অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ॲन्ड्र्यू मायकेल स्पेन्स

ॲन्ड्र्यू मायकेल स्पेन्स

ॲन्ड्र्यू मायकेल स्पेन्स : . प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. त्याला जॉर्ज अकेरलॉफ व जोसेफ स्टिग्लिट्झ यांच्याबरोबर २००१ मधील अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले. त्याचा जन्म माँटक्लेर (न्यू जर्सी) येथे एका सधन कुटुंबात झाला. सुरुवातीचे शिक्षण घेऊन त्याने प्रिन्सटन विद्यापीठातून तत्त्वज्ञान विषयाची बी.ए. पदवी प्राप्त केली (१९६२). पुन्हा ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्याने गणित विषयाची बी.ए. (१९६६) आणि एम्.ए. (१९६८) या पदव्या प्राप्त केल्या. तसेच त्याने हार्व्हर्ड विद्यापीठाची पीएच्.डी. (अर्थशास्त्र) संपादन केली (१९७२). सुरुवातीला तो स्टॅनफर्ड विद्यापीठात सहप्राध्यापक म्हणून कार्यरत होता (१९७३–७५). पुढे त्याने हार्व्हर्ड विद्यापीठात अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून अध्यापन केले (१९७५–९०). त्याच वेळी तो बिझनेस स्कूलमध्येही अध्यापन करीत होता. १९८४–९० या काळात तो कला व शास्त्र विद्याशाखेचा अधिष्ठाता होता. पुढे त्याने स्टॅनफर्ड विद्यापीठातील ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमध्ये अधिष्ठाता व प्राध्यापक म्हणून अध्यापन केले (१९९०–९९). निवृत्तीनंतर तो त्याच ठिकाणी गुणश्री प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. हार्व्हर्ड विद्यापीठात अध्यापन करीत असताना अर्थशास्त्र विभागाचे अध्यक्षपद त्याच्याकडे होते (१९८३-८४).

स्पेन्सने प्रामुख्याने असममित (असिमेट्रिक) माहिती असणाऱ्या बाजारपेठेच्या माध्यमातून बाजारपेठेच्या उलाढालीच्या संदर्भातील संदेशन (सिग्नलिंग) पाठविण्याची उपपत्ती मांडली. कमी माहिती असणाऱ्या व्यक्तीकडे अधिक माहिती असणाऱ्या व्यक्तीकडून माहिती कळविली गेली, तर चुकीचा निर्णय घेतल्याने उभी राहणारी समस्या टाळणे शक्य होते, हे या उपपत्तीमुळे लक्षात आले. आपल्या संशोधनातून त्याने शेअरबाजाराच्या व्यवहारातून दिल्या जाणाऱ्या लाभांश व तत्संबंधीच्या व्यापारी उलाढाली यांबाबतीत काही सूचना दिल्या आहेत.

स्पेन्सने ‘जॉब मार्केट सिग्नलिंग’ (१९७३) हा शोधनिबंध सादर केला. या निबंधाद्वारे त्याने महाविद्यालयीन पदवीच्या माध्यमातून भावी नोकरशहांना बुद्धिमान आणि कार्यक्षम गरजू उमेदवारांची माहिती मिळते, हे सप्रमाण सिद्ध केले. ‘सिग्नलिंगङ्खची उपपत्ती स्पष्ट करण्यासाठी त्याने काही उदाहरणे दिली. त्यांपैकी एक म्हणजे जे निगम आपल्या नफ्यामधून मोठा लाभांश जाहीर करतात, म्हणजे असे संदेशन सूचित करतात की, आमचा उद्योग-व्यवसाय भरभराटीचा आहे. दुसरे उदाहरण असे की, जेव्हा उद्योजक आपल्या उत्पादित मालाविषयी गुणवत्तेची हमी देतात, तेव्हा ते सिग्नलिंग वा सूचित करीत असतात. आणखी एका उपपत्ती किंवा प्रतिकृती (मॉडेल )मध्ये कर्मचारी आपल्या खर्चिक अशा शिक्षणाद्वारे आपल्या कौशल्याबाबतचा विशिष्ट संदेश देतात. त्यामुळे उद्योग-व्यवसायाचे मालक अशा उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांना तुलनेने जादा वेतन देतात. अशा महागड्या संंदेशातून माहिती पाठविणारा (कर्मचारी) व माहिती मिळविणारा (मालक) यांच्यात माहितीचे वहन होत असल्यास शिक्षणाला जरी आंतरिक मूल्य नसले, तरी सदरची उपपत्ती खरी ठरते, हे त्याने उदाहरणांद्वारे दाखवून दिले.

स्पेन्सने संशोधनपर विपुल लेखन केले असून त्याचे अनेक शोध-निबंध नियतकालिकांतून तसेच विविध परिषदांच्या अहवालांतून प्रसिद्ध झाले आहेत. त्याच्या ग्रंथांपैकी मार्केट सिग्नलिंग : इन्फर्मेशनल ट्रान्सफर इन हायरिंग अँड रिलेटेड प्रोसेसिस (१९७४), इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशन इन ॲन ओपन इकॉनॉमी (१९८०, सहलेखक–आर्. ई. केव्हज आणि एम्. ई. पोर्टर), कॉम्पेटिव्ह स्ट्रक्चर इन इन्व्हेस्टमेंट बँकिंग (१९८३, सहलेखक –सॅम्युएल हेज आणि डेव्हिड मार्क्स), द नेक्स्ट कन्व्हर्जन्स : द फ्यूचर ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ इन ए मल्टिस्पीड वर्ल्ड (२०११) आदी महत्त्वाचे व मान्यवर झाले आहेत.

स्पेन्सला नोबेल पारितोषिकाव्यतिरिक्त अनेक मानसन्मान मिळाले आहेत. त्यांपैकी र्‍होड्झ शिष्यवृत्ती (१९६६), डॅनफोर्थ अधिछात्र (१९६६), डेव्हिड ए. वेल्स प्राइझ (१९७२), जॉन केनेथ गाल्ब्रेथ प्राइझ (उत्तम शिक्षक–१९७८), जॉन बेट्स क्लार्क मेडल (१९८१), अमेरिका अकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सचे अधिछात्र (१९८३) इ. महत्त्वाचे असून नॅशनल काउन्सिल बोर्ड ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इकॉनॉमिक पॉलिसी या संस्थेचा तो अध्यक्ष होता (१९९१–९७).

अध्यापन, वाचन, लेखन यांत स्पेन्स अद्यापि व्यस्त आहे.

लेखक - सु. र. देशपांडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate