(२७ मार्च १८९३–९ जानेवारी १९४७). जर्मन समाजशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म बूडापेस्ट (हंगेरी) येथे झाला. शालेय शिक्षण तेथेच पूर्ण करून बूडापेस्ट, बर्लिन, पॅरिस, फ्रायबर्ग येथे त्यांनी उच्च शिक्षण घेतले आणि हायडल्बर्ग विद्यापीठात संशोधन करून पीएच्. डी. मिळवली (१९२२). १९२६–३० या काळात हायडल्बर्ग विद्यापीठात व त्यानंतर फ्रँकफुर्ट विद्यापीठात समाजशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केल्यावर १९३३ मध्ये नाझी राजवटीच्या दडपणामुळे जर्मनी सोडून ते ब्रिटनमध्ये आले. लंडन विद्यापीठात (लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स) समाजशास्त्राचे प्राध्यापक म्हणून (१९३३–४५) आणि नंतर त्याच विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनमध्ये शिक्षणशास्त्र व समाजशास्त्राचे प्राध्यापक म्हणून अखेरपर्यंत त्यांनी काम केले.त्यांच्या अनेक समकालीनांप्रमाणेच मार्क्सच्या आर्थिक नियतिवादाच्या खंडनातून त्यांच्या वैचारिक भूमिकेचा उगम झालेला दिसतो. व्यक्ती व समूहांच्या सामाजिक स्थानानुसार त्यांचे आकलन व अभिव्यक्ती निश्चित होतात आणि विशिष्ट मतप्रणाली हा त्याचाच एक भाग असतो. त्यामुळे समाजात मतभिन्नता (डिसेन्शन्स) आढळते व त्यातून सामाजिक संघर्ष निर्माण होतात (मार्क्सने म्हटल्याप्रमाणे केवळ आर्थिक हितसंबंधांच्या संघर्षाच्या जाणिवेतून नव्हे) असे त्यांचे मुख्य प्रतिपादन होते.
सामाजिक एकवाक्यता प्रस्थापित करणे ही समाजाची खरी गरज असून त्यासाठी बुद्धिवंत अभिजनांच्या वैचारिक स्वातंत्र्याची आवश्यकता आहे, असे ते मानीत. मानवी कल्पना व कृती यांच्या संबंधांकडे पाहण्याचा हा जो विशिष्ट दृष्टीकोन त्यांनी विकसित केला, त्यालाच पुढे ‘ज्ञानाचे समाजशास्त्र’ (सोशियालॉजी ऑफ नॉलेज) असा महत्त्वाच्या संकल्पनेचा दर्जा मिळाला. त्यांचे एकूण चिंतन हे समाजाचा साकल्याने विचार करणारे व व्यापक समष्टिसमाजशास्त्रीय (मॅक्रोसोशियॉलॉजिकल) विचार करणारे असे होते. ब्रिटनमधील वास्तव्यात व्यावहारिक प्रश्नांच्या अधिक जवळ येऊन त्यांनी लोकशाहीप्रणीत नियोजन, धर्माची सामाजिक धोरणातील उपयुक्तता, सत्ता, व्यक्तिस्वातंत्र्य, आधुनिक समाजरचना यांसारख्या विषयांवरही लिखाण केलेले आढळते. सर्वंकषवादी राज्यापेक्षा लोकशाही समाजवादाचा पुरस्कार, हे त्यांच्या विचारसरणीचे सूत्र होते. फ्रॉइडप्रणीत मनोविश्लेषणात्मक मानसशास्त्राकडेही ते वळले होते. समाजशास्त्र हे समाजातील समस्यांवर उपाय शोधून काढणारे असले पाहिजे, अशी त्यांची प्रथमपासून शेवटपर्यंत धारणा होती.
त्यांनी निर्माण केलेल्या अनेक प्रश्नांवर नंतरच्या काळात थीओडोर गायगर, रॉबर्ट मर्टन, टॅलकॉट पार्सन्झ, लुई कोझर व इतर अनेकांनी संशोधन केले; पण त्यांची अभ्यासपद्धती किंवा विचारप्रणाली पुढे नेणारा उल्लेखनीय अनुयायी मात्र झाला नाही. त्यांनी सु. १५ ग्रंथ लिहिले. त्यांपैकी काही महत्त्वाचे पुढीलप्रमाणे : आयडिऑलॉजी अँड यूटोपिया (जर्मन १९२९, इं. भा. १९३६), एसेज ऑन द सोशियॉलॉजी ऑफ नॉलेज (१९२३, इं. भा. १९५२), मॅन अँड सोसायटी इन ॲन एज ऑफ रिकन्स्ट्रक्शन (१९३५, इं. भा. १९४०), फ्रीडम, पॉवर, अँड डेमोक्रॅटिक प्लॅनिंग (इं. १९५०), एसेज ऑन द सोशियॉलॉजी ऑफ कल्चर (इं. १९५६).
संदर्भ : 1. Merton, Robert, Social Theory and Social Structure, (pages 489-508), New York,. 1957.
2. Polanyi, Michael. Personal Knowledge : Towards a Post-Critical Philosophy, Chicago, 1959.
लेखक - य. भा. दामलेअंतिम सुधारित : 10/7/2020
साम्यवादी विश्वक्रांतीचा कृतिशील पुरस्कर्ता, समाजश...
प्रसिद्ध अमेरिकन समाजशास्त्रज्ञ. जन्म कोलोरॅडो स्प...
प्रसिद्ध ब्रिटिश समाजशास्त्रज्ञ व सांख्यकीतज्ञ, ज...
जर्मन तत्त्ववेत्ता आणि समाजशास्त्रज्ञ. बर्लिन येथे...