অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जॉन एलियट केअर्न्झ

जॉन एलियट केअर्न्झ

जॉन एलियट केअर्न्झ : (२६ डिसेंबर १८२३ — ८ जुलै १८७५). स्पर्धा, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि श्रमविषयक बाजारपेठा यांच्या सिद्धांतांत बहुमोल भर घालणारा एक नामवंत आयरिश अर्थशास्त्रज्ञ, सनातन विचारधारेचा अखेरचा प्रतिनिधी म्हणून केअर्न्झ ओळखला जातो. आयर्लंडमधील कॅसल बेलिंगहॅम येथे त्याचा जन्म झाला. त्याचे शिक्षण डब्लिनच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये झाले. तेथेच तो १८५६ पासून अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून काम करू लागला. पुढे त्याने गॅलवेच्या क्वीन्स कॉलेज मध्ये आणि नंतर लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे अध्यासन भूषविले (१८६६ — ७२).

द कॅरेक्टर अँड लॉजिकल मेथड ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी (१८५७) या त्याच्या पहिल्या ग्रंथात त्याने अर्थशास्त्राच्या रीतिविधानाचे विवरण केले असून अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी केवळ निगमन पद्धतीचा अवलंब करता येईल, असा स्पष्ट निष्कर्ष काढला. परस्पर स्पर्धारहित गटांचे अस्तित्व हे आपल्या अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य असल्याचे सिद्ध करून त्याचा मूल्यविषयक उत्पादन खर्चाच्या सिद्धांतावर होणारा परिणाम त्याने विशद केला. विसाव्या शतकातील अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेल्या अपूर्ण स्पर्धेच्या सिद्धांतावर या संकल्पनेची छाया पडल्याचे दिसून येते. द स्लेव्ह पॉवर (१८६२ - ६३) या ग्रंथात गुलामांच्या अर्थव्यवस्थेच्या कार्यवाहीसाठी आवश्यक त्या परिस्थितीसंबंधीची आणि तिच्या अटळ सामाजिक परिणामांची चर्चा आढळते. हा ग्रंथ अमेरिकेच्या यादवी युद्धकाळात ब्रिटिश लोकमत उत्तरेकडील राज्यांकडे वळविण्यात अतिशय प्रभावी ठरला.

एसेज इन पोलिटिकल इकॉनॉमी, थिअरिटिकल अँड अ‍ॅप्लाइड (१८७३) ह्यातील ‘एसेज ऑन गोल्ड क्वेश्चन’ ह्या भागामध्ये केअर्न्झने ऑस्ट्रेलिया आणि कॅलिफोर्नियामधील सोन्याच्या शोधांबाबतच्या परिणामांचे मूल्यमापन केले असून, निरनिराळ्या काळांत व परिणामात्मक दृष्ट्या किंमतींवर त्या शोधांचे कसे परिणाम होत राहतील, ह्याचे विश्लेषण केले आहे. केअर्न्झचा सर्वांत महत्त्वाचा व अखेरचा ग्रंथ सम लीडिंग प्रिन्सिपल्स ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी न्यूली एक्स्पाउंडेड (१८७४) हा होय. त्यामध्ये सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांचे वैशिष्ट्यपूर्ण सिद्धांत पुन्हा मांडलेले आहेत. तो लंडन येथे मरण पावला.

 

लेखक - वि. रा. गद्रे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate