অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चार्ल्स बुथ

चार्ल्स बुथ

चार्ल्स बुथ: (३० मार्च १८४०-२२ नोव्हेंबर १९१६). प्रसिद्ध ब्रिटिश समाजशास्त्रज्ञ व सांख्यकीतज्ञ, जन्म इंग्लंडमधील लिव्हरपूल येथे. त्यांचे वडील एक धनाढय व्यापारी व जहाजव्यापारसंस्थेचे मालक होते. बूथ यांनी आपले शिक्षण अर्ध्यावर सोडून आपला भाऊ ॲल्फ्रेड याच्याबरोबर वडिलांच्या व्यवसायात लक्ष घालण्यास सुरुवात केली. १८७१ साली त्यांचा मेरी मकॉली यांच्याबरोबर विवाह झाला. लवकरच प्रकृती अस्वास्थ्यामुळे व्यावसायिक भ्रमंती टाळून ते लंडनमध्ये स्थायिक झाले.

बूथ यांच्या मौलिक कार्याबद्दल केंब्रिज, लिव्हरपूल व ऑक्सफर्ड या विद्यापीठांनी त्यांना सन्मान्य डॉक्टरेट पदव्या देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. १८९२-९४ या काळात रॉयल सोसायटीचे ‘फेलो’, १९०५-९ या काळात ‘पुअर लॉ कमिशन’ चे सदस्य तसेच ‘रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटी’ चे अध्यक्ष. इ. बहुमानाची पदे त्यांनी भूषविली. प्रिव्ही कौन्सिलचे सभासद म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली होती. लेस्टरशरमधील व्हाइटविक येथे त्यांचे निधन झाले.

लंडनमधील वास्तव्यात त्यांना तेथील कामगार व इतर गरीब लोकांच्या सामाजिक व आर्थिक जीवनाचा जवळून परिचय झाला. तसेच नवोदित नागरी-औद्योगिक समाजातील समस्यांनीही त्यांचे लक्ष वेधून घेतले. तत्कालीन समाजातील प्रचंड आर्थिक विषमताही त्यांना तीव्रतेने जाणवली. दारिद्र्याचा, विशेषतः कामगार वर्गाच्या दारिद्र्याचा, प्रश्न पारंपरिक अर्थशास्त्रीय सिध्दांतांच्या आधारे सुटू शकणार नाही, त्यासाठी आवश्यक ती वस्तुस्थितिनिदर्शक माहिती गोळा करून तिच्या आधारे कृती केली पाहिजे, अशी त्यांची खात्री पटली. त्या दृष्टीने त्यांनी सर्वेक्षण संशोधनपद्धतीचा अवलंब करून कामगारांच्या व इतर गरीब व्यावसायिकांच्या जीवनमानाविषयी विपुल माहिती संकलित केली. ती सर्व माहिती व तिच्यावर आधारलेले आपले निष्कर्ष त्यांनी लाइफ अँड लेबर ऑफ द पीपल इन लंडन या आपल्या १७ खंडांमध्ये विभागलेल्या ग्रंथात प्रसिद्ध केले (१९०२-३).

या ग्रंथात बूथ यांनी आपले लक्ष दारिद्र्य, उद्योगधंदे व धार्मिक प्रभाव या तीन विषयांवर केंद्रित केलेले असून या १७ खंडांपैकी ४ खंड दारिद्र्य या विषयांसंबंधी आहेत. त्यामध्ये त्यांनी लंडनवासियांच्या गरिबीचे विवेचन केले आहे. लंडनवासियांपैकी ३०टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली जीवन जगतात या त्यांच्या निष्कर्षाने त्यावेळी अनेकांना धक्का बसला.

उद्योगधंद्याविषयीच्या ५ खंडांमध्ये त्यांनी लंडनमध्ये निरनिराळ्या उद्योग-व्यवसायांमध्ये गुंतलेल्या श्रमिकांविषयी माहिती देऊन विवरण केले आहे. त्यात लंडनमधील निरनिराळ्या व्यवसायांच्या जागा व त्या त्या व्यावसायिकांची राहण्याची ठिकाणे यांमधील संबंधाचे विश्लेषण केलेले आहे. पुढील७ खंडांमध्ये लंडनमधील लोकांच्या जीवनपद्धतीवरील धार्मिक प्रभावाचे विश्लेषण करण्याचा त्यांचा मनोदय होता असे त्या भागांच्या नावांवरून वाटते; तथापि प्रत्यक्षात मात्र त्यांनी या सात खंडांमध्ये लंडनमधील गरीब व कामकरी वर्गांच्या जीवनपद्धतीचेच वर्णन केले आहे. ग्रंथाच्या शेवटच्या खंडात, लोकसंख्येची घनता व दारिद्र्य यांमुळे जन्म-मृत्यूच्या प्रमाणावर होणाऱ्या परिणामांची नोंद त्यांनी जमविलेल्या माहितीच्या आधारे घेतली आहे.

ओल्ड एज पेन्शन्स ॲड द एजेड पुअर : अ प्रपोजल (१८९९), पुअर लॉ रिफॉर्म (१९१०), इंडस्ट्रिअल अनरेस्ट ॲड ट्रेड युनियन पॉलिसी (१९१३) हे त्यांचे अन्य उल्लेखनीय ग्रंथ होत.

बूथ यांच्या लेखनाने इंग्लंडमधील गरीब व कामगार वर्गातील लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडली. वृद्धावस्थेतील सर्वांनाच सेवानिवृत्ती वेतन मिळावे या तत्वाचा त्यांनी जोरदार पुरस्कार केला. त्यांनी यासंबंधी व इतरही काही बाबतीत सादर केलेल्या योजना तत्कालीन शासनाने स्वीकारल्या व त्यांना कायदेशीर स्वरुप दिले.

बूथ यांनी संख्याशास्त्रीय माहितीच्या आधारे काही महत्वपूर्ण असे तात्विक स्वरूपाचे समाजशास्त्रीय निष्कर्ष काढले. औद्योगिक शहरांमध्ये लोकवस्तीची विभागणी लोकांच्या सामाजिक वर्गस्थानानुसार होते व शहरांच्या मध्यवर्ती भागांमध्ये गरिबांची वस्ती वाढत जाते. अशा प्रकारचे ते निष्कर्ष होते.

आपल्या संशोधनपद्धतीने बूथ यांनी नागरी जीवनाच्या अभ्यासपद्धतीचा पायाच घातला. नंतर १९२० च्या सुमारास अमेरिकन समाजशास्त्रज्ञ रॉबर्ट पार्क व त्यांच्या सहकाऱ्यांनी अंगीकारलेल्या नागरी जीवन संशोधनपद्धतीची बीजे मुळात बूथ यांच्या अभ्यासपद्धतीनेच रुजविली होती. बूथ यांच्या संशोधन प्रयत्नातूनच सामाजिक सर्वेक्षण पद्धतीला उत्तेजन व मान्यता प्राप्त झाली.

 

संदर्भ : 1.Macauloy Booth, Mary, Charles Booth : A Memoir, London, 1918.

2. Simey, T.S.; Simey, M.B.Charles Booth, Social Scientist, Oxford, 1960.

लेखक - उत्तम भोईटे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 7/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate