অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बेलापूरचा किल्ला

बेलापूर रेल्वे स्टेशनला उतरुन पाम बीच रोडकडे वाटचाल करत असताना डावीकडे एक रस्ता बंदराचा किंवा खाडीच्या दिशेने जातो. हा रस्ता व वाशीकडे जाणारा रस्ता यांच्यामध्ये जो कोनाकृती भाग तयार होतो त्या क्षेत्रात असलेल्या टेकडीवर हा किल्ला वसला आहे. सध्याचा किल्ल्यात जाणारा मार्ग सिडकोच्या रेस्ट हाऊसच्या आवारातून आहे.

बेलापूरचा किल्ला पोर्तुगीजांनी अदमासे 16व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधला. या किल्ल्याला पोर्तुगीजांनी ‘सॅबेज’ हे नाव दिले होते. ऐतिहासिक कागदपत्रात मिळणाऱ्या माहितीनुसार या किल्ल्याला पाच बुरुज असून अकरा तोफा होत्या. त्याशिवाय बंदराच्या रक्षणाकरता म्हणून नऊ तोफा होत्या.

सध्याची भिंत हीच किल्ल्याची तटबंदी

आज या किल्ल्यात जाण्याच्या मार्गावर देवीचे मंदिर आहे. हे मंदिर अर्थातच अगदी अलीकडच्या काळातील आहे. मंदिराच्या डावीकडे एक गगनचुंबी इमारत गेल्या काही वर्षात बांधण्यात आली आहे. या इमारतीच्या उत्तर सीमेजवळ किल्ल्याला किंवा अधिक काटेकोर भाषेत सांगायचे झाल्यास किल्ल्याच्या अवशेषांना सुरुवात होते. इमारतीच्या आवारांनी सध्याची भिंत हीच किल्ल्याची तटबंदी होती काय हे सांगणे कठीण आहे. पण निदान सकृतदर्शनी तरी तसेच वाटते. मात्र या भिंतीचे स्वरुप तट किंवा भिंत असे नाहीच. म्हणजे किल्ल्याच्या आतील बाजूने या तटाला जराही उंची नाही. निराळ्या शब्दात सांगायचे तर किल्ल्याच्या अंतर्भागातील जमिनीची पातळी व तटाची उंची (जर हा तट असेल तर ) एकच आहे. या तटाच्या थोडे उत्तरेला एक दुमजली वास्तू होती. या वास्तूचे अवशेष आजही टिकून आहेत. वास्तूची दक्षिणेकडील भिंत बहुतांशी प्रमाणात शिल्लक असून त्या वास्तूचा वरच्या मजल्यावरील दरवाजाही स्पष्ट दिसतो. ही वास्तू निर्विवादपणे पोर्तुगीज स्थापत्यशैलीची किंवा निदान भारतात पोर्तुगीजांनी ज्या प्रकारच्या वास्तू बांधल्या त्या प्रकारची आहे. पहिल्या मजल्याची जमीन किंवा तळमजल्याचे छत आता पूर्णपणे पडून गेले आहे. उत्तरेकडील भिंत सोडली तर बाकी भिंती तळमजल्याच्या उंचीपर्यंतच टिकून राहिल्या आहेत. तळमजल्याचे छत व वरच्या मजल्याची जमीन आधी भिंतीत गाडलेल्या जाड लाकडी तुळया व त्यावर मुरुम या स्वरुपाची असावी असे दिसते. भिंतीमध्ये ज्या जागी तुळया रोवण्यात आल्या होत्या त्या खाचाही स्पष्टपणे दिसतात.

या इमारतीच्या पूर्वेकडे अगदी थोड्याच अंतरावर एक छोटासा हौद आहे. तथापि हा हौद केवळ पाणी साठवण्याचा आहे; त्यात जिवंत झरे नाहीत. या हौदाच्या पूर्वेला किल्ल्याची पूर्वेकडील तटबंदी होती. या तटबंदीचा फारच थोडा भाग अवशेषरुपाने शाबूत आहे. म्हणजे या तटबंदीचा फक्त पायाच शिल्लक आहे. असे असले तरी ही तटबंदी सुमारे 2 ते 2.5 मीटर रुंदीची होती व अत्यंत भक्कम स्वरुपाची होती हे या अवशेषांवरून सहजपणे लक्षात येते.

बेलापूरच्या खाडीजवळच हा किल्ला वसला आहे. त्यामुळे सागरी सत्ता असलेल्या पोर्तुगीजांच्या दृष्टिकोनातून या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व होते. त्याचप्रमाणे घाट आणि मुंबई यांना जोडणाऱ्या मार्गावर हा किल्ला आहे. पूर्वी कल्याण हे शहर अत्यंत भरभराटीला आले होते. कल्याण शहराकडे जाण्यासाठीही बेलापूरवरुन जाणे सोयीचे होते. बेलापूरच्या किल्ल्याच्या पायथ्याशीच असलेल्या खाडीमुळे या किल्ल्याचा उपयोग काही प्रमाणात जलदुर्गासारखाही होत असे. या सोयीमुळेच मराठ्यांचे आक्रमण झाल्यानंतर पोर्तुगीजांना गलबतांमधून या खाडीच्या सहाय्याने पळून जाता आले. राघोबादादा पेशव्याच्या बंडाईच्या वेळी ब्रिटिशांच्या फौजा बेलापूरहूनच कल्याणवर चालून गेल्या.

बेलापूर किल्ल्याचे वर्णन

1862 साली प्रकाशित झालेल्या ठाणे जिल्हा गॅझेटियरमध्ये (त्यावेळचा ठाणे जिल्हा) इ.स.1818 साली कॅप्टन डिकिन्सन याने या किल्ल्याचे वर्णन उद्बोधक आहे या वर्णनानुसार “किल्ल्याची उत्तर–दक्षिण लांबी 400 फूट व पूर्व –पश्चिम रुंदी 200 फूट आहे. उत्तरेकडील महाद्वार आणि दक्षिणेचे दोन बुरुज यांचा अपवाद वगळता बाकी सर्व किल्ला पडून गेलेला आहे. यातील एका बुरुजामध्ये रक्षकांचा कक्ष आहे. दोन्ही बुरुजांवर तोफा होत्या. किल्ल्यात काही भाग 1818 सालच्या मुसळधार पावसामुळे पडून गेला आहे. या किल्ल्यात बरीच पडझड झालेली एक विहीर आहे. तथापि पावसाळा संपला की काही दिवसातच या विहिरीचे पाणी आटते.”

या वर्णनात हा किल्ला 400 फूट x 200 फूट आकाराचा आहे असे म्हटले आहे. आजचे अवशेषही साधारण याच आकारात मिळतात. मात्र बखरींमध्ये आणि ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये चिमाजीअप्पाच्या स्वारीच्या ज्या हकिकती आढळतात त्यातून किल्ल्यात वास्तव्याला असलेली लोकांची संख्या लक्षात घेता एकतर या किल्ल्यात लोक खूपच दाटीवाटीने राहात असावेत किंवा ही वर्णने तरी अतिशयोक्त असावीत असे वाटते. यातील पहिला तर्क जर बरोबर असेल तर दाटीवाटीने राहण्याची मुंबईकरांची सवय अगदी पोर्तुगीजकाळापासून होती असे म्हणायला हरकत नाही !

किल्ल्यामध्ये विहीर (वेल) आहे असे या वर्णनात म्हटलेले असले तरी ती रुढार्थाने विहीर नसावी. पावसाळा संपताच ती काही दिवसातच आटून जाते असे खुद्द त्या वर्णनातच म्हटलेले आहे. आज किल्ल्यात ज्या हौदाचे अवशेष दिसतात त्याच हौदाला या वर्णनात विहीर संबोधण्यात आले असणार हे उघड आहे. ऐतिहासिक कागदपत्रांमधूनही किल्ल्यातील लोक पाण्यासाठी किल्ल्याबाहेरील भागावर अवलंबून होते असे म्हटलेले आहे.

हा आटोपशीर आकाराचा किल्ला जतनदुरुस्ती करुन त्याची निगा राखल्यास व योग्य प्रकारे देखभाल केल्यास ते पर्यटकांचे आकर्षणस्थान ठरेल यात काही शंका नाही. 

लेखन - संकलन - विलास सागवेकर

उपसंपादक

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 4/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate