आढळतात. इंडोनेशियातील चापाकृती रांगा फॉर्मोसा व जपानमधून जाऊन कॅमचॅटकात पुन्हा मुख्य भूमीवर येतात. आशियातील अल्पाइन हिमालयीन पट्ट्यात विसाव्या शतकात तीव्र स्वरूपाचे भूकंप झाले आहेत. इंडोनेशियाच्या द्वीपमालिकेत अतिपूर्वेत दिसून येणारी जागृत ज्वालामुखीक्रिया व जमिनीला वारंवार बसणारे हादरे यांवरून या भागातील गिरिजनक कालखंड अद्याप संपलेला नाही असे दिसते.
आशियाच्या भूमीचा उंचसखलपणा विविधस्वरूपी असून उंच व सखल भागातील फरक फार मोठा आहे. अरेबिया व भारत यांची प्राचीन विशाल पठारे सावकाश उत्तरेकडे उतरत उतरत अनुक्रमे टायग्रिस-युफ्रेटीस व सिंधू-गंगा यांच्या आर्वाचीन काळातील जलोढ मैदानात मिळून जातात. या मैदानांचा भूप्रदेश त्रिभुज प्रदेशांच्या रूपाने एकसारखा वाढतच आहे. या मैदानांच्या पलीकडील बाजूस भूशास्त्रदृष्ट्या अगदी अलीकडे निर्माण झालेल्या अतिप्रचंड, उत्तुंग व विस्तीर्ण पर्वतश्रेणी एकदम खड्या उभ्या आहेत. त्यांच्याही पलीकडे जगाच्या छपरावरील उंच पठारे, गटपर्वत आणि द्रोणीप्रदेश आहेत. त्यांच्या उत्तरेला आशियाचा हा उंच प्रदेश संपून पूर्व सायबीरियापासून अटलांटिकपर्यंत गेलेला सखल मैदानांचा आणि बुटक्या पठारांचा रुंद प्रदेश लागतो. पूर्वेकडे या उंच प्रदेशाचे फाटे पॅसिफिकपर्यंत गेलेले असून फाट्यांफाट्यांमध्ये नद्यांनी गाळाची, सपाट पूरमैदाने तयार केलेली आहेत. ही पूरमैदाने अतिशय दाट लोकवस्तीने गजबजलेली आहेत.
आशियाच्या विभागश: वर्णनाने वरील सर्वसामान्य स्वरूप अधिक स्पष्ट होईल : गंगा-सिंधूचे मैदान आणि द्वीपकल्पीय भारत : कार्बॉनिफेरसच्या अखेरीअखेरीस व क्रिटेशसच्या सुरुवातीस विभंगवेष्टीत द्रोणी खचून त्यात पाण्याबरोबर आलेले निक्षेप साठणे हे भारताच्या सांरचनिक उत्क्रांतीचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य आहे. दगडी कोळशाचे जाड थर असलेल्या या गोंडवन खडकांचा सर्वात महत्त्वाचा प्रदेश दामोदर खोऱ्यात आहे. जबलपूरजवळचा सागरी पर्मोकार्बॉनिफेरस चुनखडक सोडला तर मध्यजीव तृतीयक काळात द्वीपकल्पाच्या फक्त कडेच्या भागातच सागरी क्रियेचा परिणाम दिसून येतो. द्वीपकल्पाच्या वायव्य भागात उत्तर क्रिटेशस व पूर्व अदिनूतन काळात दख्खनच्या लाव्ह्याचा उद्रेक होऊन सु. ५,००,००० चौ.मी. किमी. क्षेत्रावर बेसाल्टचे सपाट थर पसरलेले दिसतात. पश्चिमघाट ही दख्खन पठाराची पश्चिम कड अरबी समुद्रापेक्षा १,२०० ते १,५०० मी. उंच आहे. पूर्वेकडे सावकाश उतरत उतरत या पठाराचे तमिळनाडूमध्ये रुंद मैदानात रूपांतर होते.
पूर्वेकडे सु. ९०० मी. उंचीच्या काही टेकड्या आहेत; परंतु मैदाने व रुंद नदीखोरी हीच तेथील प्रमुख भूमिस्वरूपे आहेत. दख्खन पठाराच्या ईशान्येस छोटा नागपूरचे पठार असून गंगेपलीकडील शिलाँगचे पठार हे द्वीपकल्पीय गटाचाच पृथक्स्थित भाग समजले जाते. दख्खन पठाराच्या उत्तरेस तापी व नर्मदा या नद्या आणि सातपुडा व विंध्य या पर्वतरांगा हा महत्त्वाचा विभाजक प्रदेश असून त्यांच्या उत्तरेला माळव्याचे लाव्ह्याचे विंध्य पठार व वायव्येस अरवली पर्वत आहे. नैर्ऋत्य-ईशान्य दिशेने गेलेल्या अरवलीची उंची गंगेच्या मैदानाकडे कमी कमी होत जाते. खुद्द दिल्लीत त्याची एक कटकशाखा आली आहे. अरवली हा अत्यंत प्राचीन पर्वतांपैकी एक असून त्याच्या ठिकाणी पूर्वी असलेल्या भूद्रोणीचे प्रथम उत्थापन व वलीकरण सु, ६० ते ७० कोटी वर्षांपूर्वी अल्गाँकियन काळात झाले.
पूर्वी तो कुमाऊँ हिमालयापासून दक्षिणेस द्वीपकल्पीय पठारांच्या कडेपर्यंत पसरला होता. त्या प्राचीन काळी अरवलीची कित्येक शिखरे हिमरेषेपेक्षा उंच असून तेथून मोठमोठ्या हिमनद्या वाहत होत्या व त्यांतून कित्येक मोठमोठ्या नद्यांना पाणी मिळत होते. पुढे क्षरण विदारणादिकांमुळे अरवली प्राय:स्थलीरूप पावला. उत्तर मध्यजीव काळात त्याचे सु. १० कोटी वर्षांपूर्वी पुन्हा उत्थान झाले व उदेपूरजवळ सु. १,२०० मी. आणि दिल्ली व अहमदाबादजवळ सु. ३०० मी. उंची त्याला प्राप्त झाली. दुसऱ्या उत्थानानंतरच्या क्षरणचक्रात त्याचे क्वार्टझाइट खडक उंच कटकांच्या रूपाने उभे राहिले आणि छिंद या स्थानिक नावाने ओळखली जाणारी खोरी मऊ फायलाइटमधून कोरून निघाली. सांरचनिक दृष्ट्या अरवली आणि अपालॅचियन यांत साधर्म्य आहे.
द्वीपकल्पाच्या पूर्वकिनाऱ्यावर कन्याकुमारीपासून महानदीच्या त्रिभुजप्रदेशापर्यंत कावेरी, कृष्णा व गोदावरी या प्रमुख नद्यांनी बनविलेली गाळमैदाने व त्रिभुजप्रदेश आहेत. दक्षिण भारतात टेकड्या झिजून मागे सरकल्यासारख्या झाल्यामुळे तयार झालेली गिरितलमैदाने आहेत. पश्चिम किनाऱ्यावरील कोकणच्या भागात लाव्हामैदाने आढळतात. पूर्वी तयार झालेली आणि नंतर उचलली गेलेली मैदाने निलगिरी व शिलाँग टेकड्या येथे आढळतात. दोन्ही किनार्यांवर उन्मज्जनाने तयार झालेली, खारकच्छ व पश्चजल यांनी युक्त मैदाने आहेत. कोकणाच्या उत्तरेस गुजरातचे गाळमैदान आहे.
कॅम्ब्रियन काळाच्या सुरुवातीपासून भारतीय द्वीपकल्पप्रदेश हा एक अत्यंत स्थिर प्रदेश म्हणून वैशिष्ट्य पावलेला आहे. विभंग, भूमीच्या मोठ्या हालचाली आणि लाव्हाचे लोट यांनी त्याच्या पृष्ठाचे स्वरूप जटिल करून टाकलेले आहे. अलीकडे आणि पूर्वीही त्यावर अनेकदा भूकंप झालेले आहेत. या प्रदेशाच्या ऊर्मिल पृष्ठाचा काही भाग प्राचीन ग्रॅनाइट व नाइस यांनी बनलेला असून त्यावर मधूनच ग्रॅनाइटी टेकड्या उभ्या राहिलेल्या दिसतात. पश्चिम घाटात अनेक खिंडी असून त्यांतून किनारीप्रदेश व पठार यांत दळणवळण चालते. जोग, गोकाक, शिवसमुद्रम्, पापनाशनम् इ. लहानमोठे धबधबेही आहेत. निलगिरी आणि लंकेतील पर्वत ज्युरासिक उत्प्रणोदानंतर उचलले गेले असावेत.
गंगासिंधूचे मैदान हे जगातील एक अत्यंत विस्तीर्ण, सुपीक व सपाट मैदान म्हणून प्रसिद्ध आहे. हिमालयाच्या पायथ्याचा द्रोणीप्रदेश गाळाने भरून येऊन ते तयार झालेले आहे. त्याने बांगला देश, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तरप्रदेश, पंजाब, राजस्थान आणि पाकिस्तानातील पंजाब व सिंध यांचा मोठा भूप्रदेश व्यापलेला आहे. गंगेच्या मुखापासून १,६०० किमी. दूर असलेली दिल्ली फक्त २१९ मी. उंच आहे. हिमालयाच्या बाजूला गाळ व माती यांऐवजी भरड खड्यांची मैदाने आहेत. त्यांस पंजाब व हरियाणामध्ये भाबर व आसाममध्ये द्वार म्हणतात. अरवलीच्या पश्चिमेस खडकाळ, रूक्ष, हॅमाडा जातीचे मैदान आहे. तो पुष्कळदा भारतीय पठाराचाच भाग मानला जातो. आसाममधील ब्रह्मपुत्रेचे खोरे हा गंगेच्या मैदानाचाच एक भाग समजता येतो; कारण ब्रह्मपुत्रा गंगेस मिळते.
ही जगातील सर्वांत उंच आणि सर्वांत अलीकडे निर्माण झालेली पर्वतसंहती आहे. ८,००० मी. पेक्षा उंच असलेली जगातील बहुतेक सर्व शिखरे हिमालयात आहेत. जगातील पूर्वपश्चिम पर्वतसंहतीपैकी ही सर्वांत लांब, सु. २,५०० किमी. असून तिची रुंदी सु. ४०० किमी. आहे. तिने ५,००,००० चौ.किमी. प्रदेश व्यापला आहे. सिंधूचा वरचा भाग व त्सांगपो (ब्रह्मपुत्रा) यांच्या खोर्यांनी तिबेटचे पठार हिमालयाच्या श्रेणींपासून वेगळे केलेले आहे. नंगापर्वत (८,१२६ मी.) आणि नामचा बारवा (७,७५६ मी.) यांचे दरम्यान हिमाद्री (ग्रेटर हिमालय) ची रांग असून तिच्यात मौंट एव्हरेस्ट (८,८४८ मी.), कांचनजंघा (८,५९८ मी.), धौलागिरी (८,१७२ मी.), मनास्लू (८,१५६ मी.), चो ओयू (८,१५३ मी.), अन्नपूर्णा (८,०७८ मी.), गोसाइंतान (८,०१३ मी.) इ. उत्तुंग शिखरे आहेत. हिमाद्रीच्या दक्षिणेस हिमाचल (लेसर हिमालय) पर्वताच्या रांगा आहेत.
हा डोंगराळ प्रदेश सु. ७५ किमी. रुंद व ५,००० मी. पर्यंत उंच असून त्यात अनेक दिशांना गेलेल्या पर्वतरांगा आहेत. येथील दक्षिण उतार खडे व उघडे असून उत्तर उतार सौम्य व अरण्यमय आहेत. याच्याही दक्षिणेस शिवालिक रांगा असून त्यांची उंची ६०० मी. पर्यंत आहे. यातून दून नावाची सपाट तळाची सांरचनिक दऱ्याखोरी असून ती दाट लोकवस्तीची व लागवडीखाली आणलेली आहेत. हिमालयाला त्याची पूर्ण उंची गाठावयास ६० ते ७० लक्ष वर्षे लागली. त्यामुळे त्यातून वाहणाऱ्या नद्या उंच उंच पर्वतांना भेदून गेलेल्या दिसतात. हिमालयाला पुरेशी उंची प्राप्त झाल्यानंतरच भारतात मोसमी प्रकारचे हवामान आले . हिमालय चंद्रकोरीच्या आकाराचा असून तो दक्षिणेकडे बहिर्वक्र आहे. त्याची दक्षिण सीमा ३०० मी. उंचीची असून अवघ्या १५० किमी. मध्ये तो ८,००० मी. उंची गाठतो. त्यात अनेक हिमाल (हिमक्षेत्रे) असून त्यांतून हिमनद्या व जोरदार जलप्रवाह उगम पावतात. हिमालयाच्या निरनिराळ्या भागांना काश्मीर-हिमालय, पंजाब-हिमालय वगैरे निरनिरळी नावे आहेत. आसाम-हिमालयाच्या दक्षिणेस भारत-ब्रह्मदेश सरहद्दीवरून जाणाऱ्या पातकई व इतर रांगांचा समावेश पूर्वाचल या पर्वतश्रेणीत होतो. हिमालयाचे भारतातील सर्वोच्च शिखर नंदादेवी (७,८१७ मी.) हे कुमाऊँ हिमालयात आहे.
तांबड्या समुद्राच्या अनुरोधाने आणि मध्यअरेबियात कँब्रियनपूर्व खडक पुष्कळच उघडे पडलेले दिसतात. मध्यजीव व तृतीयक कल्पातील सागरी थरही आहेत. हे खडक सामान्यत: फारसे विचलित झालेले नाहीत. जॉर्डनच्या पश्चिमेस मात्र त्यांस बाक आलेला व विभंग झालेला आढळतो. तसेच तुर्कस्तान, इराण व ओमान यांच्या जवळपासही थोडासाच फरक पडलेला दिसतो. प्रमुख सांरचनिक वैशिष्ट्य मात्र तृतीयक कालातील खचदरी हे होय. यात तांबडा समुद्र, मृतसमृद्र व जॉर्डनचे खोरे यांचा समावेश होतो. जोरदार विभंगक्रियेबरोबरच ज्वालामुखीक्रिया होते; त्यामुळे येमेनमधील सु. ३,७०० मी. उंचीचा लाव्हाजन्य प्रदेश, सु. २,८०० मी. उंचीचा उत्तर हेजाझ व सु. १,८०० मी. उंचीचा दक्षिण सिरीयाचा प्रदेश निर्माण झाला.
अरेबियाचे पठार त्याच्या पश्चिमेकडील उंच कडेपासून इराकच्या मैदानाकडे व इराणच्या आखातावरील ऊर्मिल किनारीप्रदेशाकडे सावकाश उतरत जाते. थोडाबहुत पाऊस पडताच वाहणाऱ्या अनेक प्रवाहांचे मार्ग दिसतात आणि पूर्वी केव्हातरी येथील हवामान अधिक आर्द्र होते हे बऱ्याच गोष्टींवरून दिसून येते. तथापि टायग्रिस, युफ्रेटीस आणि भूमध्यसमुद्राला मिळणाऱ्या काही नद्या एवढ्याच बारमाही आहेत. इराकचा उत्तरेकडील व पश्चिमेकडील थोडा भाग सोडला तर बाकीचा सर्व प्रदेश म्हणजे टायग्रिस व युफ्रेटीस नद्यांचे सखल खोरेच आहे. ते ५०० मी. पेक्षा अधिक उंच नाही.
तुर्कस्तान, इराण आणि अफगाणिस्तान हे देश आणि बलुचिस्तान येथे बरेचसे वलीपर्वत व गटपर्वत असून त्यांत अनेक द्रोणीप्रदेश आहेत. त्यांपैकी काही प्रदेश अंतर्गत जलवाहनाचे आहेत. उत्तर इराणमध्ये एल्बर्झ (अत्युच्च शिखर देमाव्हेंड ५,६६९ मी.) व कोपेत दा (२,९९१ मी.) हे पर्वत अफगाणिस्तानाच्या ईशान्येस हिंदुकुश पर्वताला मिळतात. दक्षिणेस झॅग्रॉस पर्वत अधिक रुंद असून त्यात कित्येक शिखरे ४,२७० मी. पेक्षा अधिक उंच आहेत. दक्षिण इराणमध्ये याची दिशा वायव्य-आग्नेय असून त्याची शाखा ओमानमध्ये जाते व पुढे तो बलुचिस्तानातून उत्तरेकडे वळतो. झॅग्रॉसच्या जवळपासच मध्यपूर्वेतील प्रमुख तेलक्षेत्र आहेत.
या दोन पर्वतश्रेणींमध्ये सीस्तान, लूट इ. क्षारयुक्त द्रोणीप्रदेश असून काही ज्वालामुखीही आहेत. तुर्कस्तानची रचना जटिल असून त्यात अतिनूतन काळातील ज्वालामुखी मौंट आरारात (५,१६५ मी.) आहे. तेथून भूमध्यसमुद्राकडे जाणारे व त्याच्या किनाऱ्यांनी जाणारे टॉरस व अँटिटॉरस पर्वत असून काळ्या समुद्राच्या काठाकाठाने पाँटिक पर्वत जातो. सभोवतीच्या पर्वतरांगांमुळे अनातोलियाच्या पठारावर कित्येक द्रोणीप्रदेश निर्माण झालेले आहेत. त्यांतील काहींमध्ये तूझ आणि वान सारखी अत्यंत क्षारयुक्त पाण्याची सरोवरे तयार झालेली आहेत. काळ्या समुद्रावरील झाँगूल्डाकजवळ महत्त्वाच्या कोळशाच्या खाणी आहेत. इतरत्र क्रोम आणि मँगॅनीज यांचे साठे आहेत. अगदी अलीकडच्या काळातही (१९७१) येथे मोठमोठे भूकंप झालेले आहेत. त्यांवरून या प्रदेशाची अस्थिरता अजून संपलेली नाही हे दिसून येते.
1. Barnett, Doak, Communist China and Asia, New York, 1961.
अंतिम सुधारित : 7/26/2023