चक्रवर्ति राजगोपालाचारी : (१० डिसेंबर १८७५–२५ डिसेंबर १९७२). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एकथोर नेते, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल (१९४८–५०) व स्वतंत्र पक्षाचे संस्थापक–अध्यक्ष (१९५९). त्यांचा जन्म तमिळनाडूमधील थोरपोल्ली (होझूर तालुका,सेलम जिल्हा) या खेड्यात मध्यमवर्गीय वैष्णव-ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांचे वडील नल्लन चक्रवर्ती आयंगार थोरपोल्लीचे मुन्सफ होते. आई सिंगारम्मल धार्मिक वृत्तीची होती. त्यांचे प्राथामिक शिक्षण जन्मगावीच झाले. पुढे त्यांनी बंगलोर व मद्रासमध्ये उच्च शिक्षण घेऊन बी. ए. (१८९६) व एल्एल्.बी (१९००) या पदव्या मिळविल्या. आर्थिक अडचणींमुळे त्यांनी एल्एल्.बी पूर्वी काही दिवस मद्रास उच्च न्यायालयात भाषांतरकाराची नोकरी केली. याचवेळी त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. त्यांनी अलामेलू मंगम्मल या १० वर्षांच्या मुलीशी विवाह केला (१९००). त्यांना कृष्णस्वामी, नरसिंहन व रामस्वामी ही तीन मुले आणि नामगिरी व लक्ष्मी या दोन मुली झाल्या. राजाजींनी लक्ष्मी या आपल्या मुलीचा विवाह महात्मा गांधींच्या देवदास या मुलाशी केला. हा वैश्य-ब्राम्हण असा आंतरजातीय विवाह त्यावेळी गाजला. नामगिरीच्या पतीच्या निधनानंतर (१९३२) ती राजाजींकडेच राहिली. तिने राजाजींचे घर सांभाळण्याची जबाबदारी पार पाडली. रामस्वामी हे व्यवसायाने डॉक्टर होते. ते १९४६ मध्ये निवर्तले. कृष्णस्वामी यांनी स्वराज्य, हिंदू, डेक्कन कॉनिकल आदी वृत्तपत्रांमध्ये पत्रकार/संपादक म्हणून काम केले. नरसिंहन १९५२ व १९५७ च्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे लोकसभेवर निवडून आले. १९६७ च्या निवडणुकीत स्वतंत्र पक्षातर्फे ते उभे राहिले, पण पराभूत झाले.
राजाजी अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस झाले (१९२१-२२). ते काँग्रेसच्या कार्यकारिणीचे अनेक वर्षे सदस्य होते. १९३५ मध्ये काही काळ त्यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून काम केले. दुसऱ्या महायुध्दापासून काँग्रेसच्या एकूण ध्येयधोरणाविषयी राजाजींचे तमभेद वाढू लागले. १९३५ च्या अधिनियमानुसार भारतात प्रांतिक कायदे मंडळाच्या निवडणुका होऊन त्यात मद्रास प्रांताचे राजाजी मुख्यमंत्री झाले (१४ जुलै १९३७). दुसरे महायुध्द सुरू झाल्यानंतर काँग्रेस मंत्रिमंडळांनी ब्रिटिश सरकारशी असहकार्यकरण्याच्या तत्त्वावर संयुक्तरीत्या राजीनामे सादर केले. या दोन वर्षांच्या कारकीर्दीत राजाजींनी मद्रास इलाख्यात दारूबंदी, हरिजनांचा मंदिरप्रवेश, मूलोद्योग शिक्षण, खादीचा प्रसार इ. कार्यक्रम राबविले. ३ जुलै १९४० च्या काँग्रेस कार्यकारिणीत राजाजींनी मांडलेल्या ठरावानुसार भारताला संपूर्ण स्वातंत्र्य देण्याच्या अटीवर ब्रिटिशांना युध्दात संपूर्ण सहकार्य देण्याचे धोरण ठरले; पण ब्रिटिश सरकारने ते फेटाळून लावल्याने म. गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाचे अभियान छेडले. त्यानंतर आलेल्या क्रिप्स शिष्टमंडळाच्या योजनांना काँग्रेसचा विरोध असतानाही राजाजींनी मात्र त्याचे समर्थन केले. राष्ट्रीय सरकारची रचना कोणत्या पध्दतीने करावी, याबाबत वाटाघाटी होण्याची अद्याप वेळही आलेली नाही; अशा वेळी क्रिप्स योजना फेटाळण्यात काय हशील आहे, असे त्यांचे म्हणणे होते. याशिवाय मुस्लिम लीगने केलेली फाळणीची सूचना काँग्रेसला सहजासहजी फेटाळता येणार नाही.
मुस्लिम लीगच्या स्वतंत्र राज्याच्या मागणीचा प्रश्न सुटल्याखेरीज देशाला स्वातंत्र्य मिळणे कठीण आहे, असे राजाजींचे म्हणणे होते. त्यांच्या या भूमिकेला काँग्रेसमधून फारसा पाठिंबा मिळाला नाही. काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांत तडजोड घडवून आणण्यासाठी त्यांनी पुन्हा प्रयत्नांची पराकाष्ठा केली; परंतु ते प्रयत्न अयशस्वी ठरले. अलाहाबाद काँग्रेस अधिवेशनात (१९४२) त्यांनी ठराव मांडला तोही फेटाळण्यात आला. परिणामतः त्यांनी प्रथम काँग्रेस कार्यकारिणीची आणि नंतर पक्षाचा राजीनामा दिला (१९४२). तीन वर्षे ते काँग्रेसबाहेर राहिले. त्यांना फार मोठी मानहानी सहन करावी लागली; तथापि ते आपल्या तत्त्वापासून ढळले नाहीत. भारत छोडो आंदोलनातही त्यांनी भाग घेतला नाही. काँग्रेसचे सर्व नेते यावेळी तुरूंगात होते. राजाजींनी पुन्हा एकदा हिंदु-मुस्लिम ऐक्याची योजना मांडली, तीवर त्यांनी महात्मा गांधींची मान्यता मिळविली; पण तिचा फारसा उपयोग झाला नाही. काही मान्यवर नेत्यांच्या आग्रहास्तव त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला (१९४५). ते गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य झाले (१९४६-४७). स्वातंत्र्यानंतर त्यांची बंगालचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली (ऑगस्ट ते नोव्हेंबर १९४७). त्यानंतर ते स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल झाले (१९४८–५०).
नेहरूंच्या सुरूवातीच्या मंत्रिमंडळात त्यांनी प्रथम बिनखात्याचे व नंतर गृहमंत्री (१९५१) म्हणून काम केले; परंतु मद्रास राज्यातील काँग्रेस पक्ष अल्पमतात येईल, अशी भीती निर्माण होताच त्यांची मद्रासचे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली (१९५२–५४). नंतर भारत सरकारने त्यांच्या देशसेवेचा वबहुविध कार्याचा भारतरत्न हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार देऊन उचित गौरव केला (१९५४). पुढे त्यांचे पं. नेहरूंशी व अन्य काँग्रेस नेत्यांशी मतभेद झाले. काँग्रेसच्या एकूण धोरणाबाबत ते निराश होते. म्हणून त्यांनी ४ जून १९५९ रोजी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. मिनू मसानी, क. मा. मुनशी, प्रा. एन्. जी. रंगा व अनेक राजे लोक यांनी पक्षस्थापनेच्या कामी त्यांना सहकार्य दिले. पक्षाच्या पहिल्या अधिवेशनातच त्यांनी ध्येयधोरणे घोषित केली. त्यात लोकशाही, जनतेचे हक्क, व्यक्तिस्वातंत्र्य, न्यायदानाचे स्वातंत्र्य इत्यादींचे रक्षण करणे आणि साम्यवाद, राष्ट्रीयीकरण, विकेंद्रीकरण, सामुदायिक शेती, शासन नियंत्रित व्यापार, कमालजमीन धारणा, एकाधिकार, भ्रष्टाचार, मक्तेदारी, अलिप्ततावाद यांस विरोध, ही प्रमुख उद्दिष्ट्ये होती. स्वातंत्र्यातून उत्कर्ष हे त्यांचे ब्रिदवाक्य होते. राजाजी स्वतःस कम्युनिस्टांचा शत्रू नंबर एक मानीत. १९६२ व ६७ च्या सार्वत्रिक निवडणुकांत पक्षास चांगला प्रतिसाद (४४ खासदार–१९६७) मिळाला; परंतु भांडवलदार, उद्योगपती व जमीनदार यांचाच हा पक्ष आहे, अशी लोकमानसात त्याची प्रतिमा झाली आणि बँकांचे राष्ट्रीयीकरण व राजे लोकांचे तनखे बंद केल्यानंतर पक्षाचे अस्तित्व नाममात्रच उरले.
महात्मा गांधी शांतता प्रतिष्ठानतर्फे त्यांनी अण्वस्त्रांच्या वापरावर बंदी घालावी, म्हणून गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले (१९६२) आणि ते प्रथमच देशाबाहेर अमेरिकेत गेले. तिथे त्यांनी जॉन केनेडींची भेट घेऊन त्यांना संयुक्त राष्ट्र संघटनेत अण्वस्त्रांच्या चाचणींवर बंदी आणावी असा ठराव संमत करून घ्यावा, अशी विनंती केली.
यानंतर त्यांनी हळूहळू सक्रिय राजकारणातून अंग काढून घेतले आणि ते मद्रासला स्थायिक झाले. वृध्दापकाळी त्यांची ज्येष्ठ कन्या नामगिरी ही त्यांच्या सेवेत होती. या सुमारास तमिळनाडूत रामस्वामी नायकर, अण्णादुराई, करूणानिधी वगैरे स्थानिक नेते काँग्रेसविरोधी आणि ब्राम्हणेतर चळवळीत कार्य करीत होते. त्यांच्याशी राजाजींचे मैत्रीचे संबंध होते; तथापि ते आपला बहुतेक वेळ लेखन-वाचन यात व्यतीत करीत. या काळातही त्यांनी स्वराज्य (इंग्रजी) व कल्की (तमिळ) या साप्ताहिकांतून अनेक लेख लिहिले. ज्येष्ठतेच्या नात्याने ते अनेकांना सल्ला देत व निमंत्रण आल्यास व्याख्यानालाही जात. त्यांचा पत्रव्यवहारही मोठा होता. अखेरपर्यंत ते कार्यमग्न राहिले. मद्रास येथेच त्यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.
राजाजींचा मूळ पिंड तत्त्वचिंतकाचा होता. धर्मावर त्यांची श्रध्दा होती पण ते अंधश्रध्द वा धर्मवेडे नव्हते. गीतेतील कर्मवाद त्यांनी आचरणात आणला. भारताच्या सांस्कृतिक विविधतेतील एकात्मतेचे अधिष्ठान रामायण-महाभारतातील आदर्श आणि तत्त्वज्ञान यांत आहे, असे ते म्हणत. त्यांनी तमिळ व इंग्रजीत रामायण-महाभारत या ग्रंथांचे भाषांतर केले. त्यांचे स्फुट व ग्रांथिक लेखन विपुल आहे. त्यांत प्रामुख्याने रामायण, महाभारत, भगवदगीता आणि उपनिषदे यांवरील चिकित्सक विवेचन असून मार्कस ऑरीलीयसची पुस्तके त्यांनी तमिळमध्ये भाषांतरित केली. त्यांच्या काही कथाही इंग्रजीत आहेत. कुरळ हे पुस्तक म्हणजे तिरूवळ्ळुवर यांच्या कान्याचा तमिळ अनुवाद आहे. सु. बाराव्या शतकात होऊन गेलेल्या अव्वैयार या संत कवयित्रीच्या काव्याचा परिचय करून देणारे एक पुस्तकही त्यांनी लिहिले. यांशिवाय मुडियुम हे शास्त्रविषयक पाठयपुस्तक त्यांनी तमिळमध्ये लिहिले. त्यांच्या ५३ कथांचे दोन कथासंग्रह प्रसिध्द झाले आहेत. साधी, सोपी आणि सुबोध भाषाशैली हे त्यांच्या लेखनशैलीचे विशेष होत. त्यांच्या तमिळ महाभारताला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
इंग्रजी भाषेबद्दल त्यांना अभिमान होता आणि भारतीय ऐक्याचे भाषा म्हणून ती दुर्लक्षिली जाऊ नये व तिच्या शासकीय वापरावर निर्बंध लादले जाऊ नयेत, यासाठी ते प्रयत्नशील होते. मातृभाषेला त्यांनी प्राधान्य असावे असे सांगितले असले, तरी हिंदी भाषेला त्यांचा विरोध नव्हता.
सामाजिक, राजकीय व साहित्यिक क्षेत्रांत त्यांचे कार्य निश्चितच श्रेष्ठ दर्जाचे आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये भारतीय संस्कृतीचा सार्थ अभिमान दिसून येतो. म्हणून त्यांना म. गांधींच्या विवेकबुध्दीचा प्रतिपालक मानतात.
संदर्भ : 1. Felton, Monica, I Meet Rajaji, New York, 1962.
2. Gandhi, Rajmohan, A Warrior From the Sough : The Rajaji Story, New Delhi, 1979.
3. Gandhi, Rajmohan, The Rajaji Story : 1937-72, Bombay, 1984.
4. Ghose Sankar, Leaders of Modern India Banglore, 1980.
5. Masani, Minoo, Against the Tide, New Delhi, 1981.
6. Peruma, N.Rajaji : Two Important Men, Mdras, 1938.
लेखक - सु. र. देशपांडे
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
ब्रिटिशांकित हिंदुस्थानच्या हैदराबाद संस्थानातील स...
भारतातील एक समाजवादी क्रियाशील विचारवंत नेते. सौरा...
आधुनिक भारताचे एक महान नेते आणि नेमस्त पक्षाचे अध्...
द्राविड आंदोलनाचे प्रमुख नेते व तमिळ जनतेत पेरियार...