हिमालयाच्या उत्तरेस हिमालयाच्या आणि कुनलुनच्या रांगांनी वेढलेले, अल्पाईन काळात भूहालचालींनी निर्माण झालेले, अत्युच्च व विस्तीर्ण तिबेटचे पठार आहे. त्याचे क्षेत्रफळ २० लाख चौ. किमी. असून सरासरी उंची ४,२५० मी. आहे. त्याला ‘जगाचे छप्पर’ म्हणतात. जगातील अनेक महत्त्वाच्या नद्यांचे उगमस्थान या पठारावर आहे.
सिंधू, सतलज, त्सांगपो (ब्रह्मपुत्रा), काली, गंडक, कोसी, इरावती, सॅल्वीन, मेकाँग, यांगत्सी व ह्वांग हो या नद्या याच पठारावर उगम पावतात. तिबेटी लोक सिंधूला सेंग्गे खबाब म्हणजे सिंह मुखोद्भूत, सतलजला ग्लांगचेन खबाब म्हणजे गज मुखोद्भूत, सीमेजवळ भारतात उगम पावलेल्या गंगेला र्माव्या म्हणजे मयूर मुखोद्भूत व ब्रम्हपुत्रेला र्तामचोग खबाब म्हणजे अश्व मुखोद्भूत म्हणतात. तिबेटचे तिबेटी नाव बोद, मंगोलियन–थुबेत, चिनी–तुफान, थाई–तिबेट, अरबी–तुब्बत व प्राचीन भारतीय नाव उत्तर कुरू किंवा त्रिविष्टप होते.
या पठाराचा आग्नेय, दक्षिण व नैर्ऋत्य बाजूचा सु. अर्धा भाग म्हणजे चीनचा तिबेट हा आजचा सित्सांग नावाचा पश्चिमेकडील स्वायत्त सीमाविभाग होय. त्याचे क्षेत्रफळ १२,२१,७०० चौ. किमी. व लोकसंख्या सु. १३ लाख (१९७१ अंदाज) आहे. त्याचा विस्तार सु. २७° उ. ते ३७° उ. व ७८° पू. ते १०३°पू. आहे. त्याच्या उत्तरेला चीनचा सिंक्यांग–ऊईगुर स्वायत्त विभाग, ईशान्येस चिंगहाई, पूर्वेला सेचवान प्रांत, आग्नेयीस युनान प्रांत व पश्चिमेस आणि दक्षिणेस भारत, नेपाळ भूतान व ब्रह्मदेश यांच्या सीमा आहेत.
भारताच्या जम्मू–काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, सिक्कीम व अरूणाचल प्रदेश या राज्यांच्या सीमा तिबेटला लागून आहेत. तिबेटची दक्षिण सीमा अनिश्चित व वादग्रस्त आहे. १९५१ पूर्वी तिबेट हा जवळजवळ संपूर्ण स्वतंत्र असा देश होता व त्यावर दलाई लामांची सत्ता होती. तिबेटविषयी गूढ, कुतूहल नेहमीच वाटत आले आहे. पूर्वी लामांच्या धोरणामुळे आणि आज चीनच्या बंदीमुळे तिबेटमध्ये प्रवेश व संचार अशक्यच आहे. त्यामुळे हे गूढ वाढले आहे.
दक्षिणेकडील त्सांगपोचे खोरे, पूर्व आणि आग्नेय बाजूचा खोल घळ्यांचा खाम विभाग व उत्तेरचा पठारी चांगटांग, असे तिबेटचे तीन प्रमुख भाग होतात. त्सांगपोचे खोरे सर्वांत विकसित असून त्यातच ल्हासा ही राजधानी आणि शिगात्से व ग्यांगत्से ही प्रमुख शहरे आणि मानसरोवर व राक्षसताल सरोवरे आहेत. याच्या दक्षिणेला हिमालयाची सर्वांत उंच रांग असून तिच्यात तिबेट, नेपाळ सीमेवर जगातील सर्वांत उंच शिखर मौंट एव्हरेस्ट (८,८४७·६ मी.) व इतर कित्येक शिखरे ७,००० मी. पेक्षा अधिक उंचीची आहेत. या खोऱ्याच्या पश्चिमेस सतलजचे खोरे आहे.
त्सांगपो (ब्रह्मपुत्रा) मानसरोवराजवळ उगम पावून सु. १,५०० किमी. पूर्वेस हिमालयाला समांतर वाहत जाऊन मग दक्षिणेकडे भारतात उतरते. हे खोरे सु. ३,६०० मी. उंचीवर असून त्सांगपोचा निम्मा भाग वाहतुकीस उपयोगी आहे. येथील जमीन सुपीक असून तिला त्सांगपोचा सिंचनासाठी लाभ होतो. तिबेटची बहुतेक वस्ती याच भागात आहे. त्सांगपो खोऱ्याच्या उत्तरेस कैलास पर्वतरांग असून तिच्यात ६,७१४ मी. उंचीचे कैलास शिखर आहे. ते हिंदू व बौद्ध धर्मीयांना अत्यंत पवित्र वाटते.
पूर्वेकडील खाम विभाग दक्षिणोत्तर पर्वतश्रेणींचा व त्यांमधील घळ्यांतून वाहणाऱ्या नद्यांचा आहे. येथे खम्या लोक राहतात. याच्या उत्तर भागास चामडो म्हणतात. तेथे चामडो हे शहर आहे. कैलास श्रेणीच्या उत्तरेस चांगटांग किंवा ब्यांगथांग हा सरासरी ४,६०० मी. उंचीचा अत्यंत विस्तीर्ण व अत्यंत रुक्ष पठारी प्रदेश आहे. त्याच्या उत्तरेस कुनलुन पर्वत असून त्यात उलूमुझता हे ७,७२४ मी. उंचीचे शिखर आहे. या पठारावर नद्या नाहीत; परंतु अनेक खाऱ्या पाण्याची सरोवरे आहेत. त्यांत नामत्सो किंवा तेंग्रीनॉर २,४७० चौ. किमी. हे प्रमुख आहे.
काही ठिकाणी उष्ण पाण्याचे झरेही आहेत. हा प्रदेश अंतर्गत जलवाहनाचा आहे. मात्र दक्षिण भागात सिंधूचा उगम आहे व पश्चिम सीमेवरून काश्मीरमधून काराकोरम व लडाख श्रेणींचे फाटे आले आहेत. त्या भागात गार्टोक हे शहर आहे. तिबेटमध्ये झिलिंग, यारब्रॉग्यू यांशिवाय इतर सरोवरही बरीच आहेत.
चांगतांग हा प्रदेश पूर्वेस ३,६०० मी. पर्यंत उतरला गेला आहे. उंचच उंच पर्वतश्रेणी, त्यांतील उंचावरील खिंडी, अत्युच्च पठार, खोल घळ्या व त्यांतून वाहणाऱ्या नद्या आणि गोड्या व खाऱ्या पाण्याची विपुल सरोवरे ही तिबेटची भूरचनेची वैशिष्ट्ये आहेत.
येथील दऱ्याखोऱ्यांतील मृदा जलोढयुक्त आहे. बहुधा सर्वत्र जाड्याभरड्या खड्यांवर वाऱ्याने वाहून आणलेल्या वाळूचे थर आढळतात. सेंद्रीय पदार्थयुक्त खतमातीच्या प्रमाणानुसार राखी ते मंद तपकिरी रंगाची मृदा आढळते. हे प्रमाण सामान्यतः कमीच असते.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020