অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सायमन, हर्बर्ट अलेक्झांडर

सायमन, हर्बर्ट अलेक्झांडर

सायमन, हर्बर्ट अलेक्झांडर : (१५ जून १९१६–९फेब्रुवारी २००१). सुप्रसिद्घ अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, संगणकतज्ञ व अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांनी अनेक क्षेत्रांत, विशेषतः मानसशास्त्र, गणित, सांख्यिकी, संगणक ह्या क्षेत्रांत, एक संशोधनात्मक कृती आराखडा बनविला आणि त्यांचे संयोगीकरण करून एक सैद्घान्तिक प्रणाली तयार केली. त्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला (१९७८). मिलवॉकी (विस्कॉन्सिन राज्य) येथे त्यांचा आर्थर व एड्रामर्केल या दांपत्यापोटी जन्म झाला. १९३७ मध्ये त्यांचा डोरोथी पाय ह्या युवतीशी विवाह झाला. त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. सायमन शिकागो विद्यापीठातून १९३६ मध्ये पदवीधर झाले; आणि १९४३ मध्ये त्यांनी पीएच्.डी. पदवी मिळवली.

राज्यशास्त्र विषयात अध्यापनविषयक अधिकारपदे भूषवीत असताना १९४९ मध्ये कार्नेगी-मेलॉन विद्यापीठात (पिट्सबर्ग) ते प्रशासन व मानसशास्त्र ह्या विषयांचे प्राध्यापक म्हणून नियुक्त झाले. याच विद्यापीठात पुढे ते संगणकशास्त्र या विषयाचेही प्राध्यापक झाले. सायमन हे विशेषेकरून निगम पातळीवर घेण्यात येणाऱ्या निर्णयप्रकियांबाबतच्या उपपत्तीसाठी प्रसिद्घ आहेत. ॲड्मिनिस्ट्रेटिव्ह बिहेव्हिअर (१९४७) या मौलिक पुस्तकात त्यांनी आर्थिक प्रतिमानांचा वापर करून, प्रवर्तक हा स्वबळावर आर्थिक निर्णय घेऊन कमाल नफा मिळविण्याचे ध्येय साध्य करू पाहतो; त्याऐवजी अनेक घटकांनी सामूहिक जबाबदारीने हा निर्णय घेणे साध्य करावयास हवे आणि या गोष्टीचा अवलंब आवर्जून करावयास हवा, ह्याचा ऊहापोह केला आहे. असे केल्याने निर्णयप्रक्रियेत सुलभता प्राप्त होऊन कारखान्यातून बाहेर पडणारा माल व त्याच्या किंमती यांवर सूचक परिणाम घडतो. परिणामतः किंमत व उत्पादने यांच्याबाबत वैयक्तिक निर्णयाची जबाबदारी सोपविता येते. या सिद्घांताला जोडूनच त्यांनी समाधानवादी वर्तन हा नवा सिद्घांत मांडला. सायमन यांच्या सिद्घांतामध्ये सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी दुर्लक्षिलेले निर्णयप्रकियांमधील मानसशास्त्रीय घटकांचे महत्त्व ध्यानात घेतलेले आढळते. त्यानंतर सायमन यांनी संगणक तंत्रविद्येच्या साहाय्याने कृत्रिम बुद्घिमत्तेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. बर्कली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात ‘व्यवस्थापनमापन अभ्यासविषयक संशोधन’ व ‘इंटरनॅशनल सिटी मॅनेजर्स असोसिएशन’ यांचे नगरपालिकीय व्यवस्थापन यासंबंधी सायमन यांनी मौलिक संशोधनकार्य केले.

त्यांच्या ॲड्मिनिस्ट्रेटिव्ह बिहेव्हिअर या ग्रंथाच्या पुढे अनेक आवृत्त्या निघाल्या. याशिवाय त्यांनी संगणक, अर्थशास्त्र यांवर विपुल लेखन केले. पब्लिक ॲड्मिनिस्ट्रेशन (१९५०), मॉडेल्स ऑफ मॅन (१९५७), ऑर्गनायझेशन (१९५८), द शेप ऑफ ऑटोमेशन (१९६०–६५), द सायन्सेस ऑफ द आर्टिफिशल (१९६९–८१), ह्यूमन प्रॉब्लेम सॉल्व्हिंग (१९७२), मॉडेल्स ऑफ डिस्कव्हरी (१९७७), मॉडेल्स ऑफ थॉट, (खंड-१–१९७९; खंड-२–१९८९), मॉडेल्स ऑफ बाउंडेड नॅशनॅलिटी ( खंड-२–१९८२), रीझन इन ह्यूमन अफेअर्स (१९८३), प्रोटोकॉल अनॅलिसिस (१९८४), सायंटिफिक डिस्कव्हरी (१९८६), मॉडेल्स ऑफ लाइफ (१९९१) वगैरे अन्य पुस्तके त्यांनी लिहिली.नोबेल पारितोषिकाव्यतिरिक्त ए. सी. एम्. ट्युरिंग अवॉर्ड, जेम्स मॅडिसन अवॉर्ड (१९८४), नॅशनल मेडल ऑफ सायन्स (१९८६), प्रॉक्टर प्राइझ (१९८८), न्यूमन थिअरी प्राइझ (१९८८), व्हॉन न्यूमन थिअरी प्राइझ (१९८८) इ. अनेक बक्षिसे व मानसन्मान त्यांना लाभले. अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्मान्य डॉक्टरेट देऊन सन्मानित केले.पिट्सबर्ग येथे त्यांचे वृद्घापकाळाने निधन झाले.

 

 

लेखक -गद्रे वि.रा.

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate