অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तारापूरचा किल्ला

तारापूरचा किल्ला

मुंबई-अहमदाबाद रेल्वे मार्गावर बोइसर हे स्थानक आहे. या स्थानकापासून तारापूरला बस किंवा रिक्षाने जाता येते.

तारापूरचा उल्लेख राजा भीमाने नाईकांकडून जिंकलेले गाव असा 1280 सालच्या नोंदीत आढळतो. इ.स. 1533 मध्ये पोर्तुगीजांनी तारापुरात घुसून जाळपोळ केली. त्यानंतर पोर्तुगीजांनी हा भाग जिंकून घेऊन तेथे किल्ला बांधला. इ.स. 1582 व इ.स. 1612 या वर्षी मोगलांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. इ.स. 1669 मधे हबश्यांनी तारापूरवर हल्ला केला, पण तो किल्लेकऱ्यांनी यशस्वीपणे परतवून लावला.

तारापूर किल्ल्याच्या तटबंदीला वर्तुळाकार बुरुज होते व किल्ल्यामध्ये डॉमिनिकन प्रार्थनामंदिर, मठ, रुग्णालय व मिझरिकोर्दिया (दु:खितांचे आश्रयस्थान) इत्यादी वास्तू होत्या. एक कप्तान, एक नाईक, दहा शिपाई, एक बरकंदाज, एक पोलीस इन्स्पेक्टर आणि त्याची चार प्यादी, दुभाष्या, लेखनिक, मशालजी आणि एक छत्र धारण करणारा अशी किल्ल्याची शिबंदी होती. या शिबंदीव्यतिरिक्त किल्ल्यामध्ये पॅरिशवरील धर्मोपदेशक, पन्नास पोर्तुगीज, 200 स्थानिक ख्रिश्चन आणि शंभर गुलाम होते. हे सर्व गुलाम उत्तम लढवय्ये असून त्यांच्याकडे तलवारी, बंदुका व भाले अशी शस्त्रे होती. इ.स. 1670 सालच्या ओजिबे याच्या नोंदीनुसार तारापूर हे समुद्रकिनाऱ्यावरील नगर होते. तर 1695 सालच्या करेरीच्या नोंदीनुसार या नगरामध्ये डॉमिनिकन आणि फ्रान्सिसकन पंथीयांचे मठ व शाळा होत्या.

तारापूर शहराचा सुरत व दीवशी मोठा व्यापरउदीम होता. तारापूर ही एका पोर्तुगी प्रांताची राजधानी असून दमण इलाख्यातील ते सर्वात श्रीमंत नगर मानले जात होते. पोर्तुगीज अंमलातील तारापूरच्या इतिहासातील आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे या प्रांतावर छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली स्वारी, छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर जेव्हा मोगलांचे आक्रमण स्वराज्यावर येऊ घातले तेव्हा पोर्तुगीजांनी मोगलांचा पक्ष घेऊन मोगलांना सर्वतोपरी मदत केली म्हणून संभाजी राजांनी इ.स. 1683 ते इ.स. 1687 या काळात फिरंगाणावर आक्रमण करुन फिरंगाणातील निरनिराळ्या ठिकाणी युद्धे केली. दातोर लुईस गोंसाल्व्हिस कोत याने इ.स. 1684 च्या सुरवातीस गोव्याच्या विजरईस पाठवलेल्या पत्रानुसार त्यासुमारास संभाजीचे लष्कर तारापूर किल्ला जिंकण्यासाठी लढत होते. तथापि त्याला तारापूरचा किल्ला जिंकता आला नाही असे दिसते.

सद्यस्थितीत तारापूर किल्ल्याची आता फक्त तटबंदी उरली असून त्यावर झाडी मातली आहे. तारापूरचा किल्ला वसईइतका विशाल नसला तरी आकारमानाच्या बाबतीत त्याची तुलना वेसावा व शिरगाव येथील किल्ल्यांशी होऊ शकेल. या किल्ल्यात एक चर्च, मिझरीकोर्दिया, व इतर निवासी इमारती होत्या असे मानन्यास वाव आहे. तथापि, आज आतील इमारतींपैकी काही शिल्लक नाही.

लेखन - संकलन – विलास सागवेकर,
उपसंपादक

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 8/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate