एडवर्ड अलेक्झांडर वेस्टरमार्क : (२० नोव्हेंबर १८६२–३ सप्टेंबर १९३९). फिनिश समाजशास्त्रज्ञ आणि मानवशास्त्रज्ञ. फिनलंडमधील हेलसिंकी येथे तो जन्मला. हेलसिंकी विद्यापीठात त्याचे शिक्षण झाले. ह्याच विद्यापीठातून १८९० साली त्याने पीएच्.डी. मिळविली. १८९० ते १९०६ ह्या काळात वेस्टरमार्कने हेलसिंकी विद्यापीठात समाजशास्त्राचे अध्यापन केले. १९०६ नंतर १९१८ पर्यंत ह्याच विद्यापीठात त्याने नैतिक तत्त्वज्ञान शिकविले. फिनलंडमधील ओब्यू अकादमीचा पहिला प्रमुख म्हणून त्याने १९१८ ते १९२१ पर्यंत काम पाहिले. येथेच तत्त्वज्ञानाचे अध्यापनही केले. १९०७ ते १९३० पर्यंत लडंन विद्यापीठाच्या ईस्टर सत्रात दरवर्षी तो समाजशास्त्राचे अध्यापन करीत असे. ब्रानीस्लॉ कास्पेर मॅलिनोस्की, मॉरिस गिन्झबर्ग, जी. सी. व्हीलर, राफेल कार्स्टन ह्यांसारखे पुढे ख्यातनाम झालेले समाजशास्त्रज्ञ त्याचे शिष्य होते. वेस्टरमार्कने आपले प्रमुख ग्रंथ इंग्रजीत लिहिलेले आहेत
द हिस्टरी ऑफ ह्यूमन मॅरिज (१८९१) हा वेस्टरमार्कचा पहिला ग्रंथ होय. ह्या ग्रंथात आदिवासी समाजातील लैंगिक स्वैराचार आणि प्राचीन काळातील समूह विवाहपद्धती ह्यांबद्दलच्या, त्यांच्या काळी प्रचलित असलेल्या उपपत्तींवर टीका केली. आदिवासी हा लैंगिक स्वैराचाराचे जीवन जगत होता, हे मत त्याने अमान्य केले आणि एकविवाह (मानॉगमी) हाच विवाहप्रकार मुळात प्रचलित होता, असे स्वत:चे मत मांडले. ह्या ग्रंथाच्या लेखनासाठी सामग्री जमविताना वेस्टरमार्कने ब्रिटिश म्यूझीअममध्ये जाऊन संशोधन केले. त्याचप्रमाणे जगाच्या विविध भागांतील आदिवासी जमातींमध्ये सु. १२५ व्यक्तींना त्याने एक प्रश्नावलीही पाठविली. वेस्टरमार्कच्या ह्या पहिल्याच ग्रंथाचे फ्रेंच, जर्मन, स्वीडिश, इटालियन, जपानी आणि स्पॅनिश भाषांमध्ये अनुवाद झाले. १९२१ साली ह्या ग्रंथाची पाचवी आवृत्ती पुनर्लिखित आणि परिवर्धित स्वरूपात (३ खंडांत) प्रसिद्ध झाली.
ए शॉर्ट हिस्टरी ऑफ मॅरिज (१९२६) हा वेस्टरमार्कचा आणखी एक उल्लेखनीय ग्रंथ होय. ह्या ग्रंथात त्याने अगम्य आप्तसंभोगासंबंधीचे आपले विचार मांडले. एकाच कुटुंबातील वा कुलातील (क्लॅन) स्त्रीपुरुषांमध्ये एकमेकांविषयी लैंगिक आकर्षण राहत नाही, उलट अशा लैंगिक संबंधांविषयी एक प्रकारची अनिच्छा, नावड निर्माण होते. ह्या अनिच्छेतूनच अगम्य आप्तसंभोगासंबंधीचे निषेधात्मक नियम निर्माण झाले. असे निषेधात्मक नियम असले, तरीही ते कधीकधी का मोडले जातता, ह्याचीही काही कारणे वेस्टरमार्कने दिलेली आहेत. तथापि रोजच्या संपर्कामुळे आणि नित्याच्या कामांमधील सहभागामुळे परस्परांशी लैंगिक संबंध ठेवण्याबाबत जर स्वाभाविक अनिच्छा निर्माण होत असती, तर अगम्य आप्तसंभोगासंबंधीचे निषेधात्मक नियम निर्माण करण्याची गरजच भासली नसती. शिवाय रोजचा संपर्क आणि नित्याच्या कामात सहभाग ह्यामुळे स्त्रीपुरुषांमध्ये परस्परांविषयी लैंगिक अनिच्छा निर्माण होते, असे दिसत नाही. त्यामुळे वेस्टरमार्कचे हे मत विवाद्य ठरते.
वेस्टरमार्कच्या थ्री एसेज ऑन सेक्स अँड मॅरिज (१९३४) हा ग्रंथ द हिस्टरी ऑफ ह्यूमन मॅरिज ह्या ग्रंथाच्या पुरवणीसारखा आहे, असे म्हणता येईल. ह्यातील पहिल्या निबंधात फ्रॉइडने मांडलेल्या ईडिपस गंडाच्या उपपत्तीवर त्याने टीका केली आहे; दुसऱ्या निबंधात बहिर्विवाहाविषयीच्या उपपत्तीचे विवेचन आहे, तर तिसऱ्यात रॉबर्ट ब्रिफॉल्ट ह्या त्याच्या टीकाकाराने त्याच्यावर केलेल्या टीकेला त्याने दिलेले उत्तर आहे. वेस्टरमार्कच्या अन्य ग्रंथांत द ऑरिजिन अँड डिव्हेलपमेंट ऑफ द मॉरल आय्डियाज (२ खंड,१९०६– ०८), एथिकल रेलटिव्हिटी (१९३२) आणि अर्ली बिलीफ्स अँड देअर सोशल इन्फ्लुअन्स (१९३२) ह्यांचा समावेश होतो.
द ऑरिजिन... लिहिताना वेस्टरमार्कने आपल्या पहिल्या ग्रंथात वापरली होती, तशीच तुलनात्मक अभ्यासाची पद्धत वापरली. नैतिक निर्णय हे अंतिमत: बुद्धीवर नव्हे, तर भावनांवर आधारलेले असतात, त्यामुळे त्यांचे प्रामाण्य वस्तुनिष्ठ नसते, असे आपले मत त्याने ह्या ग्रंथात व्यक्त केले आहे. एथिकल रेलटिव्हिटी मध्ये नैतिकतेच्या व्यक्तिनिष्ठ स्वरूपाबद्दलचे आपले विचार त्याने अधिक स्पष्टपणे मांडले. वेस्टरमार्कच्या मते नीतिशास्त्राचा हेतू मानवी वर्तणुकीचे नियम घालून देणे हा नसून नैतिक जाणिवेचा अभ्यास करणे हा होय. आरंभीच्या धार्मिक आणि यातुविषयक कल्पनांचा सामाजिक संस्थांवर कसा प्रभाव पडलेला आहे, हे त्याने अर्ली बिलीफ्स... मध्ये स्पष्ट केले आहे. फिनलंडमधील लापिनलाहटी येथे तो निधन पावला.
लेखक - अ. र. कुलकर्णी
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/21/2020
जर्मन समाजशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म बूडापेस्ट (हंगे...
जर्मन तत्त्ववेत्ता आणि समाजशास्त्रज्ञ. बर्लिन येथे...
साम्यवादी विश्वक्रांतीचा कृतिशील पुरस्कर्ता, समाजश...
प्रसिद्ध अमेरिकन समाजशास्त्रज्ञ. जन्म कोलोरॅडो स्प...