गेओर्ख झिमेल : (१ मार्च १८५८–२६ सप्टेंबर १९१८). जर्मन तत्त्ववेत्ता आणि समाजशास्त्रज्ञ. बर्लिन येथे जन्म व शिक्षण. त्याने इतिहास, लोकमानसशास्त्र, तत्त्वज्ञान, कला आदी विषयांचा व्यासंग केला. कांटच्या तत्त्वज्ञानावरील त्याच्या प्रबंधाला पारितोषिक मिळाले. १८८१ मध्ये त्याला बर्लिन विद्यापीठाची डॉक्टरेट मिळाली. तेथेच त्याने १८८५ पासून तत्त्वज्ञानाचे अध्यापन केले. तसेच १९१४ पासून स्ट्रॅस्बर्ग विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे अध्यासन भूषविले. ‘जर्मन सोशिऑलॉजिकल असोसिएशन’ची त्याने माक्स व्हेबरसमवेत स्थापना केली (१९१०). नीत्शे, कांट, हेगेल, शोपेनहौअर इत्यादींचा त्याच्यावर प्रभाव होता. सामाजिक आंतरक्रिया, समूहांतील परस्परसंबंध, सामाजिक संघर्षसिद्धांत, सामाजिक दूरीभवन, समाजाची संरचना, समूहसंघटन, मानवी व्यक्तिमत्त्व व समाजाचे स्वरूप इ. विषयांवर त्याने शास्त्रशुद्ध लिखाण केले. समाजशास्त्रीय पद्धतिमीमांसा या विषयावर त्याने केलेले लिखाण विशेष मौलिक आहे.
मनुष्य बाह्य वस्तूंचा उपयोग करून आंतरिक क्षमतेच्या जोरावर त्या आत्मसात करतो आणि संस्कृती निर्माण होते. व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ अशा दोन बाजू असतात. मनुष्याचे जीवन संघर्षाने भरले आहे, संघर्षामुळे तणाव निर्माण होतात आणि त्यात मनुष्य गुरफटला जातो. अशा स्वरूपाचे विचार त्याने मांडले. त्याचे विचार त्रुटित स्वरूपाचे होते; तरीही त्यांचा प्रभाव दूरगामी झाला. केवळ माहितीवजा असलेले सामाजिक घटकांबद्दलचे विवेचन त्याने तात्त्विक सिद्धांताच्या पातळीवर नेले. समाजशास्त्राला शास्त्रीय दर्जा मिळवून देणारा तो एक आद्य समाजशास्त्रज्ञ होय. त्याच्या तत्त्वज्ञानपर लिखाणामध्ये अस्तित्ववादाच्या आधुनिक विचारसरणीची बीजे आढळून येतात. स्ट्रॅस्बर्ग येथे त्याचे निधन झाले.
संदर्भ : 1. Coser, L. A., Ed. Georg Simmel, Englewood Cliffs, N.J., 1965.
2. Wolff, Kurt H. Ed. Georg Simmel, 1858–1918, Ohio, 1959.
लेखक - सुधा काळदाते
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/4/2020
साम्यवादी विश्वक्रांतीचा कृतिशील पुरस्कर्ता, समाजश...
प्रसिद्ध ब्रिटिश समाजशास्त्रज्ञ व सांख्यकीतज्ञ, ज...
फिनिश समाजशास्त्रज्ञ आणि मानवशास्त्रज्ञ. फिनलंडमधी...
जर्मन समाजशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म बूडापेस्ट (हंगे...