অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एन्‌क्रुमाह क्वाहमेह

एन्‌क्रुमाह क्वाहमेह

एन्‌क्रुमाह क्वाहमेह : (२१ सप्टेंबर १९०९–२७ एप्रिल १९७२). घाना हे वसाहतवादाच्या जोखडातून मुक्त झालेले पहिले आफ्रिकी राष्ट्र आणि एन्‌क्रुमाह हे त्या राष्ट्राचे पहिले अध्यक्ष. अ‍ॅक्रा येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी १९३५ पर्यंत शिक्षकाचा पेशा पतकरला. त्यानंतर ते अमेरिकेस गेले. अमेरिकेतील लिंकन व पेनसिल्व्हेनिया या विद्यापीठांत त्यांनी धर्म, अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र यांचा अभ्यास केला. त्यानंतर ते इंग्‍लंडला गेले आणि १९४५ पासून आफ्रिकी राजकारणात त्यांनी हिरिरीने भाग घेण्यास सुरुवात केली. त्याचवर्षी इंग्‍लंडमध्ये भरलेल्या सहाव्या आफ्रिकी परिषदेमध्ये त्यांनी भाग घेतला व आपली छाप पाडली. पश्चिम आफ्रिका संघ स्थापण्यासाठी हालचाली सुरू केल्या. डिसेंबर १९४७ मध्ये मायदेशी परतल्यानंतर युनायटेड गोल्ड कोस्ट कनव्हेन्शन ह्या राजकीय पक्षाचे कार्यवाह झाले. परंतु दोनच वर्षांनी त्यांनी कनव्हेन्शन पीपल्स पार्टी नावाचा स्वत:चा पक्ष स्थापला. त्यांच्या गतिमान नेतृत्वाखाली ह्या पक्षाने जनता संघटित केली आणि घाना स्वतंत्र केले. ह्या नव्या राष्ट्राच्या समस्या सोडविण्यासाठी एकपक्षपद्धतीचा स्वीकार करून एन्‌क्रुमाह यांनी आपली धोरणे आखली.

परराष्ट्रीय धोरणात त्यांनी अलिप्ततेचा एक अत्यंत व्यवहार्य धोरण म्हणून स्वीकार केला आणि कोणत्याही वसाहतवादास विरोध केला. आफ्रिकेच्या एकतेचे प्रयत्न केले. याबरोबरच आपल्या पक्षाद्वारा राष्ट्राला सुरक्षितता प्राप्त करून देताना सार्‍या जनतेला सामावून घेण्याचे प्रयत्न केले; परंतु त्यात त्यांना यश लाभले नाही. त्यांची लोकप्रियता ओसरू लागली आणि १९६५ मध्ये ते चीनच्या दौर्‍यावर असताना घानामध्ये लष्करी क्रांती झाली व एन्‌क्रुमाह यांना पदच्युत करण्यात आले व त्यांचा पक्ष बेकायदेशीर ठरविण्यात आला. एन्‌क्रुमाह यांना गिनीमध्ये आश्रय घ्यावा लागला. तेथेच ते कोनाक्री या गावी मरण पावले.

एन्‌क्रुमाह स्वत:ला ख्रिस्ती समाजवादी म्हणवून घेत असत. आफ्रिकी समस्यांचा त्यांचा अभ्यास चांगला होता. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. आय स्पीक ऑफ फ्रिडम (१९६१), आफ्रिका मस्ट यूनाइट (१९६३), नीओ-कलोनिअ‍ॅलीझम : द लास्ट स्टेज ऑफ इंपीरियॅलीझम (१९६५), चॅलेंज ऑफ द काँगो (१९६७), डार्क डेज ऑफ घाना (१९६८) ही त्यांपैकी प्रमुख होत. यांशिवाय घाना (१९५७) या शीर्षकाने त्यांनी आत्मवृत्त लिहिले.

 

संदर्भ : Omari, T. P. Kwane Nkrumah : Anatomy of an African Dictatorship, New York, 1970.

 

लेखक - दिलीप जगताप

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate