অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ज्यूलियस काम्बारागा न्येरेरे

ज्यूलियस काम्बारागा न्येरेरे

ज्यूलियस काम्बारागा न्येरेरे : टांझानिया प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष व एक थोर आफ्रिकी नेते. त्यांचा जन्म टांगानिकातील बूट्‌यामा (मूसोमा जिल्हा) येथे झनाकी जमातीतील कुटुंबात झाला. त्यांचे वडील न्येरेरे बुरिटो हे झनाकी जमातीच्या प्रमुखांपैकी एक होते व आई मुगया ही बुरिटो यांची अठरावी पत्‍नी. त्यांचे शिक्षण मूसोमा, ताबोरा व एडिंबरो येथे झाले. माकिरिरी युनिव्हर्सिटी कॉलेजमधून (यूगांडा) त्यांनी शिक्षणशास्त्रातील पदविका मिळविली (१९५४). तत्पूर्वी ते कॅथलिक पंथानुयायी झाले आणि त्यांनी १९४५ नंतर ताबोरा येथील रोमन कॅथलिक विद्यालयात शिक्षकाची नोकरी धरली. यानंतर त्यांनी टांगानिका आफ्रिकन असोसिएशन या संस्थेत प्रवेश करून आपल्या राजकीय जीवनास प्रारंभ केला; पण पुरेसे शिक्षण घेण्याकरिता ते एडिंबरो विद्यापीठात गेले आणि मानव्यविद्या विषयात त्यांनी एम्.ए. पदवी घेतली (१९५२). यानंतर त्यांची दारेसलामजवळील सेंट फ्रांसिस महाविद्यालयात अध्यापक म्हणून नियुक्ती झाली. या सुमारास त्यांनी मारिया मागिगी या युवतीशी लग्न केले (१९५३). त्यांना पाच मुलगे व दोन मुली झाल्या.

पुढे त्यांची टांगानिका आफ्रिकन असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. या संस्थेचे पुनरुज्जीवन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला; पण अखेर हताश होऊन त्यांनी टांगानिका आफ्रिकन नॅशनल युनियन (टानू) हा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन केला (७ जुलै १९५४) आणि काही वर्षांतच अध्यापकाची नोकरी सोडली. टानूची सुरुवातीची काही वर्षे खडतर गेली. त्यांनी टानूच्या संघटनाकार्यास पूर्णतः वाहून घेतले. आंतरराष्ट्रीय आयोगाच्या काही सभासदांनी टांगानिकाला स्वातंत्र्य देण्याची तारीख ठरवावी, अशी शिफारस केली होती; पण ब्रिटिशांना ते मान्य नव्हते. तथापि त्यामुळे न्येरेरे यांस आपल्या पक्षाचे म्हणणे १९५५ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या विश्वस्त मंडळापुढे व १९५६ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मांडण्याची संधी मिळाली. त्यामुळे न्येरेरेंची प्रतिष्ठा वाढली आणि ब्रिटिशांनी १९५७ मध्ये त्यांची टांगानिकाच्या विधिमंडळात नियुक्ती केली; पण इथे त्यांना फारसा वाव मिळाला नाही. तेव्हा त्यांनी राजीनामा दिला. ब्रिटिशांनी विधिमंडळासाठी निवडणुका जाहीर केल्या. त्यांत टानूपक्षाला ७१ पैकी ७० जागा मिळाल्या (१९६०). न्येरेरे यांना मंत्रिमंडळ बनविण्यास सांगितले आणि न्येरेरे हे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यानंतर ९ डिसेंबर १९६१ रोजी टांगानिका स्वतंत्र झाले व त्याचे पंतप्रधानपद त्यांना मिळाले. पुढे टांगानिका १९६२ मध्ये प्रजासत्ताक झाल्यावर न्येरेरे त्याचे पहिले राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांनी अनेक योजनांद्वारे टांगानिकाची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला; पण १९६४ मध्ये टांगानिकाच्या लष्कराने पगारवाढीसाठी बंड केले; ब्रिटिशांच्या मदतीने ते त्यांना मोडावे लागले. या वेळी झांझिबारमध्ये क्रांती झाली (१९६४) आणि नवीन पुरोगामी सरकार सत्तारूढ झाले आणि त्याबरोबरच झांझिबार टांगानिकात समाविष्ट होऊन टांझानिया हा संयुक्त संघ स्थापन झाला. झांझिबारचे शेख अबीद कारूमे टांझानियाचे उपाध्यक्ष झाले.

सकल आफ्रिकावाद व आफ्रिकेचे ऐक्य यांवर न्येरेरे यांची भिस्त असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धोरणांत आफ्रिकी समाजवादाचे ते पुरस्कर्ते आहेत. त्यांचे धोरण वंशभेदाविरुद्ध असून टानू हा एकमेव राजकीय पक्ष टांझानियाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मार्गदर्शन करतो व धोरण ठरवितो. न्येरेरे यांचा हा एकपक्षीय लोकशाही राज्यपद्धतीचा अभिनव प्रयोग आहे. आर्थिक क्षेत्रात समान संधी, साधन-संपत्तीचा समान वाटा आणि उपभोग इ. तत्त्वांवर सहकारी संस्था व कामगार संघ यांना हे धोरण पाठिंबा देते. न्येरेरे यांचे राजकीय तत्त्वाज्ञान व विचार त्यांनी लिहिलेल्या विविध पुस्तकांतून स्पष्टपणे व्यक्त होतात. त्यांपैकी आफ्रिकन सोशॅलिझम (१९६१), फ्रीडम अँड युनिटी (१९६७), उजामा : एसेज ऑन सोशॅलिझम (१९६८), फ्रीडम अँड सोशॅलिझम (१९६८) इ. प्रसिद्ध आहेत. शेक्सपिअरच्या मर्चंट ऑफ व्हेनिस, ज्यूलियस सीझर वगैरे काही नाटकांची त्यांनी स्वाहिली भाषेत भाषांतरेही केली आहेत.

आफ्रिकी देशांतील स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या कार्याचा तसेच टांझानियाच्या सर्वांगीण प्रगतीतील कार्याचा यथोचित गौरव, भारत सरकारने त्यांना जवाहरलाल नेहरू हा आंतरराष्ट्रीय सामंजस्याचा पुरस्कार देऊन केला (१९७३).

 

संदर्भ : 1. Listowel, Judith, Making of Tanganyika, London, 1965.

2. Smith, W. E. We Must Run While They Walk: A Portrait of Africa’s Julius Nyerere, New York, 1971.

लेखक - सु. र. देशपांडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate