सातपुडा मैकल पर्वतरांगांमध्ये नागपूरची दक्षिण सीमा आणि वर्धा जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर बोर व्याघ्र प्रकल्प आहे. या प्रकल्पात वाघ, 160 प्रजातीचे पक्षी, 26 प्रकारचे सरीसृप आणि अनेक वन्यजीव आहेत. बोर धरणाजवळ उंच डोंगरात वसलेले बुद्धविहार विलोभनीय आहे. येथून जवळच वर्धा इथे महात्मा गांधी यांच्या सहवासाने पावन झालेले सेवाग्राम, आचार्य विनोबा भावेंचे पवनार आश्रम आहे. गीताई मंदिर, विश्वशांती स्तूप, मगन संग्रहालय अशी भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. इथल्या गोरस भांडारातील शुद्ध तुपातल्या गोरसपाक या मिठाईची चव नक्की घ्या.
जायचे कसे?
हवाईमार्ग - डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर 80 किमी आहे. रेल्वेमार्ग - वर्धा रेल्वेस्थानक 35 किमी आहे. रस्ता- जवळचे हिंगणी बसस्थानक 5 किमी.
सातपुडा - मेकल पर्वतरांगांचा अविभाज्य भाग असलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्य देशातील प्रचंड मोठ्या क्षेत्रफळाचा आहे. हा व्याघ्र प्रकल्प गुगामल राष्टीय उद्यान, मेळघाट, वान, अंबाबरवा आणि नरनाळा या अभयारण्यापासून निर्माण झाला आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेत हा प्रकल्प असला तरी याचा सर्वाधिक भाग अमरावती जिल्ह्यात आहे. पूर्वेला जाफ्राबाद, मध्ये नरनाळा आणी पश्चिमेला तेल्यागड हे किल्ले आहेत. नरनाळा किल्ला देखणा आहे. याचे क्षेत्रफळ 392 किमी व भिंत 36 किमी लांब आहे. या प्रकल्पातही वाघ आहेत. या भागात 90 प्रकारच्या वृक्ष प्रजाती, 66 प्रकारची झुडपे, 316 प्रकारच्या वनस्पती, 56 प्रकारच्या वेली आणि गवताचे 99 प्रकार आहेत. या जंगलात कोरकू आदिवासींच्या संपन्न संस्कृतीचे निरीक्षण तुम्हाला करता येईल.
जायचे कसे?
हवाई मार्ग - डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर 240 किमी आहे. रेल्वे मार्ग - बडनेरा जंक्शन 110 किमी आहे. रस्ता - परतवाडा मार्गे धारणी आणि बुऱ्हाणपूरवरून बसेस मिळतील.
घनदाट वनांचा नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात वसला आहे. कधीकाळी येथे हत्ती होते. हत्तीला संस्कृत भाषेत नाग म्हणतात. त्यावरूनच याला नागझिरा नाव आहे. पूर्वी इथे बाराशिंगे, रानम्हशी, शेकरू असल्याचे निसर्ग अभ्यासक सांगतात. आताही नागझिऱ्यात वाघ, बिबट, रानकुत्रे, रानगवे आणि असंख्य वन्यजीव आहेत. कोलू पाटलाने बांधलेला प्रचंड विस्ताराचा नवेगाव बांध तलाव, त्यातून दिसणारे मालडोंगरी, गम्फी, कोलेसुर पहाड, नवेगाव राष्ट्रीय उद्यानातील बोदराई अशी अनेक ठिकाणे बघण्यासारखी आहेत. नवेगाव बांध तलावावर स्थलांतरित पक्षी हिवाळ्यात येतात. संपूर्ण लाकडाने निर्मित संजयकुटीत मुक्काम करण्याची मज्जाही काही औरच. भंडाऱ्यापासून 20 किमी अंतरावर कोका अभयारण्यसुद्धा भेट देण्यास उत्तम आहे. या भागात वृक्ष वनस्पतीच्या 364 प्रजाती तर, सरीसृप 36 प्रजापतीचे आहेत. शिवाय पक्षी 166 प्रजाती आणि फुलपाखरे 49 प्रजातीची आढळतात. येथून जवळच इटीयाडोहचा विस्तीर्ण जलाशय आहे. जवळची तिबेटीयन वस्तीही भेट देण्यासारखी आहे. या वस्तीत तिबेटीयन शैलीचे सुंदर बुद्धविहार आहे. शिवाय ट्रेकिंग, हायकिंगचा आनंद घेण्यासाठी उंच प्रतापगड आहे. इथे वटवाघळच्या अनेक प्रजाती आहेत.
जायचे कसे?
हवाई मार्ग - नागपूर विमानतळ 120 किमी आहे. रेल्वेमार्ग - भंडारा रेल्वेस्टेशन 50 किमी, गोंदिया 50 किमी, सौन्दड 20किमी, तर तिरोडा रेल्वे स्टेशन 20किमी आहे. रस्ता - साकोलीपासून 22 किमी (राष्ट्रीय महामार्ग क्र.6 मुंबई-कोलकाता) तर गोंदिया जिल्हा मुख्यालयापासून 60 किमी अंतरावर बसस्थानक आहे. नागपूर 120 किमी आहे.
उत्तर ते दक्षिण वाहणाऱ्या पेंच नदीवरून या प्रकल्पाला हे नाव पडले आहे. या व्याघ्र प्रकल्पात वाघासोबतच 164 प्रजातीचे पक्षी आहेत. यातील मलबार पाईड हॉर्नबिल हा सुंदर धनेश पक्षी आणि व्हाईट रम्प्ड, लोंग बिल्ड, व्हाईट स्क्व्हेजर, किंग व्हल्चर या चार गिधाडांच्या प्रजाती बघायला मिळतात. आंबाखोरी धबधबा हिवाळ्यात बघण्यास उत्तम आहे. इथे रानगवे आणि इतर वन्यजीवही भरपूर आहेत.
जायचे कसे?
हवाई मार्ग- जवळचे विमानतळ नागपूर 70 किमी. रेल्वे मार्ग- जवळचे रेल्वे स्टेशन नागपूर 70 किमी. रस्ता - बस नागपूरवरून उपलब्ध.
लेखक - मिलिंद उमरे
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 4/1/2020
दुग्ध प्रक्रिया प्रकल्पासाठी आवश्यक इमारत ही विवि...
केंद्र शासनाच्या शेती व शेतकरी कल्याण विभागाने ही ...
मोठी गुंतवणूक करून एखादा कृषी प्रक्रिया उद्योग उभा...
आगळीवेगळी खानावळ हरसूलजवळील खोरीपाडाच्या ग्रामस्था...