অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बाँरेल, (फेलिक्स-एद्‌वार-झ्यूस्तॅँ)- एमील

बाँरेल, (फेलिक्स-एद्‌वार-झ्यूस्तॅँ)- एमील

बाँरेल, (फेलिक्स-एद्‌वार-झ्यूस्तॅँ)- एमील  : (७ जानेवारी १८७१-३ फेब्रुवारी १९५६). फ्रेंच गणितज्ञ. गणितीय विश्लेषण व संभाव्यता सिद्धांत या विषयांत त्यांनी महत्त्वाचे काम केले. त्यांचा जन्म सँ-फ्रिक येथे झाला. पॅरिस येथील एकोल नॉर्मल या संस्थेत शिक्षण घेतल्यानंतर १८९३-९६ या काळात त्यांनी लील विद्यापीठात अध्यापन केले. १८९६ मध्ये एकोल नॉर्मल सुपिरियर या संस्थेत त्यांची नेमणूक झाली व १९०९ मध्ये सॉर्‌बॉन विद्यापीठात त्यांच्याकरिता फलन सिद्धांत  या विषयाचे खास अध्यासन स्थापन करण्यात आले. १९१० मध्ये ते एकोल नॉर्मलचे उपसंचालक झाले. पहिल्या महायुद्धानंतर त्यांची सॉर्‌बॉन विद्यापीठात संभाव्यता व गणितीय भौतिकी या विषयांच्या अध्यासनावर नेमणूक झाली आणि त्यानंतर एकोल नॉर्मलशी त्याचे संबंध केवळ सन्माननीय स्वरूपाचे राहिले. त्यानंतर ते राजकारणात शिरले व १९२४-३६ या काळात फ्रान्सच्या संसदेचे सदस्य होते. १९२५-४० मध्ये ते फ्रान्सचे नौदल मंत्री होते. व्हिशी राजवटीत त्यांना अटक होऊन काही काळ बंदीवासात काढल्यानंतर ते आपल्या मूळ गावी परतले व त्यांनी नाझीविरोधी चळवळीत भाग घेतला. शार्ल एमील पीकार यांच्या महत्त्वाच्या सिद्धांताची प्राथमिक सिद्धता १८९६ मध्ये बॉरेल यांनी मांडली आणि त्यानंतर समग्र फलने [संपूर्ण सदसत् प्रतलात वैश्लेषिक असलेली सदसत् चलांची फलने; ⟶ फलन] व त्यांच्या मूल्यांचे वितरण यांविषयी त्यांनी एक सिद्धांत मांडला. सदसत् चलांच्या सिद्धांतावर बॉरेल यांच्या या सिद्धांताचा पुढील ३० वर्षे मोठा प्रभाव पडलेला होता. बिंदू संचांच्या मापाविषयी  त्यांनी मांडलेल्या पहिल्या परिणामकारक सिद्धांतामुळे त्यांचे समकालीन गणितज्ञ आर्. बेअर व एच्. लबेग यांच्या बरोबरच बॉरेल यांना सत् चलांच्या आधुनिक सिद्धांताचे एक आद्य प्रणेते म्हणून मान देण्यात येतो.

अपसारी श्रेढींच्या सांकेतिक बेरजेची व्याख्या त्यांनी प्रथम दिलेली नसली, तरी अशा श्रेढींविषयीचा पद्धतशीर सिद्धांत त्यांनीच विकसित केला. एच्. ई. हाइने व बॉरेल यांच्या नावाने ओळखण्यात येणारा गणितीय अमूर्त विश्लेषणातील सिद्धांतही महत्त्वाचा आहे. त्यांनी १९२१-२७ या काळात खेळ सिद्धांत या विषयावर एक निबंधमाला प्रसिद्ध केली व डावपेचांच्या खेळांची व्याख्या त्यांनीच प्रथम मांडली. त्यांनी खेळ सिद्धांताच्या युद्ध व अर्थशास्त्र यांमधील उपयोजनाविषयी विवरण केले. तसेच तीन खेळाडूंकरिता किमान-कमाल प्रमेय सिद्ध करून दाखविले. गणनीय संभाव्यतेची संकल्पना मांडून त्यांनी संभाव्यता सिद्धांतात एक महत्त्वाचे नवीन पर्व सुरू केले. फ्रान्सच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून १९२१ मध्ये त्यांची निवड झाली व १९३४ मध्ये ते ॲकॅडेमीचे अध्यक्ष झाले. नाझीविरोधी चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना १९४५ मध्ये रेझिस्टन्स पदक मिळाले. त्यांच्या पुढाकाराने सेंटर नॅशनल द ला रिसर्च सायंटिफिक आणि इन्स्टिट्यूट आंरी प्वँकारे या संस्था स्थापन झाल्या. यांतील दुसऱ्या संस्थेचे ते अखेरपर्यंत संचालक होते. पहिल्या संस्थेने १९५५ मध्ये सुवर्णपदक देऊन त्यांचा गौरव केला. यांखेरीज त्यांना क्र्‌वा द गेर (१९१८) व लिजन ऑफ ऑनरचा ग्रां-क्र्‌वा (१९५०) हे बहुमान मिळाले. ते पॅरिस येथे मृत्यू पावले.

 

 

लेखक - ओक स. ज.

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/17/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate