অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शंकर दयाळ शर्मा

शंकर दयाळ शर्मा

शंकर दयाळ शर्मा : ( १९ ऑगस्ट १९१८–२६ डिसेंबर १९९९). भारताचे नववे राष्ट्रपती. जन्म भोपाळ येथे. त्यांचे वडील प्रसिद्ध वैद्य होते. भोपाळ आणि आग्रा येथे सुरूवातीचे शिक्षण. अलाहाबाद विद्यापीठातून एम.ए. (१९३९) आणि नंतर लखनौ विद्यापीठातून एल्एल् .एम्;. पुढे केंब्रिज विद्यापीठ आणि लिंकन्स इन (इंग्लंड) यांतून अनुक्रमे पीएच्. डी. व बार अँट लॉ या पदव्या मिळविल्या. भारतात परतल्यावर त्यांनी लखनौ विद्यापीठात कायदा विषयाचे प्रपाठक (१९४३ – ५२) म्हणून काम केले. केंब्रिज आणि हार्व्हर्ड या विद्यापीठांतही त्यांनी अल्पकाळ अध्यापन केले. छोडो भारत आंदोलनाच्या वेळी ते राजकरणात पडले. त्यांना आठ महिने तुरुंगवास भोगावा लागला. पुढे भोपाळ संस्थानातील काँग्रेसचे ते अध्यक्ष (१९५०-५२) होते. याच सुमारास त्यांचा विमला यांच्याशी विवाह झाला. (७ मे १९५०). १९५२ ते १९५६ या काळात ते भोपाळचे मुख्यमंत्री झाले.

पुढे भोपाळ मध्य प्रदेश राज्याचा भाग बनल्यावर (१९५६) ते मध्य प्रदेश राज्यात मंत्री झाले (१९५६ – ६७). मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व नंतर अखिल भारतीय काँग्रेसचे ते सरचिटणीस होते (१९६८ – ७७). १९७२ – ७४ दरम्यान ते अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि लोकसभेवरही निवडून आले (१९७१ – ७७). त्यानंतर आंध्र प्रदेश (१९८४ – ८५), पंजाब (१९८५) आणि महाराष्ट्र (१९८६-८७) या राज्यांचे त्यांनी राज्यपालपद भूषविले. पुढे ते काँग्रेसतर्फे उपराष्ट्रपती या पदावर निवडून आले (१९८७ – ९२). नंतर १९९२ ते १९९७ या काळात ते भारताचे राष्ट्रपती होते. निवृत्तीवंतर ते दिल्लीत स्थायिक झाले. तिथेच त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.

त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. भारतीय विद्यापीठे (विक्रम व भोपाळ) तसेच परदेसी विद्यापीठे (लंडन व केंब्रिज) यांनी त्यांना सन्मान्य डॉक्टरेट पदव्या देऊन गौरविले. विशेष सार्वजनिक सेवेबद्दलचा पहिला श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय पुरस्कार त्यांना देण्यात आला (१९९८). काँग्रेस अँप्रोच डू इंटरनॅशनल अफेअर्स, क्रांती द्रष्टा, रूल ऑफ लॉ अँड रोल ऑफ पुलीस, सेक्युलरिझम इन इंडियन ईथॉस, टोअर्डझ अ न्यू इंडिया, अँस्पेक्ट्स ऑफ इंडियन थॉट आणि अवर हेरिटिज ऑफ ह्यूमनिझम ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

 

लेखक - कृ. म. गायकवाड

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate