অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ट्रिग्वे हाव्हेल्मो

ट्रिग्वे हाव्हेल्मो

ट्रिग्वे हाव्हेल्मो : (१३ डिसेंबर १९११–२८ जुलै १९९९). नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी. त्याचा जन्म नॉर्वेमधील स्केड्स्मॉ शहरात झाला. त्याने जन्मगावी सुरुवातीचे शिक्षण घेऊन पोलिटिकल इकॉनॉमी या विषयात ऑस्लो विद्यापीठाची पदवी संपादन केली (१९३३) आणि संशोधन सहायक म्हणून त्याच विद्यापीठात १९३३–३८ दरम्यान काम केले. पुढे आर्हूस विद्यापीठात त्याने अधिव्याख्याता म्हणून एक वर्ष अध्यापन केले (१९३८-३९). त्याला रॉकफेलर अधिछात्रवृत्ती मिळाली (१९४०–४२). या दरम्यान संशोधन करून त्याने डॉक्टरेट मिळविली (१९४६). तत्पूर्वी दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील नॉर्वेशिअन शिपिंग अँड ट्रेड मिशन (नॉर्ट्रशिप) या जहाज कंपनीत त्याने सांख्यिकी विभागात नोकरी केली (१९४२–४४). त्यानंतर त्याने वाणिज्य सचिव, काउल्स कमिशनचा संशोधक (शिकागो विद्यापीठ) वगैरे किरकोळ नोकऱ्या केल्या. पुढे ऑस्लो विद्यापीठात त्याने अर्थशास्त्र व सांख्यिकी विषयांचा प्राध्यापक म्हणून अध्यापन केले (१९४८–७९). दरम्यान १९५०–६० मध्ये अमेरिकेतील शिकागो विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही त्याने अध्यापन केले. निवृत्तीनंतर त्याची ऑस्लो विद्यापीठात गुणश्री प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. आयातशुल्क संकल्पनेचे गणिती विश्लेषण व त्यावरील टीकात्मक विवेचना-मुळे त्याला जगातील आधुनिक अर्थशास्त्रज्ञांमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले.

संभाव्यता प्रणाली (प्रॉबॅ-बिलिटी थिअरी) हा ग णि ती प्रणालीचा महत्त्वाचा घटक असून वारंवार घडणाऱ्या अर्थकारणातील विशिष्ट घटनांचे विश्लेषण करण्यास त्याची मदत होते. जेव्हा एखादी विशिष्ट घटना घडणे अनेकविध बाबींवर अवलंबून असते, तेव्हा ती विशिष्ट घटना घडण्याची संभाव्यता प्रयोगाची वारंवारिता (फ्रीक्वेन्सी) व निष्पत्तिसंख्या (आउटकम्स) यांवर अवलंबून असते. उदा., हवेत नाणे अनेकदा सरळ उडविले (टॉस), तर छाप व काटा वर येण्याची संभाव्यता साधारण सारखी असू शकते.असा प्रयोग वारंवार केल्यास त्याच्या निष्पत्तीचा विशिष्ट क्रम अधो-रेखित होऊन ते अभ्यासणे शक्य होते व त्याबाबतचे भाकितही( फोरकास्टिंग) करता येते. संख्याशास्त्रामध्ये संभाव्यता प्रणालीला महत्त्वाचे स्थान असून अनेक मानवी व्यवहारांचे संख्यात्मक विश्लेषण त्यामुळे शक्य होते. ट्रिग्वे याने अर्थशास्त्रातील भविष्यकालीन घटनांची संभाव्यता अभ्यासण्यासाठी सांख्यिकी पद्धती विकसित केल्या. अर्थव्यवस्थेतील प्रवाहांचा सांख्यिकी (व गणिती) अर्थशास्त्राच्या साहाय्याने मागोवा घेता येतो.

आंतरराष्ट्रीय बाजारात विनिमय दर व भांडवलाची गतिशीलता यांच्या कार्यकारण-भावासंबंधीचे भाकितही करता येते, हे सप्रमाण सिद्ध केले. अर्थव्यवहारातील विशिष्ट बदलांचा दुसऱ्या घटकावर कसा परिणाम संभवतो, याबाबतचे अंदाज वर्तविणे सांख्यिकी संभाव्यता प्रणालीच्या आधारे शक्य आहे. या प्रणालीचा उपयोग जास्तीत जास्त अचूक शासकीय धोरणे ठरविण्यासाठी होऊ शकतो. क्लिष्ट व गुंतागुंतीच्या आर्थिक घटनांसंबंधीचे विश्लेषण करण्यासाठी आवश्यक असणारी बैठक विकसित होण्यास त्याचे संशोधन कारणीभूत ठरले. अर्थमितीतील या संशोधनासाठी त्याला अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले (१९८९). नोबेलशिवाय त्याला फ्रित्यॉफ नान्सेन पुरस्कार (१९७९) हा सन्मान लाभला. तसेच इकॉनॉमेट्री सोसायटीचा अध्यक्ष (१९५७), आणि नॉर्वेर्जियन अकॅडेमी (१९५०), अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशन (१९७५), डॅनिश अकॅडेमी (१९७९) इ. मान्यवर संस्थांचा तो सन्मान्य सदस्य होता.

ट्रिग्वे याचे लेखन मोजके असून ते संशोधनात्मक आहे. ‘दप्रॉबॅबिलिटी अ‍ॅप्रोच इन इकॉनॉमेट्रिक्स’ या शीर्षकार्थाचा त्याचा प्रबंधत्याने हार्व्हर्ड विद्यापीठास सादर केला (१९४१). तो पुढे १९४४ मध्ये इकॉनॉमेट्रिका या नियतकालिकाच्या पुरवणीत प्रसिद्ध झाला. याशिवाय त्याने ए स्टडी इन द थिअरी ऑफ इकॉनॉमिक ईव्हल्यूशन (१९५४) आणि ए स्टडी इन द थिअरी ऑफ इन्व्हेस्टमेन्ट (१९६०)ही दोन पुस्तके आपल्या सैद्धांतिक मांडणीचे विश्लेषण करण्यासाठी लिहिली. पहिल्या पुस्तकात त्याचा आर्थिक वैकासिक सिद्धांताविषयीचा सारांश असून नॉर्वेच्या विकासाची गती कमी का, याची मीमांसा आहे.

वृद्धापकाळाने त्याचे ऑस्लो येथे निधन झाले.

लेखक - जयवंत चौधरी

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate