कुर्ट व्हाल्टहाइम : ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष आणि ख्यातनाम राजनीतिज्ञ. जन्म व्हिएन्नाजवळच्या सेंट-अँड्रे-वुर्डन या उपनगरात. त्यांचे वडील सनदी सेवेत होते. दुसऱ्या महायुद्धकाळात जर्मन सैन्यात व्हाल्टहाइम दाखल झाले. युद्धात जखमी होऊन (१९४१) ते परतले आणि नंतर व्हिएन्ना विद्यापीठाची कायदा विषयातील डॉक्टरेट पदवी त्यांनी मिळवली (१९४४). त्यानंतर ते परराष्ट्रीय सेवेत रुजू झाले. प्रारंभी त्यांना शांतता तहाच्या कामासाठी पॅरिसला पाठविण्यात आले (१९४५). त्यानंतर आस्थापना खात्याचे प्रमुख म्हणून व्हिएन्ना येथे त्यांची नियुक्ती झाली (१९५१). पुढे काही काळ ते कॅनडामध्ये ऑस्ट्रियाचे राजदूत होते (१९५६-१९६०). पुढे ते ऑस्ट्रियाचे परराष्ट्रमंत्री झाले (१९६८-१९७०). संयुक्त राष्ट्रांमध्ये ऑस्ट्रियाच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्वही त्यांनी केले. १९५८ मध्ये ऑस्ट्रिया संयुक्त राष्ट्रांचा सदस्य बनला.
महासचिव ऊ थांट ह्यांच्या राजीनाम्यानंतर (१९७२) व पुन्हा १९७६ मध्ये व्हाल्टहाइम ह्यांची संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवपदी निवड झाली. संयुक्त राष्ट्रांनी संमत केलेल्या धोरणाची वा ठरावाची अंमलबजावणी न करणार्याय सदस्य राष्ट्रांच्या विरोधी कारवाई करण्याचे तत्त्व त्यांनी पुरस्कृत केले. त्याचबरोबर संबंधित राज्यांच्या अंतर्गत राजकारणात युनोच्या महासचिवाला हस्तक्षेप करण्याचा नैतिक अधिकारही असल्याचे मत व्यक्त केले. त्यांनी बांगला देश, कंबोडिया व अन्य काही देशांतून मदतीच्या योजना राबविल्या. कंबोडियातून व्हिएटनामी सैन्य काढून घेणे, इझ्राएली सैन्याने व्यापलेला वादग्रस्त प्रदेश, द. आफ्रिका व रशिया यांनी अनुक्रमे नामिबिया व अफगाणिस्तान या देशांत केलेला ससैनिकी हस्तक्षेप, इराणने ओलीस ठेवलेले अमेरिकन नागरिक यांसारख्या आंतरराष्ट्रीय प्रकरणांत मात्र त्यांना अपेक्षित यश लाभले नाही. ते तिसऱ्यांदा महासचिवपदासाठी उभे राहू इच्छित होते; पण चीनने त्यास कडवा विरोध केला. व्हाल्टहाइम ह्यांनी तत्पूर्वी १९७१ मध्ये ऑस्ट्रियाच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी एकदा अयशस्वी प्रयत्न केला होता. त्यानंतर पुढे काँझर्वेटिव्ह पीपल्स पार्टीचे उमेदवार म्हणून त्यांची सहा वर्षांसाठी राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली (१९८६). या वेळी दुसऱ्या महायुद्धकाळातील त्यांच्या हालचालींबाबतचा, विशेषत: ज्यूंची हद्दपारी आणि हत्या यांविषयीचा, गुप्त अहवाल उघडकीस आणण्याचे प्रयत्न विरोधी पक्षाने केले; पण व्हाल्टहाइम ह्यांनी या आरोपांचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला.
लेखक - सु. र. देशपांडे
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष (१९६९–७१) आणि एक कुशल स...
मन्रो, जेम्स : (२८ एप्रिल १७५८ – ४ जुलै १८३१). अम...
फिलीपीन्सचा लोकप्रिय तिसरा राष्ट्राध्यक्ष रामॉन मा...
टांझानिया प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष व ए...