भूपेंद्रनाथ बसु : भार-तीय स्वातंत्र्य चळवळीतील एक नेते, काँग्रेसचे अध्यक्ष व प्रभावी वक्ते. कृशनगर (प. बंगाल) येथे जन्म. वडील रामरतन व आई दयामाई. रामरतन हे एका जमीनदाराच्या घरी कारकून होते. भूपेंद्रनाथांचे प्राथमिक शिक्षण कृशनगर येथे झाले. पुढे कलकत्त्याला येऊन ते एम्. ए.; एल्एल्. बी. झाले (१८८३). विद्यार्थिदशेतच त्यांचे लग्न कलकत्ता येथील सधन व्यापारी महेंद्रनाथदास यांच्या वासंतीकुमारीदेवी या मुलीशी झाले. यूरोप-विशेषतः इंग्लंडचा दौरा त्यांनी स्वखर्चाने केला आणि कलकत्त्यात सरकारी सॉलिसीटर म्हणून ते काम करू लागले. या कामात त्यांनी सरकारचा विश्र्वास संपादन करून प्रतिष्ठा व पैसाही मिळविला; तथापि राष्ट्रीय चळवळीकडे त्यांनी दुर्लक्ष त्यांनी केले नाही. कलकत्ता येथील काँग्रेसच्या अधिवेशनातील स्वयंसेवक-पथकाचे नेतृत्व त्यांनी केले (१८८६). बंगालच्या फाळणीनंतर बंगालसंबंधी बाजू मांडण्यासाठी एक प्रतिनिधिमंडळ इंग्लंडला गेले (१९०७), त्यात त्यांचा समावेश होता. ते बंगाल विधिमंडळाचे १९०४ ते १९१० या दरम्यान सदस्य होते.
अखिल भारतीय काँग्रेसच्या अलाहाबाद अधिवेशनाचे भूपेंद्रनाथ स्वागताध्यक्ष (१९११) आणि पुढे मद्रास येथील काँग्रेसचे ते अध्यक्ष म्हणून निवडले गेले (१९१४). आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी ब्रिटिश नोकरशाहीवर कोरडे ओढले आणि हा मानवतेला जडलेला एक कंलक आहे, असे सांगितले. भारतमंत्र्याच्या सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून ते १९१७ मध्ये इंग्लंडला गेले. त्या मंडळाचे ते १९२३ पर्यंत उपसचिव होते. पुढे ते जिनीव्हा येथे भरलेल्या मजूर परिषदेला भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते (१९२२). ब्रिटिश सरकारने नियुक्त केलेल्या लोकसेवा आयोगाचे सदस्यत्व याच साली त्यांना देण्यात आले.
सॉलिसिटर असूनसुद्धा त्यांनी राष्ट्रीय चळवळीत भाग घेतला आणि जनजागृतीचे कार्य केले. मैमनसिंगला भरलेल्या प्रांतिक परिषदेचे ते अध्यक्ष झाले (१९०५) आणि बंगालच्या फाळणीविरोधी लढ्यात सामील झाले; त्यांनी बंगाल प्रांतात दौरा काढून लोक- मत जागृत केले आणि परकीय मालावर बहिष्कार घालण्याच्याचळवळीचा प्रसार केला. तसेच वृत्तपत्रासंबंधीच्या जाचक काय- द्याला कडाडून विरोध केला (१९१०). म. गांधींचा भारतीय राजकारणात प्रवेश झाल्यावर त्यांनी काँग्रेस सोडली व ते लिब- रल फेडरेशनमध्ये सामील झाले. १९२३ मध्ये ते बंगालच्या गव्हर्नरच्या कार्यकारी मंडळाचे सभासद झाले. पुढे त्यांची नियुक्ती कलकत्ता विद्यापीठाचे उपकुलगुरू म्हणून झाली (१९२४). त्याच वर्षी कलकत्ता येथे त्यांचे निधन झाले.
भूपेंद्रनाथांनी भारताच्या विशेषतः बंगालच्या राजकारणात व शिक्षणक्षेत्रात मोलाची कामगिरी केली. ते अनेक शिक्षण संस्थांचे सदस्य होते. स्त्रियांच्या कायदेशीर हक्कांसाठी ते सतत झगडले. संमतिवयाच्या विधेयकाला त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला होता (१८९१); पुढे विवाहविषयक एक विधेयक त्यांनी बंगालच्या विधिमंडळात मांडले होते (१९११). तांत्रिक शिक्षण राष्ट्रीय शिक्षणात अंतर्भूत व्हावे, म्हणून ते प्रयत्नशील होते. भारतीयांना पाश्चात्त्य पद्धतीचे शिक्षण द्यावे, या मताचे ते पुरस्कर्ते होते. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचाही त्यांनी पुरस्कार केला. त्यांना ग्रामीण-आर्थिक प्रश्नांविषयी विशेष आस्था होती. यांबाबतचे आपले विचार हितवादी या बंगाली नियतकालिकातून ते प्रसिद्ध करीत. शासकीय नोकरी आणि राजकारण यांबरोबरच त्यांचा अनेक खासगी व्यवसायांशी जवळचा संबंध होता. बंग लक्ष्मी मिल्स, बेंगॉल होजिअरी कंपनी, बेंगॉल पॉटरी वर्क्स यांसारख्या कंपन्यांचे ते भागीदारही होते.
एक उत्तम वक्ता म्हणूनही त्यांचा लौकिक होता.
संदर्भ : University of Calcutta, Hundred Years of the University of Calcutta (1856-1956). Calcutta, 1957.
लेखक - रूक्साना शेख
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/25/2019
स्वतंत्र ब्रह्मदेशाचे पहिले पंतप्रधान व ब्रह्मी स्...
आधुनिक भारताचे एक महान नेते आणि नेमस्त पक्षाचे अध्...
द्राविड आंदोलनाचे प्रमुख नेते व तमिळ जनतेत पेरियार...
ब्रिटिशांकित हिंदुस्थानच्या हैदराबाद संस्थानातील स...