অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मांडवीचा किल्ला

मांडवीचा किल्ला

वसई रेल्वे स्थानकाजवळील एस.टी स्टॅण्डवरुन दर पाऊण तासाने वज्रेश्वरीला जाणाऱ्या बसेस सुटतात. या बसेस मांडणीवरुन जातात. स्वत:ची गाडी असेल तर मुंबई अहमदाबाद महामार्गावर म्हापोली नाका आहे. या नाक्यावर महामार्गाच्या एका बाजूला विरार फाटा तर दुसऱ्या बाजूला वज्रेश्वरी फाटा आहे. वज्रेश्वरीच्या फाट्यावरुन सुमारे पाऊण किलोमीटर अंतरावर मांडवी गाव आहे. या मांडवी गावात एक आयताकृती तलाव आहे. या तलावाच्या पूर्वेस मांडवी किल्ला आहे.

मांडवीचा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला. तो नेमक्या कोणत्या वर्षी बांधला याची माहिती नाही. तथापि उत्तर कोकणचा प्रदेश ताब्यात आल्यानंतर व शिवकालापूर्वी हा किल्ला बांधण्यात आला असावा. पूर्वी सोपाऱ्याहून थळ घाटाकडे मोठा वाहतुकीचा रस्ता असे. त्यावरच हे ठाणे असल्यामुळे या ठाण्याला खूप महत्त्व होते.

जेव्हा स्वराज्यावर खुद्द औरंगजेबाच्या नेतृत्वाखाली मोगली आक्रमण आले त्यावेळी पोर्तुगीजांनी मोगलांशी सहकार्य केल्यामुळे संभाजी महाराजांना पोर्तुगीजांबद्दल प्रचंड चीड आली व त्यांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्यासाठी फिरंगाणावर आक्रमण केले. त्यावेळी संभाजीने मांडवीचा किल्ला जिंकला की नाही याबाबतची स्पष्ट नोंद नाही. तथापि मांडवीचा परिसर काही काळ संभाजी महाराजांच्या ताब्यात होता असे मानण्यास जागा आहे.

इ.स.1737- 1739 च्या फिरंगाणावरील मोहिमेत मांडवी किल्ला जिंकण्याची कामगिरी बरवाजी तपकीर यावर सोपविण्यात आली होती. 3 एप्रिल 1737 रोजी बरवाजीने मांडवीस वेढा दिला व कोट जेर करावयाचा उद्योग चालवला. एक तोफ लागू करुन किल्ल्याचा दरवाजा रोखून टाकला. 6 एप्रिल रोजी आणखी दोन तोफा गोखरवेयाच्या दादरावरुन आणून त्या जोडून त्यांचाही मार सुरु केला. 11 एप्रिल रोजी केशव सजणाजी या भिवंडीच्या ठाणेदाराने एक नवीन गोलंदाज (तोफ डागणारा इसम) बरवाजीकडे पाठवून दिला. 15 एपिलपर्यंत मराठ्यांचा मारा चालूच होता. परंतु आदल्या दिवसापासून “फिरंगी मार करत नव्हता, निच्चेत होता.” मराठ्यांनी ताडाची झाडे तोडून त्या लाकडांचा दमदमा तयार केला व त्यावर तोफा चढवून किल्ल्यात मारा करण्यास सुरवात केली.

या वेढ्यात तुकनाक महाराचा एक मोर्चा होता. त्याच्या मोर्चेकऱ्यांनी फार मेहेनत केली. मुख्यत: त्याच्याच मोर्च्यामुळे व बंदरावरुन आणलेल्या तोफेच्या मारामुळे मांडवीचा किल्ला धायकुतीला आला.

आयताकृती क्षेत्र, लांबीच्या बाजू दक्षिण-उत्तर, रुंदीच्या बाजू पूर्व-पश्चिम, चार कोपऱ्यात चार अष्टकोनी बुरुज व दक्षिण व उत्तरेस प्रवेशद्वारे असा या किल्ल्याचा तलविन्यास आहे. किल्ल्याच्या पश्चिमेस जवळपास किल्ल्याच्याच आकाराचे तळे आहे. दोन्ही प्रवेशद्वारांच्या दुतर्फा रक्षकांच्या देवड्या होत्या हे स्पष्ट होण्याइतपत अवशेष आजही शिल्लक आहेत. दक्षिणेकडील दरवाजा उत्तरेकडील दरवाज्यापेक्षा अधिक रुंद आहे. दोन्ही दरवाजे व्याघ्रमुखी, म्हणजेच पोर्तुगीज शैलीतील आहेत. दरवाज्याच्या भिंतीच्या रुंदीच्या भागात असलेल्या आडवा अडसर घालण्याकरता असलेल्या चौकोनी खाचा आजही टिकून आहेत.

आधीच नमूद केल्याप्रमाणे किल्ल्याच्या चार कोपऱ्यात बुरुज आहेत. हे चारही बुरुज आज ढासळलेले असले तरीही त्यांचे पायथे शिल्लक असल्यामुळे हे बुरुज अष्टकोनी असल्याचे लक्षात येते. आग्नेय, नैऋत्य, वायव्य या दिशांकडील बुरुजांचे पायाचे अवशेष ते अष्टकोनी असल्याची साक्ष देतात. मात्र ईशान्येकडील बुरुज ढासळून त्याच्या मलब्याच्या ढीगाखाली पायाचे अवशेष झाकले गेले असल्यामुळे बुरुजाचा तलविन्यास समजू शकत नाही. तथापि ज्याअर्थी बाकी तीन बुरुज अष्टकोनी आहेत त्याअर्थी हाही बुरुज अष्टकोनीच असावा.

किल्ल्याच्या दक्षिण-उत्तर असलेल्या भिंती बऱ्याच लांब आहेत व बुरुज फक्त टोकावरुन आहेत. या भिंती मजबूत बनाव्यात यासाठी वसईच्या किल्ल्याच्या तटबंदीला आहेत तशा तटाच्या काटकोनात असलेल्या आधारभिंती याही किल्ल्याच्या पूर्व व पश्चिम तटांना आहेत. किल्ल्याचे तट पूर्णपणे म्हणजे त्यांच्या मूळ उंचीत टिकून राहिलेले नाहीत. त्यामुळे तटाच्या वरच्या भागात काही गोळीबार गवाक्षे असतील तर ती आज पडून गेली आहेत. किल्ल्याच्या अंतर्भागात वाळलेल्या गवताचा इतका मोठा थर साठला आहे की अंतर्भागातील वास्तूंचे काही पाये शिल्लक असतील तर ते सफाई केल्याशिवाय उजेडात येणे अशक्य.

किल्ल्याच्या तटाचा वरचा भाग व बुरुज पूर्णत: पडून गेलेले असून झाडीही बऱ्यापैकी मातली आहे. तरीही किल्ल्याचे स्वरुप जाणता येईल इतपत अवशेष शिल्लक आहेत. 

हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधले असल्याचे उल्लेख तर आढळतात. पण व्याघ्रमुखी दरवाजे, अष्टकोनी बुरुज, आत पाण्याची विहीर नसणे, तटाला असलेल्या आधारभिंती हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधल्याची साक्ष देतात.

दरवाज्याच्या दुतर्फा असलेल्या देवड्या हा पोर्तुगीज किल्ल्यांमध्ये सामान्यत: न आढळणारा वास्तुघटक आहे. त्यामुळेच हा किल्ला तौलनिक दृष्ट्या नंतरच्या काळातील असावा असे वाटते.

या किल्ल्यात नैऋत्य दिशेच्या बुरुजाच्या पायावरुन या किल्ल्याच्या बुरुजांच्या बांधणीची कल्पना येते. बुरुजाचा बाह्यभाग दगडांनी बांधलेला होता. तलविन्यासात दगडी बांधकामाची बाह्यरेषा अष्टकोनी असली तरी अंतर्रेषा वर्तुळाकार आहे. आतला भाग माती व मुरुम भरुन बनला होता हे उघड आहे.

लेखन - संकलन - विलास सागवेकर,
उपसंपादक

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 6/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate