অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आर्थर केली

आर्थर केली

आर्थर केली : (१६ ऑगस्ट १८२१ – २६ जानेवारी १८९५). इंग्लिश गणितज्ञ. गणितीय विश्लेषण व बीजगणित या विषयांत महत्त्वाचे कार्य. त्यांचा जन्म रिचमंड, सरे येथे झाला. त्यांचे शिक्षण किंग्ज कॉलेज, लंडन व ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज येथे झाले. १८४२ मध्ये आणि परत १८७५ मध्ये ट्रिनिटी कॉलेजचे फेलो म्हणून त्यांची निवड झाली. १८४९ साली त्यांनी वकिली करण्यास सुरुवात केली व त्याचबरोबर त्यांनी गणितातील संशोधनही चालू ठेवले. त्यांच्या गणितातील महत्त्वाच्या कार्यामुळे १८६३ मध्ये त्यांची केंब्रिज येथे शुद्ध गणिताच्या प्राध्यापकपदावर नेमणूक झाली आणि याच जागेवर त्यांनी मृत्युपावेतो कार्य केले.

त्यांचे महत्त्वाचे गणितीय कार्य बैजिक रूपे व बैजिक निश्चल राशी, अवकल समीकरणे, विवृत्तीय फलने [→ फलन], निर्धारक व आव्यूह सिद्धांत यांसंबंधी होते. गट सिद्धांत, प – मितीय भूमिती, परिमेय रूपांतरणे व वक्रांमधील संगती इ. विषयांसंबंधी त्यांचे कार्य प्रसिद्ध आहे. आव्यूहांसंबंधीचे एक प्रमेय त्यांच्या नावाने ओळखले जाते.

आबेलियन इंटिग्रल्स (१८४८), थिअरी ऑफ डिटरमिनेट्स (१८५४), एलेमेंटरी ट्रिटाइज ऑन एलिप्टिकल फंक्शन्स (१८७६) व सिंगल अँड डबल थीटा फंक्शन्स (१८८१) हे त्यांचे ग्रंथ महत्त्वाचे ठरले आहेत. त्यांचे बरेचसे निबंध क्वार्टर्ली जर्नल ऑफ मॅथेमॅटिक्स या नियतकालिकात प्रसिद्ध झाले. त्यांचे सु. ९०० गणितीय निबंध १३ खंडांत १८८९ – ९८ या काळात एकत्रितपणे प्रसिद्ध करण्यात आले.

ऑक्सफर्ड, डब्लिन व लेडन या विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय पदव्या दिलेल्या होत्या. वयाच्या ३१ व्या वर्षी त्यांची रॉयल सोसायटीच्या फेलोपदावर निवड झाली व सोसायटीच्या रॉयल (१८५९) व कॉप्ली (१८८२) या पदकांचा त्यांना बहुमान मिळाला. ते रॉयल अॅलस्ट्रॉनॉमिकल सोसायटी (१८७२ – ७३) व ब्रिटिश अॅ्सोसिएशन या संस्थांचे अध्यक्ष होते. ते केंब्रिज येथे मृत्यू पावले.

 

 

लेखक - व. ग. भदे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 5/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate