অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लॉस अँजेल्स

लॉस अँजेल्स

लॉस अँजेल्स

अमेरीकेच्या संयूक्त संस्थानांपैकी कॅलिफोर्निया राज्यातील लोकसंख्येने पहिल्या क्रमांकाचे आणि देशातील द्वितीय क्रमांकाचे (१९८२) शहर व पॅसिफिक महासागरावरील प्रमुख बंदर. लोकसंख्या शहर ३२, ५९, ३४० (१९८४ अंदाज); महानगरी ९४,७७,९२६ (१९८० जनगणना). राज्यातील ते पहिल्या प्रतीचे औद्योगिक, वित्तीय, व्यापारी व पर्यटनकेंद्र समजले जाते. देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील हे शहर सॅन फ्रॅन्सिस्कोच्या आग्‍नेयीस ५६३ किमी. अंतरावर आहे. शहराचा विस्तार उत्तरेकडील सॅन फेर्नांदो खोऱ्यापासून दक्षिणेस सॅन पेद्रो उपसागरापर्यंत सु. ८० किमी. व पूर्व –पश्चिमेस सॅन गाब्रीएल पर्वतापासून पॅसिफिक महासागरापर्यंत ४८ किमी. आहे.

लॉस अँजेल्स काउंटीमध्ये लॉस अँजेल्स शहराशिवाय इतर ८० शहरांचा समावेश होतो. त्यांमध्ये बरबँक, लाग बीच, पॅसाडीना, सँटा मॉनिका इ. शहरे प्रमुख आहेत. चित्रपटनिर्मितीचा कणा असलेले ‘हॉलीवुड’ हे शहर याच महानगरात मोडते. लॉस अँजेल्सचे क्षेत्रफळ १,२०२ चौ. किमी. असून शहराच्या मध्यातून लॉस अँजेल्स ही नदी वाहते. शहराचे सरासरी तापमान १७ से. असून जानेवारी व जुलै या दोन महिन्यांत ते अनुक्रमे १२ से. व २१से. एवढे, तर वार्षिक सरासरी पर्जन्यवृष्टी ३५६ मिमी. असते. सँटा मॉनिका पर्वतश्रेणीने लॉस अँजेल्स शहराचे विभाजन केले आहे.

सांप्रत लॉस अँजेल्स हे शहर ज्या ठिकाणी वसले आहे, त्या ठिकाणी पहीली वसती अमेरीकन इंडीयनांनी केल्याचे आढळते. सोळाव्या शतकाच्या पहिल्या अर्धकात, शोशोनी टोळीवाल्यांनी ‘यांग-ना’नावाच्या एका खेडेगावात प्रथम वसती केली. लॉस अँजेल्स नदीकाठीच हे गाव बसविले गेले असावे. १५४२ मध्ये ह्‍वान रॉद्रीगेथ काब्रीयो या स्पॅनिश समन्वेषकाने ‘यांग-ना’चा शोध लावला. पुढे १७६९ मध्ये स्पॅनिश लष्करातील कॅप्टन गॅस्पर दे पॉर्तोला व फ्रॅन्सिस्कन धर्मोपदेशक ह्‍वान क्रेस्पी यांच्या समन्वेषक तुकडीने यांग-ना हे ठिकाण अतिशय रम्य व आल्हाददायक असून ते वसाहत योग्य असल्याची नोंद केली. त्या दोघांनी या प्रदेशाला ‘अवर लेडी द क्कीन ऑफ द अँजेल्स ऑफ पॉर्स्युंगकूला’ असे नाव दिले.

१७७१ मध्ये फ्रॅन्सिस्कन धर्मोपदेशकांनी सांप्रतच्या लॉस अँजेल्स शहराच्या पूर्वेस सॅन गाब्रीएल आर्कांगेल या मिशनची उभारणी केली. सॅन गाब्रीएलला लवकरच कृषिक, सांस्कृतिक व धार्मिक केंद्राचे महत्त्व प्राप्त झाले. पुढे स्पेनचे लक्ष या वसाहतीच्या जागी एक गाव (प्वेब्‍लो) उभारण्याकडे लागले. फिलीप दे नेव्हे या स्पॅनिश गव्हर्नरने क्रेस्पीची जागा नवीन गावासाठी मुक्रर केली. पुढे ४ सप्टेंबर १७८१ रोजी लॉस अँजेल्सची स्थापना करण्यात आली. याची भरमराट सदर्न पॅसिफिक (१८७६) आणि सँता फे (१८८५) या पूर्वेकडून आलेल्या लोहमार्गाच्या निर्मितीनंतर झाली. पूर्वेकडून अनेक लोकांनी येथे स्थलांतर केले. त्यांनी जलसिंचनाच्या पद्धतींचा अवलंब करून लिंबू जातीच्या फळांचे उत्पादन सुरू केले.

यंत्रोत्पादनाचे एक प्रमुख केंद्र आणि पर्यटनस्थळ असा लॉस अँजेल्सचा विकास १८९० ते १९४० या कालावधीत झाला. सॅन पेद्रो येथे १८९९-१९१४ यांदरम्यात बंदर बांधण्यात आले. विसाव्या शतकात याचा विकास प्रामुख्याने या प्रदेशातील विस्तृत खनिज तेलसाठे, चित्रपट-उद्योग आणि विमाननिर्मिती यांमुळे झाला. नैसर्गिक सृष्टिसौंदर्य, भरपुर सूर्यप्रकाश आणि विमान उड्डाणाला आवश्यक असणारे स्वच्छ हवामान यांमुळे ही प्रगती झाली.

श्चिम अमेरिकेत उद्योग, व्यापार व वित्तव्यवस्था या तिन्ही दृष्टींनी लॉस अँजेल्सचा अग्रक्रम लागतो. दुसऱ्या महायुद्धापासून लोकसंख्येच्या वाढीबरोबर अर्थव्यवस्थेतही प्रगती झाली.

१९४५ ते १९६५ यांदरम्यान या भागातील रोजगार दुपटीहून आधिक वाढला; नवीन उद्योग, वित्तसंस्था तसेच व्यापरसुविधा या भागात नव्याने आल्या व पूर्वीचे उद्योग मोठ्या प्रमाणात विकसित झाले. शहरातील सु. १६,००० कारखान्यांपैकी सु. २,००० कारखाने विमाननिर्मिति उद्योगात गुंतलेले आहेत. लॉस अँजेल्सला जगाची‘चित्रपटनिर्मिति उद्योगाची राजधानी’ म्हणून ओळखले जाते. या उद्योगात जवळजवळ ५५० निर्मितिसंस्था आहेत.

यांशिवाय शहरात मोटारगाड्या, विद्युत्‍यंत्रे व सामग्री, वीजउपकरणे, वस्त्रे, फर्निचर, रबर, रसायने, काचसामान, लोखंड व पोलाद, अन्नपदार्थ, खेळणी इत्यादींचे निर्मितिउद्योग आहेत. येथे खनिज तेल परिष्करण केंद्र आहे. बांधकाम उद्योग, मुद्रण व प्रकाशन व्यावसाय हेही महत्त्वाचे मानले जातात. देशाच्या प. किनाऱ्यावरील अग्रेसर वित्तीय केंद्र म्हणून लॉस अँजेल्सचा लौकिक आहे.

पॅसिफिक किनाऱ्यावरील इतर कोणत्याही अमेरिकन बंदरापेक्षा लॉस अँजेल्स बंदरातून सर्वाधिक आयात –निर्यात होते. जपान व अ. सं. सं. यांच्यातील बहुतेक व्यापार याच बंदरातून होतो. हे देशातील प्रमुख मासेमारी बंदर आणि जगातील मासे डबाबंदीकरण उद्योगकेंद्रांपैकी एक समजले जाते.

लॉस अँजेल्समधील सु. १,०५० किमी. लांबीची द्रुतगतिमार्गव्यवस्था ही जगातील महत्त्वाच्या द्रुतगतिमार्गव्यवस्थांपैकी एक समजली जाते. तथापि शहरवासियांना चांगली अशी सार्वजनिक वाहतूकव्यवस्था उपलब्ध नाही. येथील लोकांना बव्हंशी मोटारगाड्यावर अवलंबून राहावे लागते. येथे सु ४० लक्ष. मोटारी वापरात आहेत. मोटारी व कारखाने यांमुळे सबंध शहराला गंभीर वायुप्रदूषण समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

अ‍ॅचिसन, टोपीका व सँता फे, सदर्न पॅसिफिक व युनियन पॅसिफिक ह्या तीन मोठ्या रेल्वे शहरातून वाहतूक करतात. लॉस अँजेल्स हा आंतरराष्टीय विमानतळ जगामधील तिसऱ्या क्रमांकाचा कार्यव्यग्र विमानतळ समजला जात. शहरात दोन दैनिके असून लॉस अँजेल्स विभागात विविध –भाषिक सु. ४० वृत्तपत्रे व १०० हून अधिक साप्ताहिके छापण्यात येतात. शहरात १३ दूरचित्रवाणी केंद्रे व ७५ हून अधिक नभोवाणी केंद्रे कार्यशील आहेत.

लॉस अँजेल्सचे हवामान, तसेच सागर व बर्फाच्छादित पर्वतराजी यांची समीपता यांमुळे पर्यटकांना बव्हंशी वर्षभर येथे मैदानी खेळांचा आनंद लुटता येतो. शहरातील प्रमुख आकर्षण 'म्यूझिक सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्‍स' आहे. 'लॉस अँजेल्स फिल्‍हार्मनिक ऑर्केस्ट्रा' हा वाद्यवृंद नोव्हंबर –एप्रिल या काळात संगीत कार्यक्रम सादर करतो.

हरात दोन सुप्रसिद्ध खुली रंगमंदिरे आहेत. लॉस अँजेल्स हे अनेक वास्तुकला-शैलींकरिता विख्यात आहे. यांपैकी 'स्पॅनिश शैली' विशेष प्रसिद्ध आहे. 'युनियन स्टेशन', 'लॉस अँजेल्स पब्‍लिक लायब्ररी' या कलात्मक वास्तू स्पॅनिश शैलीत उभारण्यात आल्या आहेत. रिचर्ड जे. नूट्र, फ्रँक लॉइड राइट यांसारख्या प्रख्यात वास्तुविशारदांनी शहरात अनेक उक्तृष्ट वास्तुंची निर्मिती केली आहे.

हरातील 'लॉस अँजेल्स काउंटी म्यूझीयम ऑफ आर्ट' या सर्वांत मोठ्या कलासंग्रहालयात प्राचीन ईजिप्शियन काळापासूनच्या कलावस्तूंचा संग्रह केलेला आहे. सॅन मारीनो येथील 'हेनरी ई. हंटिंग्टन लायब्ररी अँड आर्ट गॅलरी' 'नॅचरल हिस्टरी म्यूझीयम'इ. प्रसिद्ध आहेत. लॉस अँजेल्समध्ये २१० वर वने, क्रिडांगणे आहेत. येथे दोन वेळा (१९३२, १९८४) ऑलिपिंक क्रिडासामने भरविण्यात आले होते. येथील 'ग्रिफिथ पार्क' हे जगातील सर्वांत मोठ्या उद्यानांत मोडते. त्याचे क्षेत्र १,६०० हेक्टरांहून आधिक आहे.

प्रतिवर्षी लॉस अँजेल्सला लाखो पर्यटक भेट देतात. शहरात व त्याच्या परिसरात मॅलिबू, रिडाँडो, सँटा, मॉनिका, व्हेनिस या प्रसिद्ध पुळणी आहेत. हॉलिवुड या चित्रनगरीला लक्षावधी पर्यटक भेट देतात; पण याखेरीज लॉस अँजेल्सनजीकचे डिझ्‍नीलँड हे पर्यटकांचे सर्वांत मोठे आकर्षण आहे. हॅनाबार्बेराज मरीनलँड–पॅलोस व्हेर्देस इस्टेट्‍स येथे जगातील सर्वांत मोठे सागरी जलजीवालय असून त्यात डॉल्फिन, देवमासे, इतर सागरी जलचर विविध प्रकारचे मनोरंजनात्मक खेळ करून दाखवितात.

लॉस अँजेल्समधील विद्यानिकेतन पद्धती ही अमेरीकेतील न्यूयॉर्क शहराखालोखाल दुसऱ्या क्रमांकाची आहे. येथे कॅलिफोर्निया विद्यापीठ शाखा, राज्याविद्यापीठ ही सार्वजनिक; तर युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया, लॉयोला मेरीमाउंट, पेपरडाइन यांसारखी खाजगी विद्यापीठे आहेत.

शहरातील सु. ७८ टक्के लोक श्वेतवर्णीय, १८ टक्के कृष्णवर्णीय व ४ टक्के लोक आशियाई आहेत. सर्व मोठ्या अमेरीकन शहरांमध्य़े अनुभवास येणारे दारिद्य, वर्णसंघर्ष यांसारख्या महत्त्वाच्या सामाजिक समस्या, प्रदूषण इ. लॉस अँजेल्समध्येही अनुभवास येतात.


गद्रे, वि. रा.; सावंत, प्र. रा.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate