वेशीवरच्या पाऊलखुणा : इतिहासात हरवलेली हतगडवाडी
एखाद्या गावाची ओळख त्या गावातील भक्कम आधारस्तंभ असलेल्या पाषाणातील किल्ल्यामुळे तयार होते अन् त्याच पाऊलखुणांभवती गाव आयुष्यभर आपले नाते सांगत रहाते. अकबर बादशहा अन् छत्रपती शिवरायांच्या इतिहासातील पैलू उलगडण्याचे कसब अंगाशी बाळगून असलेला सुरगाणा तालुक्यातील हतगड आपल्या अंगाखांद्यावर आजही इतिहासाच्या पाऊलखुणा मिरवताना दिसतो. अनेक लपलेल्या पैलूंवर येथील किल्लेदारांचे वंशज प्रकाश टाकतात, तर हतगडवाडीचे पूर्वीचे वैभव मात्र हिरावलं गेले आहे. हतगडवाडीच्या खाणाखुणा आता शोधाव्या लागतात पण, अजूनही हतगडवाडीतील किल्ल्याच्या किल्लेदाराची समाधी येथील पराक्रमाची साक्ष देते आहे.
नाशिकहून वणीगावात आल्यावर सप्तश्रृंगीदेवीकडे न जाता सापुताऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याला लागायचे. तेथून २० किलोमीटरवर गेल्यावर उजव्या हाताला आडवा पहुडलेला एक पाषाण आपल्याला आकर्षित करतो. हा पाषाण म्हणजेच हतगड. हतगडाचे मूळ नाव हतगरू म्हणजे हद्दीवरचा गड. हा गड महाराष्ट्र-गुजरात सीमेवर आहे. हतगडाच्या अलीकडे महाराष्ट्र तर पलीकडे गुजरात सुरू होते. हतगडावरून सापुताऱ्याचा रम्य परिसर पाहण्यासारखा आहे. हतगडाला हस्तगिरी असेही म्हटले गेले आहे. बागूल राजांचा कवी रूद राष्ट्रौढवंशम् महाकाव्यम या ग्रंथात बागूल राजे हस्तगिरी किल्ला ताब्यात घेतल्याचा उल्लेख मिळतो. बागलाणात बागूल राजांची कारर्कीद १३०० ते १७०० अशी आहे. रूद्र कवीने १५९६ मध्ये राष्ट्रौढवंशम् हे महाकाव्य लिहिले. हतगडावरील शके १४६९ (सन१५४७) मध्ये कोरलेला शिलालेख बागूल राजाच्या ताब्यात हा किल्ला असल्याची साक्ष देतो. या शिलालेखात भैरवशहा या राजाच्या कामगिरीचा उल्लेख आहे. त्यापूर्वी हतगड निजामशाहीत होता. बागूल राजाकडून तो पुन्हा निजामशाहीत गेला. दिल्ली बादशहाच्या कागदपत्रात किल्ल्याचा उल्लेख होलगड असाही केल्याचे दिसते.
याबाबतही इतिहासात असा उल्लेख मिळतो की, अबकर बादशहाच्या सांगण्यावरून सय्यद अब्दुल्ल याने मुलगा हसन अली याला किल्ला घेण्यासाठी पाठविले होते. त्यावेळी गंगाजी मोरे या किल्लेदाराने निकराचा लढा दिला. मात्र पराजय झाला. तेव्हा किल्ला मुगलांच्या ताब्यात गेला. हसन अलीने किल्ला जिंकला हे सांगण्यासाठी दिल्ली बादशहाला ९ ऑगस्ट १६८८ मध्ये सोन्याचा किल्ला विजय प्रतीकचिन्ह सादर केला. यावेळी बादशहाने हसनअलीला `खान’ ही पदवी देत त्याचे सैन्य वाढविण्यात आले. हतगडचा उल्लेख किल्ल्यातील शिलालेखात हातगा दुर्ग असाही आला आहे. अपभ्रंश होत आलेल्या हतगड किल्ल्याच्या नावाप्रमाणेच हतगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हतगडवाडीनेही अनेक लढाया सोसल्या आहेत. राजांप्रमाणे सतत बदलत जाणारे गावकरी अन् त्यांच्या जातीधर्मानुसार सण, परंपराही गावाने पाहिल्या आहेत. किल्ल्यावर जाण्यापूर्वी गावाची सफर करताना गावाभाोवती किल्ल्याची तटबंदी मुगलांनी बांधल्याच्या खाणाखुणा पाहायला मिळतात. एक मशीद व पुरातन असे दगडकामात केलेले छोटेखानी तळेही पाहायला मिळते.
गावात प्रवेश करताच एक महादेव मंदिर आपले स्वागत करते. हे पुरातन शिवमंदिर बाराव्या शतकातील होते. याचा नंतर जिर्णोद्धार करण्यात आला. या मंदिरावरही एक शिलालेख होता. असे एकूण सहा शिलालेख व सहा ताम्रपट हतगड किल्ल्याचा इतिहास उलगडतात. महादेव मंदिराच्या जवळच गंगाजी ऊर्फ गोगाजी मोरे-देशमुख यांची दगडातील बांधणीतील नक्षीकाम केलेली समाधी आहे. ही समाधी कोणाची अन् हतगडच्या इतिहासाशी याचा काय संबंध याची माहिती मनोहर मोरे-देशमुख उलगडन सांगतात. गंगाजी ऊर्फ गोगाजी मोरे-देशमुख हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढवय्यांपैकी एक. दख्खनच्या मोहिमेसाठी त्यांना शके १५८५ (सन १६६३) मध्ये सुरगणा परिसरात पाठविले होते. यावेळी हतगड किल्ला आदिलशाहाचा सुभेदार शुराबखान हा किल्लेदार होता. गोगाजीराव मोरे यांनी मोठ्या पराक्रमाने हा किल्ला शके १५८६ (सन १६६३) मध्ये ताब्यात घेतला. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना सुरतेच्या लुटीपूर्वी हा किल्ला आपल्या ताब्यात असणे गरजेचे असल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी गोगाजी मोरेंना पाठवून हा किल्ला ताब्यात मिळविल्याचे स्पष्ट होते. गोगाजी मोरेंचा पराक्रम लक्षात घेऊन छत्रपतींनी त्यांना हतगड परिसरातील बारा गावांची देशमुखी दिली होती.
त्यानंतरच्या उल्लेखानुसार १६८८ मध्ये हसन अलीखानाने हा किल्ला पुन्हा ताब्यात मिळविला. याच दरम्यान, किल्लेदार गोगाजीराव मोरे यांचा मृत्यू झाला असावा, त्यामुळे त्यांची समाधी गावात आहे. गोगाजी मोरे-देशमुख व शिंदे-देशमुखांचे वंशंज दामोदर त्र्यंबक शिंदे-देशमुख यांचे वाडे हतगडाच्या पायथ्याशी होते. त्याचे फक्त अवशेष आता पहायला मिळतात. गावातील किल्ल्याशी संबंधित लोक आता आजूबाजूच्या गावांमध्ये विखुरले आहेत. त्यामुळे हतगड आता फक्त आदिवासी समाजच राहत असल्याचे दिसते. गोगाजी मोरे-देशमुख यांचे वशंज मनोहर हनुमंत मोरे-देशमुख सुमारे ४० वर्षांपूर्वी जवळच्या पाळेगावात विस्थापीस्त झाले. गावात हनुमान मंदिर, महादेव मंदिर व इतरही लहान लहान मंदिरे आहेत. गावात बोहाड्याचा उत्सव केला जातो. शंभर उंबऱ्यांची हतगडवाडी आता आधुनिक रिसॉर्ट संस्कृतीचे रूप धारण करू लागली आहे.
हतगड किल्ला व परिसर वनविभागाच्या ताब्यात आहे. हतगडाची सफर आता खूप सोपी झाली आहे. वरपर्यंत गाडीने जाता येते तर गडाच्या पूर्वेकडे नव्याने पायऱ्यांची पायवाट बनविण्यात आली आहे. या पायवाटेने वर गेल्यावर हतगडाच्या पायथ्याशी स्थिरावलेली हतगडवाडी पहायला मिळते अन् पूर्वीचे गाव कसे असेल याची प्रचितीही येते. उभ्या कातळात कोरलेले किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार अन् त्यानंतर चार उपप्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश करता येतो. मुख्य प्रवेशद्वारावर दोन शिलालेख आहेत. हे दोन्ही शिलालेख देवनागरीत आहे. शिलालेखांची अक्षरे पुसट झाली आहेत. मोहनराव मोरे यांच्या नोंदीत प्रवेशद्वाराच्या पहिल्या शिलालेखावर `श्री प्रतापस्य ही कारकीऱ्र्द शेवुजी पंडीत यांचे सर्व सूत्रसर्व छत्र छायेत आहेत. हिंदू पंडीत शेवुजी’ असे तर दुसऱ्या शिललेखात नवीन श्रीपती प्रतापस्य कारकिर्द त्रासजी पंडीत सुत्र सर्व छत्र छायेत’ असे म्हटले आहे. तेथून आत गेल्यावर उजव्या हाताला कातळात कोरलेल्या गुहा आहेत, ही सैन्याचे राहण्याची जागा असावी.
थोडे पुढे गेल्यावर डावीकडे सुमारे ४७० वर्षांपूर्वी कोरलेला शिलालेख पहायला मिळतो. या किल्ल्याचे अवशेष काही प्रमाणात सुस्थितीत असल्याने किल्ला भटकायला मजा येते. तटबंदी, पाण्याचे टाके, धान्य कोठार, दरबारी इमारतीचे अवशेष अन् जलव्यवस्थापानाचे अनेक नमुने पाहायला मिळतात. येथील एका कबरीच्या समोरील कमानीवरही एक फारसी शिलालेख होता. हा कमान जागेवर नाही. विशेष म्हणजे हतगडाचा नकाशा चक्क ताम्रपटावर काढण्यात आल्याचे मोरे यांच्या संग्रहातील ताम्रपटातून दिसते. हा ताम्रपट हातात घेऊन किल्ला न्याहाळल्यावर तो तसाच असल्याचे लक्षात येते. त्यांच्याकडील एक राजमुद्रा वैशिष्टपूर्ण असून, हतगड ताब्यात घेण्यासाठी छत्रपतीनी ती आदेश स्वरूपात दिल्याचे मोरे सांगतात. एका ताम्रपटावर `शके १५९६ सुबेदार गंगाजी मोरे.दे. ऊर्फ गोगाजी शिंदे अधिकारी चीमनाजी बाबुराव देशपांडे हतगड सदनदाकल देशपांडे प्रा//. मचुकुर हतगड श्रावण शु.पा.’ असे लिहिले आहे. अशा अनेक खाणाखुणांमधून हतगडचा इतिहास समोर येतो. हतगड स्वच्छसुंदर ठेवण्यासाठीही प्रयत्न होण्याची गरज आहे. जागोजागी दारूच्या बाटल्यांचा खच आणि कचऱ्यामुळे हतगड धोक्यात आला आहे. इतिहासात महत्त्वाच्या कामगिरी निभावलेल्या हतगडवाडीच्या सुवर्णमय इतिहासावर संशोधन होण्याची गरज असल्याची साद येथील पाऊलखुणा घालतात.
अंतिम सुधारित : 7/26/2020
प्रत्येक गावाला आपली एक ओळख असते. त्या ओळखीच्या खा...
पुरंदर गडकिल्याच्या गिरीशिखरावर महाराणी सईबाई व यु...
इतिहासातील अनेक पात्र आपल्या आजूबाजूला वावरत असतात...
एखाद्या गावाचा इतिहास पूर्णपणे पुसला गेला असला तरी...