অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेलिंग, टॉमस क्राँबी

शेलिंग, टॉमस क्राँबी

शेलिंग, टॉमस क्राँबी  : (१४ एप्रिल १९२१-). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक. संघर्ष आणि सहकार्य या संकल्पनांची माहिती मोठया प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे कार्य त्यांनी ‘ खेळ सिद्धांता ’व्दारे (गेम थिअरी) केले. त्याबद्दल रॉबर्ट ऑमन या गणिती व अर्थशास्त्रज्ञासमवेत त्यांना नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले (२००५). त्यांचा जन्म जॉन एम्. शेलिंग आणि झेल्डा एम्. आयरेस शेलिंग या दांपत्यापोटी ऑकलंड (कॅलिफोर्निया राज्य) येथे झाला. त्यांचे शिक्षण कॅलिफोर्निया विदयापीठ (बर्कली) आणि हार्व्हर्ड विदयापीठ यांमधून झाले. त्यांचा पहिला विवाह कॉरिन टिगे सॅपॉस यांच्याशी झाला (१९४७). त्यांना तिच्यापासून चार पुत्र झाले. १९९१ मध्ये ते विभक्त झाले. त्याच वर्षी त्यांनी ॲलिस एम्. कोलमन या युवतीशी दुसरा विवाह केला. कॅलिफोर्निया विदयापीठातून (बर्कली) त्यांनी ए.बी. पदवी संपादिली (१९४४) आणि नंतर हार्व्हर्ड विदयापीठातून ते पीएच्.डी. झाले (१९५१).सुरूवातीस त्यांनी राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात काम केले (१९४८- ५३). त्यानंतर त्यांनी येल विदयापीठ (१९५३-५८) येथे व नंतर हार्व्हर्ड विदयापीठात (१९५८-९०) अध्यापन केले. १९९० पासून ते मेरिलंड विदयापीठात अध्यापन करीत आहेत. मध्यंतरी एक वर्ष त्यांनी रँड कॉर्पोरेशनमध्येही (१९५८-५९) काम केले.

शेलिंग यांनी मुख्यत्वे अर्थशास्त्राविषयी लिहिले. त्यांच्या गंथांपैकी नॅशनल इन्कम बिहेव्हिअर (१९५२), इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स (१९५८), द स्ट्रॅटिजी ऑफ कॉन्फ्लिक्ट (१९६०), स्ट्रॅटिजी अँड आर्म्स कंट्रोल (सहलेखक-मॉर्टन एच्. हॅलपेरिन, १९६१), आर्म्स अँड इन्फ्लुअन्स (१९६७), मायकोमोटिव्ह्‌ज अँड मॅक्रोबिहेव्हिअर (१९७८), चॉइस अँड कॉन्सिक्वेन्सिस (१९८४) इ. प्रसिद्घ व मान्यवर गंथ होत. द स्ट्रॅटिजी ऑफ कॉन्फ्लिक्ट या गंथात सौदाशक्ती आणि व्यूहतंत्रवर्तन या संकल्पनांची त्यांनी मीमांसा केली आहे. यात प्रथमच शेलिंगनी केंद्रबिंदूची संकल्पना स्पष्ट केली असून ती ‘ शेलिंग बिंदू ’(शेलिंग पॉइंट) या नावाने ओळखली जाते. तसेच अमेरिका व सोव्हिएट रशिया यांमधील आण्विक शस्त्रास्त्र स्पर्धेचे त्यांनी विश्लेषण केले. त्यात त्यांनी सामाजिक विज्ञानांकरिता ‘ खेळ सिद्धांत ’ ह्या गणिती तंत्राचा वापर केला. मर्यादित स्वरूपात वा कमाकमाने प्रतिपक्षावर सूड उगविणे (वा बदला घेणे) ही कल्पना त्यांनी आपल्या आर्म्स अँड इन्फ्लुअन्स या गंथातून मांडली; युद्धविषयक अर्थशास्त्रीय सिद्धांतही त्यांनी मांडले आहेत. त्यांचा अमेरिकन सरकारने उत्तर व्हिएटनाम युद्धात उपयोग केला (ऑपरेशन रोलिंग थंडर-१९६५). मात्र त्यात अमेरिकन सरकार अपयशी ठरले. शेलिंगने तीन आठवडयांच्या काळात कारवाईत यश न आल्यास, अमेरिकेने बाँबहल्ला सोडून दयावा, असे आवाहन केले होते.

शेलिंग यांनी वांशिक विलगतावादाच्या सिद्धांताचा शोधनिबंध प्रसिद्ध केला (१९७१). त्यात त्यांनी असे दाखवून दिले की, रंगरूपाने आपल्यासारख्याच असणाऱ्या आपल्या शेजारील लोकांविषयी अल्पसा आपलेपणा दाखविला, तर संपूर्ण विलगता नष्ट होईल.भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्या सूचनेनुसार जागतिक तापमान चर्चा आयोगाचे अध्यक्षपद शेलिंग यांच्याकडे देण्यात आले होते. त्यांच्या मते हवामानबदल हे विकसनशील राष्ट्रांपुढे मोठे आव्हान असून, अमेरिकेपुढे उभारण्यात आलेले आव्हान हे अतिरंजित स्वरूपाचे आहे. मार्शल योजनोत्तर कालखंडात आलेल्या अनुभवांच्या आधारे त्यांनी असे प्रतिपादन केले आहे की, विश्वविषयक तापमान ही सौदाबाजीची समस्या मानली पाहिजे. जर सबंध जगाने उत्सर्जन कमी केले, तर विकसनशील देशांना सर्वाधिक फायदे मिळतील आणि विकसित देशांना सर्वाधिक खर्च सोसावा लागेल.शेलिंग यांनी हार्व्हर्ड विदयापीठांतर्गत जॉन एफ्. केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट येथे ल्यूसिअस एन्. लीटेराटर प्रोफेसर ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी IIASA-लक्झेंबर्ग-ऑस्ट्रिया येथे १९९४-९९ पर्यंत संशोधन केले. त्यांनी कोपनहेगन मतैक्य परिषदेत एक तज्ज्ञ म्हणून भाग घेतला होता.

ऑमन, रॉबर्ट जॉन

(८ जून १९३०-). सुविख्यात इझ्राएली गणिती व अर्थशास्त्रज्ञ, अमेरिकन राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे सदस्य, तसेच २००५ च्या अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे टॉमस क्राँबी शेलिंग यांचे सहमानकरी. ‘ खेळ सिद्धांत ’ विश्लेषणाव्दारे त्यांनी संघर्ष व सहकार यांचे प्रबोधन अधिक सखोलपणे समजावून दिले. त्या योगदानाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यांचा जन्म फ्रँकफुर्ट (प. जर्मनी) येथे झाला. त्यांना इझ्राएल व अमेरिकेची संयुक्त संस्थाने या दोन्ही देशांचे नागरिकत्व देण्यात आले आहे. ते इझ्राएलच्या हिबू (जेरूसलेम) विदयापीठात गुणश्री प्राध्यापक आहेत.ऑमन यांनी आपल्या आईवडिलांसमवेत १९३८ मध्ये जर्मनीहून अमेरिकेत स्थलांतर केले. त्यांचे शालेय व उच्च शिक्षण न्यूयॉर्कमध्येच झाले. त्यांनी गणितातील बी.ए. (१९५२) घेऊन पुढे मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पीएच्.डी. पदवी मिळविली (१९५५) व हिब्रू विदयापीठात निवृत्तीपर्यंत (१९५६-२०००) अध्यापन केले.ऑमन यांचे सर्वांत मोठे योगदान हे पुनःपुन्हा घडणाऱ्या खेळांमधून प्रकट झाले आहे. या खेळांत अशा अवस्था वा स्थिती येतात, की ज्यांत खेळाडूंना त्याच त्याच अवस्थांशी पुनश्च सामना करावा लागतो. खेळ सिद्धांतामध्ये परस्परसंबद्घ समतोल संकल्पनाची प्रथम मांडणी करण्याचे श्रेय ऑमन यांना देण्यात येते. याशिवाय त्यांनी खेळ सिद्धांतामधील सामान्यज्ञान संकल्पना ही प्रथमच मांडली. ऑमननी ज्यूंच्या वाङ्‌मयामधील द्विधा समस्यांचे विश्लेषण करण्याकरिता खेळ सिद्धांताचा वापर केला. ‘ विभाजन ’ समस्येचे गूढ उलगडण्याच्या कामात त्यांना यश मिळाले. उदा., मृत पतीच्या संपत्तीचा वाटा त्याच्या तीन भार्यांमध्ये कशा पद्धतीने विभक्त करावा, ही प्रदीर्घ काळ प्रलंबित झालेली समस्या त्यांनी उकलून दाखविली. ऑमन यांनी ‘ वॉर अँड पीस ’ या आपल्या नोबेल पुरस्कारानिमित्त दिलेल्या व्याख्यानात पुढील विधान मांडले होते. ‘ भाबडेपणाने प्रसृत केलेली शांतता ही युद्धाला निमंत्रण देते, तर शस्त्रास्त्र स्पर्धा, युद्घविषयक धमक्या, पारस्परिक विनाश करण्याचा जोर या गोष्टी निश्चितपणे युद्घ टाळू शकतात ’.

त्यांना नोबेलव्यतिरिक्त खालील पुरस्कार प्राप्त झाले : हार्वे विज्ञान व तंत्रविदया पुरस्कार, १९८३; अर्थशास्त्रीय संशोधनार्थ इझ्राएल पुरस्कार, १९९४; एमेट अर्थशास्त्र पुरस्कार, २००२; जेरूसलेम निर्मिती पुरस्कार, २००६; जानोस बोल्यायी पुरस्कार; जॉन फॉन न्यूमन सिद्धांत पुरस्कार. ऑमन यांचे निवडक साहित्य पुढीलप्रमाणे : आस्फीरिसिटी ऑफ आल्टरनेटिंग नॉटस (१९५६), व्हॅल्यूज ऑफ नॉन-ॲटॉमिक गेम्स (सहलेखक- एस्. एस्. शेप्ली, १९७४), गेम थिअरी (हिब्रू , १९८१), लेक्चर्स ऑन गेम थिअरी (१९८९), हँडबुक ऑफ गेम थिअरी विथ इकॉनॉमिक ॲप्लिकेशन्स (१९९५), रिपीटेड गेम्स विथ इन्कम्प्लीट इन्फर्मेशन आणि कलेक्टेड पेपर्स, खंड, १, २ (२०००).

 

 

लेखक - गद्रे वि. रा.

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/13/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate