खास वाघाला पाहण्यासाठी घनदाट जंगलातून जात असतांना अचानक वाघ समोर यावा आणि अंगावर रोमांच उभे राहावेत, या देखण्या-रुबाबदार प्राण्याला डोळ्यात साठवून घ्यावं आणि हा थरारक अनुभव गाठीशी घेऊन, समृद्ध वनपर्यटनाचा आनंद उपभोगून आपण होऊन घरी परतावं असा अनुभव देणारं राज्यातील वाघोबांचं आणखी एक गाव म्हणजे “पेंच व्याघ्र प्रकल्प”
भारत सरकारच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए)ने मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएशन ऑफ टायगर रिझर्व्ह इन इंडिया बाबत सन २०१४-१५ मध्ये केलेल्या अभ्यासात राज्यातील मेळघाट, पेंच आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला “व्हेरी गुड” असा दर्जा दिला आहे... म्हणजे काय तर व्याघ्रसंवर्धनासाठी इथे अत्यंत पोषक वातावरण असून त्याचा दर्जा अत्यंत उत्कृष्ट आहे.
या राखीव क्षेत्रातून उत्तर दक्षिण वाहणाऱ्या जीवनदायिनी पेंच नदीचे नाव या व्याघ्र प्रकल्पाला देण्यात आले आहे. हा व्याघ्र प्रकल्प पेंच नदीमुळे पूर्व पेंच आणि पश्चिम पेंच अशा दोन भागात विभागला गेला आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प २५७.२६ चौ.कि.मी क्षेत्रात विस्तारला आहे. १९७५ साली महाराष्ट्र शासनाने हे राष्ट्रीय उद्यान घोषित केले आणि फेब्रुवारी १९९९ मध्ये याला व्याघ्र प्रकल्पाचा अधिकृत दर्जा मिळाला.
नव्यानेच मानसिंगदेव वन्यजीव अभयारण्याचे १८२.५८० चौ.कि.मी. चे अतिरिक्त क्षेत्र या व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवरचा हा व्याघ्रप्रकल्प जैवविविधतेने संपन्न प्रदेश असून येथे गोंड आणि भिल्ल आदिवासी राहातात. त्यांच्या जगण्याच्या अनोख्या परंपराबरोबर पळसाच्या पानापासून तयार करण्यात येणारी पत्रावळ आणि द्रोण बनविण्याचे त्यांचे कौशल्यही पाहण्यासारखे असते.
२०१४ च्या व्याघ्र गणनेनुसार पेंच व्याघ्र प्रकल्पात २३ प्रौढ आणि १० प्रौढ होत असलेल्या वाघांबरोबर त्यांच्या बछड्यांची नोंद घेण्यात आली आहे. यावरूनच पेंच व्याघ्र प्रकल्प वाघांच्या अस्तित्वाने किती समृद्ध आहे हे लक्षात येते.
नागपूरहून अवघ्या ७० कि.मी. अंतरावर असलेले पेंच अभयारण्य निसर्गप्रेमींना पक्षी निरिक्षकांना, छायाचित्रकारांना आणि चार दिवस सलग सुट्टी असलेल्या सर्व निसर्ग पर्यटकांना सतत खुणावत असते. जैवविविधतेने समृद्ध अधिवास असलेल्या या प्रकल्पात वाघ, चित्ता, जंगली मांजर, जंगली कुत्रा, तरस, कोल्हा, सांबर, हरणं, गवे, नीलगायी, चार शिंग असलेले काळवीट, अस्वल, घुबड यासारखे प्राणी पाहायला भेटतात.
त्याबरोबरच सर्प गरुड, राखी डोक्याचा मत्स्य गरूड, मोहोळ घार, हळदया, तांबट, खंड्या असे जवळपास २२५ प्रजातींचे पक्षी येथे आढळतात. कोरड्या आणि दमट उष्णकटिबंधीय हवामानातील पानगळीचे वन या असलेल्या या क्षेत्रात साग आणि बांबूची झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात.
विमान : नागपूर ७० कि.मी.
रेल्वे : नागपूर ७० कि.मी.
रस्ता - नागपूरहून बससेवा उपलब्ध आहे.
लेखिका: डॉ.सुरेखा मधुकर मुळे
वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती)
माहिती स्रोत: महान्यूज
अंतिम सुधारित : 7/15/2020
केंद्र शासनाच्या शेती व शेतकरी कल्याण विभागाने ही ...
सिंचनाच्या स्वाभाविक मर्यादा विचारात घेऊनही कृषी उ...
आगळीवेगळी खानावळ हरसूलजवळील खोरीपाडाच्या ग्रामस्था...
दुग्ध प्रक्रिया प्रकल्पासाठी आवश्यक इमारत ही विवि...