जॉन फिट्सजेरल्ड केनेडी : (२९ मे १९१७ – २२ नोव्हेंबर १९६३). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा सर्वांत तरुण व लोकप्रिय पस्तिसावा अध्यक्ष. कॅथलिक पंथाचा हा पहिला अध्यक्ष होय. मॅसॅचूसेट्समधील ब्रुकलिन येथे सधन घराण्यात जन्मला. हार्व्हर्ड विद्यापीठातून त्याने १९४० साली पदवी घेतली. तत्पूर्वी त्याने इंग्लंडमध्ये आपल्या वडिलांचा स्वीय साहाय्यक म्हणून काम केले. वडील जोसेफ हे त्यावेळी इंग्लंडमध्ये अमेरिकेचे वकील होते. या सुमारास त्याने यूरोपच्या निरनिराळ्या देशांचा प्रवास केला आणि व्हाय इंग्लंड स्लेप्ट हे पुस्तक लिहिले. सप्टेंबर १९४१ मध्ये तो अमेरिकेच्या नाविक दलात भरती झाला. नाविक दलातून निवृत्त झाल्यावर त्याने काही दिवस वर्तमानपत्राचा बातमीदार म्हणून काम केले. १९४६ ते १९५२ च्या दरम्यान तो हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचा सभासद म्हणून तीन वेळा निवडून आला. तो मॅसॅचूसेट्समधून १९५२ मध्ये सिनेटर म्हणून निवडून आला. जॅक्वेलिन ली बूव्हीअर या सुंदर व श्रीमंत मुलीशी त्याची गाठ पडली आणि पुढे त्यांच्या मैत्रीची परिणती विवाहात झाली. १२ सप्टेंबर १९५३ रोजी सीनेटर असताना मत्स्योद्योग आणि वस्त्रोद्योग यांसारख्या धंद्यांस उत्तेजन देणारी अनेक विधेयके त्याने मांडली. त्याच्या पाठीच्या कण्याच्या शस्त्रक्रियेनंतर विश्रांतीच्या काळात त्याने प्रोफाइल्स इन करेज (१९५६) हे पुस्तक लिहिले. या पुस्तकास पुलिट्झर पारितोषिक मिळाले.
सीनेटर असताना त्याने अर्धविकसित तसेच लोकशाहीवादी राष्ट्रांना मदत करण्यावर भर दिला; वंश भेद नाहीसा करण्याचा अधिकार संघराज्यांस देणाऱ्या विधेयकास त्याने पाठिंबा दिला; शिवाय संघराज्याची नोकरी वा मदत घेणाऱ्यास कम्युनिस्ट नसल्याबद्दलचे शपथपत्र देण्यास भाग पाडणारा कायदा रद्द करण्याचा त्याने आग्रह धरला. त्याने १९५६ पासूनच पुढील अध्यक्षीय निवडणुकीच्या तयारीस सुरुवात केली. तीत त्यास रॉबर्ट व एडवर्ड या बंधुद्वयाचे फार साहाय्य झाले. त्याने जिद्दीने प्रचार करून निक्सनविरोधी १९६१ ची अध्यक्षीय निवडणूक जिंकली आणि २० जानेवारी १९६१ रोजी अध्यक्षीय सूत्रे हाती घेतली. अध्यक्ष म्हणून त्याने स्वीकारलेला कार्यक्रम ‘नवीन दिशा’ या नावाने ओळखला जातो. वाढता वंशभेद, बेकारी व निष्क्रिय अर्थव्यवस्था हे अंतर्गत प्रश्न त्याला भेडसावीत होते, तर आंतरराष्ट्रीय क्षेत्रात कम्युनिस्टांचा प्रभाव व सत्ता वाढून अणुयुद्धाची भीती निर्माण झाली होती. पण सर्व परिस्थिती त्याने कुशलतेने हाताळली. अंतर्गत जॉन केनेडीजॉन केनेडी परिस्थिती हाताळण्याकरिता त्याने आर्थिक दृष्ट्या मागास क्षेत्रात मदत देण्याचे विधेयक मंजूर करून घेतले, किमान वेतनवाढ केली व व्यापारवृद्धी अधिनियम मंजूर करून घेतले. अंतराळ कार्यक्रमाची योजना त्याने अंमलात आणून पाहिले अंतराळ उड्डाण यशस्वी करून दाखविले व चंद्रावर मनुष्य पाठविण्याचा कार्यक्रम आखला. पोलादाच्या भाववाढीची एका मोठ्या कंपनीची योजना त्याने रद्द करावयास लाविली. त्याची वृद्धांची काळजी घेण्याची योजना आणि शेतकी कार्यक्रम मात्र काँग्रेसने फेटाळून लावला. परराष्ट्रीय धोरणात लॅटिन अमेरिकेला मदत करण्याकरिता त्याने दशवार्षिक कार्यक्रम तयार केला. मे १९६१ मध्ये व्हिएन्ना येथे रशियाचे पंतप्रधान ख्रुश्चॉव्ह यांची भेट घेऊन शीतयुद्ध थांबविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
एप्रिल १९६१ मध्ये क्यूबाच्या कास्ट्रोविरुद्ध केलेल्या मोहिमेबद्दल त्याच्यावर अमेरिकेत कडाडून टीका करण्यात आली. पण ऑक्टोबर १९६२ मध्ये त्याने खंबीर भूमिका घेऊन रशियाला क्यूबामधून क्षेपणास्त्रे मागे घेण्यास भाग पाडले. याकरिता त्याची प्रशंसाही झाली. त्याने पश्चिम अटलांटिक संघ मजबूत केला. व्हिएटनाममधील कम्युनिस्टविरोधी शक्तीस त्याने आणीबाणीच्या प्रसंगी मदत केली. जुलै १९६३ मध्ये रशिया व ग्रेट ब्रिटनशी मर्यादित अण्वस्त्र चाचणी बंदी करार करण्यात त्यास यश मिळाले. त्याच्या काळात निग्रोंनी समानतेचे हक्क मिळावेत, म्हणून निदर्शने केली. केनेडीला त्यांच्याबद्दल अत्यंत सहानुभूती होती. त्या दृष्टीने उपाहारगृहासारख्या सार्वजनिक ठिकाणी निग्रोंना प्रवेश मिळावा, या आशयाचे विधेयक संमत करण्याचे त्याने १९६३ मध्ये काँग्रेसला आवाहन केले. टेक्सस डेमोक्रॅटिक पक्षातील फूट १९६४ च्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी साधण्याकरिता केनेडीने टेक्सस संस्थानास भेट दिली असता तेथे डल्लास गावी त्याची मिरवणूक काढण्यात आली. त्या वेळी ली हार्वे ओस्वाल्ड याने त्याच्यावर गोळी झाडून त्याचा खून केला. सामाजिक न्यायाची तळमळ बाळगणाऱ्या या मानवतावादी खंद्या नेत्याच्या आकस्मित निधनामुळे सारे जग हळहळले.
संदर्भ : 1. Burns, J.M. John Kennedy : A Political Profile, New York, 1960.
2. Manchester, William, The Death of a President, New York, 1967.
3. Sidey, Hugh, John F. Kennedy, President, New York, 1964.
लेखक - खोडवे अच्युत
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एकथोर नेते, स्वतंत्र भ...
ही संज्ञा अनेक अर्थांनी वापरली जाते. कोणत्याही सभे...
घाना हे वसाहतवादाच्या जोखडातून मुक्त झालेले पहिले ...
आयर्लंडमधील होमरूल पक्षाचा पहिला अध्यक्ष व एक राष्...