অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हर्बर्ट जोसेफ डॅव्हेनपोर्ट

हर्बर्ट जोसेफ डॅव्हेनपोर्ट

हर्बर्ट जोसेफ डॅव्हेनपोर्ट : (१० ऑगस्ट १८६१ – १७ जून १९३१). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जन्म व्हर्‌माँट राज्यातील विल्मिंगटन येथे. बाविसाव्या वर्षी हार्व्हर्ड लॉ स्कूलमध्ये काही काळ शिक्षण. नंतर तो साउथ डकोटामध्ये स्थावरमत्ता व्यवसायात शिरला; परंतु व्यवसाय सोडून १८९० मध्ये लाइपसिक व पॅरिस येथील शिक्षणसंस्थांमध्ये अध्ययनासाठी गेला.

१८९८ मध्ये शिकागो विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी प्राप्त. त्यानंतर त्याने काही काळ मिडवेस्टमधील एका शाळेत मुख्याध्यापकाची नोकरी पतकरली (१८९८–१९०२). ती सोडून शिकागो विद्यापीठात अध्यापनास सुरुवात (१९०२–०८). १९०८ मध्ये मिसूरी विद्यापीठात नेमणूक, कॉर्नेल विद्यापीठात प्राध्यापक (१९१६–२९). १९२० मध्ये त्याला ‘अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशन’च्या अध्यक्षपदाचा मान मिळाला. स्वतः गणिती नसूनही डॅव्हेनपोर्टची विचारसरणी अर्थशास्त्राच्या गणितीय संप्रदायाशी बरीचशी मिळतीजुळती आहे. इतर संप्रदायांवर–विशेषतः ऑस्ट्रियन संप्रदायावर– त्याने प्रखर टीका केली आहे. केवळ आर्थिक संस्थांमध्ये होत जाणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्याऐवजी सभोवतालच्या आर्थिक परिस्थितीवर प्रकाश टाकणारी तत्त्वप्रणाली शोधून काढण्याकडे त्याचा कल होता. या प्रणालीमध्ये सामाजिक उपयोगिता, वास्तव परिव्यव, सामाजिक रचना यांसारख्या नैतिक किवा मानसशास्त्रीय संकल्पनांना थारा न देता प्रत्यक्ष किंमतीच्या दृष्टिकोनातून घटनांचे विश्लेषण करण्यावर त्याने भर दिला. सर्व किंमती एकमेकींवर अवलंबून असतात, हे सूत्र त्याच्या लिखाणात आढळते.

अर्थशास्त्रातील वैकल्पिक परिव्यय या संकल्पनेचा एक सुरुवातीचा प्रवक्ता म्हणून डॅव्हेनपोर्टला मान आहे. उपयोगितेवरील त्याच्या टीकेमुळे लोझॅनच्या गणितीय संप्रदायाने मांडलेली समतुष्टी वक्र दृष्टिकोनाची पूर्वपीठिका तयार झाली, असे मानले जाते. डॅव्हेनपोर्टने अनेक लेख व ग्रंथ लिहिले. त्यांचे प्रमुख ग्रंथ आउटलाइन्स ऑफ इकॉनॉमिक थिअरी (१८९६), व्हॅल्यू अँड डिस्ट्रिब्यूशन (१९०८), द इकॉनॉमिस्क ऑफ एंटरप्राइझ (१९१३), द इकॉनॉमिस्क ऑफ अ‍ॅल्फ्रेड मार्शल (१९३५) हे होत. वयाच्या सत्तराव्या वर्षी न्यूयॉर्क शहरी त्याचे निधन झाले.

 

लेखक - ए. रा. धोंगडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate