অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चार्ल्स बॅबिज

चार्ल्स बॅबिज

चार्ल्स बॅबिज : (२६ डिसेंबर १७९२–१८ ऑक्टोबर १८७१). इंग्‍लिश गणितज्ञ व यंत्रज्ञ. आधुनिक स्वयंचलित  संगणकांना आधारभूत असलेली तत्त्वे विकसित करण्याचे महत्कार्य त्यांनी केले. बॅबिज यांचा जन्म टिनमथ, डेव्हनशर येथे झाला. १८१० मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठातील ट्रिनिटी कॉलेजमध्ये प्रवेश केला. बी. ए. व एम्. ए. या पदव्या मिळविण्यापूर्वीच त्यांनी गणित व भौतिकी या विषयांवर कित्येक निबंध लिहिले. यूरोपातील गणितासंबंधीच्या प्रगतीचा इंग्‍लंडमधील गणितज्ञांना परिचय व्हावा आणि विशेषतः त्या काळी  कलनशास्त्रात रूढ असलेल्या न्यूटन यांच्या संकेतन पद्धतीऐवजी जी. डब्ल्यू. लायप्‍निट्स या जर्मन गणितज्ञांची अधिक सुलभ पद्धती वापरण्यात यावी या दृष्टीने त्यांनी सर जॉन हर्शेल व जॉर्ज पीकॉक यांच्या समवेत अ‍ॅनॅलिटिकल सोसायटीची स्थापना केली. या तिघांनी मिळून एस्. एफ्. लाक्र्वा या फ्रेंच गणितज्ञांच्या  अवकलन व समाकलन या विषयावरील एका ग्रंथाचे १८१६ मध्ये भाषांतरही केले.

१८२७ मध्ये केंब्रिज येथे गणिताचे ल्यूकेशियन प्राध्यापक म्हणून त्यांची तयार करण्याच्या कार्यास पूर्णपणे वाहून घेण्यासाठी त्यांनी या पदाचा १८३८ मध्ये राजीनामा दिला. त्या काळी अस्तित्वात असलेल्या गणितीय कोष्टकांत काही चुका असल्याचे व प्रचलित पद्धतींनी त्या काढून टाकणे दुष्कर असल्याचे त्यांना आढळून आले आणि त्यामुळे कोष्टके तयार करण्यासाठी यांत्रिक प्रयुक्तीचा उपयोग करण्याविषयी त्यांनी १८१२-१३ च्या सुमारास विचार करण्यास प्रारंभ केला. नंतर त्यांनी कोष्टक तयार करण्यासाठी सांत अंतर सांत अंतर कलन या संकल्पनेचा उपयोग करून ज्यांची द्वितीय कोटीची अंतरे स्थिर आहेत, अशा फलनांची (गणितीय संबंधांची) आठ दशांश स्थलांपर्यंत मूल्ये देणारे कोष्टक तयार करणारे एक छोटे यंत्र तयार केले. १८२३ मध्ये त्यांनी सहाव्या कोटीच्या अंतरापर्यंत हिशेब करून २० दशांश स्थळापर्यंत मूल्ये देईल व ती छापलेल्या स्वरूपात मिळतील असे यंत्र ( ‘डिफरन्स एंजिन’ ) तयार करण्याकरिता सरकारी अनुदान मिळविले. या यंत्राचा अभिकल्प (आराखडा) निर्दोष होता. तथापि ते प्रत्यक्षात तयार करण्याकरिता लागाणाऱ्या अभियांत्रिकीय तंत्रात पुष्कळच विकास करणे आवश्यक होते आणि त्या दृष्टीने बॅबिज यांनी अखंड प्रयत्‍नही केले.

१८२६ मध्ये त्यांनी यंत्राच्या आरेखांकरिता नवीन संकेतन पद्धती शोधून काढली. त्यानंतर लंडनच्या रॉयल सोसायटीने शिफारस करूनही व दहा वर्षांहून अधिक काळ अनिर्णायक अवस्थेत ठेवूनही शेवटी १८४२ मध्ये सरकारने अधिक मदत देण्याचे नाकारले आणि अशा प्रकारे बॅबिज यांचे हे यंत्र पूर्ण होऊ शकले नाही. अर्धवट अवस्थेतील हे यंत्र लंडन येथील विज्ञान संग्रहालयात ठेवण्यात आले. १८५५ मध्ये रेऑरी शूट्झ या स्वीडिश अभियंत्यांनी बॅबिज यांच्या यंत्राच्या एका नियतकालिकातील वर्णनावरून चौथ्या कोटी पर्यंतची अंतरे घेऊन आठ दशांश स्थळांपर्यंत छापलेल्या स्वरूपात मूल्ये देणारे एक यंत्र यशस्वी रीत्या तयार केले. हे यंत्र अमेरिकेतील ऑल्बनी (न्यूयॉर्क) येथील डडली वेधशाळेत कित्येक वर्षे वापरात होते. मध्यंतरीच्या काळात बॅबिज यांनी पुढे विसाव्या शतकात प्रत्यक्षात असलेल्या स्वयंचलित संगणकाची (ज्याला त्यांनी त्या वेळी ‘अ‍ॅनॅलिटिकल एंजिन’ असे नाव दिले होते) तत्त्वे शोधून काढली. जे. एम्. जकार्ड यांनी रेशमाच्या विणकामासाठी तयार केलेल्या मागाप्रमाणे छिद्रित पत्रांच्या साहाय्याने चालणारे हे यंत्र तयार करण्यासाठी व त्याकरिता सरकारी अनुदान मिळविण्यासाठी बॅबिज यांनी पुष्कळ प्रयत्‍न केले पण ते निष्फळ ठरले. तथापि त्यांनी मांडलेली तत्त्वे मूलतः बरोबर असल्याचे दिसून आल्यामुळेच त्यांचे नाव प्रदीर्घ काळाच्या उपेक्षेनंतर आता प्रसिद्धीस आले आहे. त्यांनी इंग्‍लंड मधील सरकार व रॉयल सोसायटी यांच्याकडून विज्ञान व वैज्ञानिक यांच्या होणाऱ्या उपेक्षेवर तीव्र टीका केली. या विषयावर त्यांनी रिफ्लेक्शन्स ऑन द डिक्लाइन ऑफ सायन्स इन इंग्‍लंड (१८३०) व एक्स्पोझिशन्स ऑफ १८५१ (१८५१) हे ग्रंथ लिहिले. त्यांनी या संदर्भात अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी (१८२०), ब्रिटीश अ‍ॅसेसिएशन (१८३१), स्टॅटिस्टिकल सोसायटी ऑफ लंडन (१८३४) इ. संस्था स्थापन करण्यातही महत्त्वाचा भाग घेतला.

१८१६ मध्ये रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. त्यांनी गणित सांख्यिकी (संख्याशास्त्र), भौतिकी, यंत्राचा अभिकल्प, भूविज्ञान इ. विविध विज्ञानशाखांतील विषयांवर निबंध प्रसिद्ध केले. गणितीय कोष्टके तयार करण्यासाठी यंत्रांचा उपयोग करण्यासंबंधी त्यांनी लिहिलेल्या निबंधाला १८२२ मध्ये अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सूवर्ण पदक मिळाले. इकॉनॉमी ऑफ मशिन्स अँड मॅन्युफॅक्चर्स या १८३२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या आपल्या ग्रंथात त्यांनी यूरोपातील प्रवासात पाहिलेल्या विविध कारखान्यांच्या कार्यपद्धतीचे विश्लेषण केलेले असून संक्रियास्मक अन्वेषण (ऑपरेशन्स रिचर्स) या नावाने ओळखण्यात येणाऱ्या आजच्या विषयाचे पूर्वस्वरूप म्हणून त्याची गणना होते. त्यांनी तयार केलेली १ ते १,०८,००० या नैसर्गिक संख्यांच्या लॉगॅरिथमांची कोष्टके १८२७ मध्ये प्रसिद्ध झाली व त्यानंतर त्यांनी सुधारलेली कोष्टके स्पेसिमेन ऑफ लॉगॅरिथम टेबल्स या शीर्षकाखाली २१ खंडांत १८३१ मध्ये प्रसिद्ध झाली. ख्रिस्ती-तत्त्व समर्थनार्थ त्यांनी लिहिलेल्या द नाइन्थ ब्रिजवॉटर ट्रिटाइज (१८३७) हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. पॅसेजेस फ्रॉम द लाइफ ऑफ द फिलॉसॉफर (१८६४) या आत्मचरित्रपर ग्रंथातील रस्त्यावरील संगीतकारांच्या उपद्रावासंबंधी त्यांनी लिहिलेल्या वर्णनामुळे त्यांच्या सर्व वैज्ञानिक कार्यापेक्षाही अधिक प्रसिद्धी त्या वेळी त्यांना मिळाली होती. ते लंडन येथे मृत्यू पावले.

 

लेखक - स. ज. ओक / दि. वा. सणस

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/12/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate