অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मैलगड किल्ला

दऱ्या, खोऱ्या, निसर्ग वेलींनी नटलेला बुलडाणा जिल्हा प्राचीन मुर्त्या, किल्ले व ऐतिहासिक वास्तूंची खाण आहे. ओंकारचा आकार असलेल्या अजिंठा पर्वतरांगांमधील डोंगरांनी बुलडाणाच्या नैसर्गिक सौदर्यात भर घातली आहे. खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवराने बुलडाण्याला जगात प्रसिद्धी मिळवून दिली तर संपूर्ण देशाचे स्फूर्तीस्थान असलेल्या शिवाजी महाराजांच्या माता जिजामातेचे जन्मस्थान सिंदखेड राजाने या जिल्ह्याला इतिहासात अजरामर स्थान मिळवून दिले. बुलडाणा जिल्ह्यात बरेच किल्ले आहेत, त्यापैकी मैलगड किल्ला हा विशेष आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पदस्पर्श या किल्ल्याला लाभला असून, ऐतिहासिक व निसर्ग पर्यटनासाठी हा किल्ला उत्कृष्ट पर्यटनस्थळ आहे. उचंच उंच हिरव्यागार डोंगरावर वसलेल्या या किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी डोंगर - दऱ्या पार कराव्या लागतात. झाडे-झुडूपातून वाट काढत असतानाच निदर्शनास पडतो तो किल्ल्याचा बुरूज. हा बुरूजच पर्यटकांना खुणावतो व लवकरात लवकर किल्ल्यात प्रवेश करण्याची इच्छा जागृत होते. किल्ल्यावर पोहोचल्यावर नयनरम्य असे डोंगर व जंगल निदर्शनास पडतात. त्यामुळे डोळ्याचे पारणे फिटते. किल्ल्याची बांधणही एका विशिष्ट पद्धतीने करण्यात आली असून, डोंगर पोखरून महाल बांधण्यात आले आहेत.

सातपुडा पर्वतरांगेवरील एका डोंगरावर मध्यप्रदेश आणि महाराष्टाच्या सीमेवर मैलगड किल्ला आहे. या किल्ल्याची विशेषतः अशी की अंजिंठा वेरुळच्या लेण्यांप्रमाणे संपूर्ण किल्ला हा दगडांच्या काळ्या पाषाणात कोरला आहे. डोंगर एवढा उंच की पायथ्याहून वर नजर टाकल्यास अवसान गळते. डोंगरावर गेल्यावर येथे काहीच नसल्याचे निदर्शनास येते. मात्र, दगडांमध्ये कोरलेल्या भुयारसारख्या खोल्यांकडे बघितल्यावर अद्भूत व विशेष पद्धतीने बांधकाम केलेल्या या किल्ल्याची महती पटायला लागते. विदर्भातील अन्य कोणत्याही किल्ल्यामध्ये अशाप्रकारचे बांधकाम दिसत नाही. अन्य कोणत्याही किल्ल्यावर न दिसणारी एक विशेष बाब येथे दिसते ती म्हणजे किल्ल्याच्या सुरुवातीलाच एका किल्ल्याचा संपूर्ण नकाशा दगडावर कोरलेला आहे. या नकाशावरुनच किल्ल्याच्या भव्यतेचा परिचय येतो. किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श लाभला आहे.

मैलगडपासून जवळच असलेल्या जामोद या गावाला प्राचिन इतिहास लाभला आहे. त्रेतायुगात भगवान श्रीरामाचे पिता राजा दशरथ यांनी येथे पुत्रकामेष्ठी यज्ञ केल्याचे पुराणात लिखीत आहे. लक्ष्मणाला मेघनाथाचा बाण लागल्यावर त्याचे प्राण वाचविण्यासाठी हनुमान हिमालयातील द्रोणागिरी पर्वत घेवून जात असताना द्रोणागिरी पर्वताचा एक तुकडा जामोद जवळील जंगलात पडला व तेथे एक खोल दरी तयार झाली. ती जागा सध्या बादलखोरा म्हणून प्रसिद्ध आहे. द्रोणागिरी पर्वतानंतर संजीवनी केवळ बादलखोऱ्‍यात सापडत असल्याचे उल्लेख अनेक आयुर्वेदीक ग्रथांमध्ये आढळतात. तसेच द्वापारयुगात पांडव येथे येवून गेले असल्याचाही उल्लेख अनेक पुस्तकांमध्ये आला आहे. पांडवांनी ज्या नदीच्या काठी मुक्काम केला त्या नदीला पांडव नदी संबोधिले जाते. ही नदी आजही याच नावाने ओळखली जाते. एकंदर यावरुन जामोद येथे प्राचिन काळापासून वस्ती होती, असे निदर्शनास येते. उत्तरेकडून दक्षिणकडे जाण्यासाठी पूर्वी पायनघाट हा मार्ग होता. या मार्गावर जामोद व मैलगड किल्ला होता. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्‍या प्रवाशी, व्यापारी किंवा राजे, महाराजांच्या मुक्कामासाठी एक ठाणे म्हणून या किल्ल्याचा उपयोग होत होता. मैलगड हा महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवर आहे. बऱ्‍हाणपूरवरुन 50 किमी अंतरावर असलेल्या या किल्ल्याचे बांधकाम केव्हा झाले व कुणी केले याची माहिती उपलब्ध नाही. मात्र, किल्ल्याच्या बांधकामावरुन किल्ला प्राचिन असल्याचे निदर्शनास येते.

सातपुडा पर्वतरांगेतील एका डोंगरावर असलेल्या या किल्ल्याची विशेषतः म्हणजे हा संपूर्ण किल्ला डोंगरातील काळ्या पाषाणात कोरुन बांधला आहे. एक मैल चौरस असे या किल्ल्याचे क्षेत्रफळ आहे. गडावरुन बघितल्यावर येथे काहीच नाही असे दिसते. मात्र, दगडामध्ये विविध ठिकाणी मोठ-मोठया खोल्या आहेत. किल्ल्याचे बांधकाम गोलाकार आहे. डोंगराच्या चारही बाजूने खोल दरी आहे. गडावर फिरल्यानंतर चारही बाजूने दगडांमध्ये भुयारासारख्या खोल्या असल्याचे दिसते. खोल्यांमधील भिंती व खांब हे दगडांचेच आहेत. सध्या खोल्यांमध्ये माती व कचरा साचला असल्यामुळे आत जाता येत नाही. मात्र, हा संपूर्ण डोंगर पोखरुन त्यामध्ये मजबूत असा किल्ला असल्याचे चारही बाजूने बघितल्यावर निदर्शनास येते. यामध्ये 20 ते 25 खोल्या असाव्यात. एवढ्या उंच डोंगरावरही पाणी उपलब्ध आहे. आम्ही एप्रिल महिन्याच्या अखेरीस उन्हाळ्यात किल्ल्यावर गेल्यावरही तेथे पाणी होते. येथे एक सासू, सुनेचे पाणी म्हणून प्रसिद्ध असलेले एक जलकुंभ आहे.

दगडांमध्ये कोरुन हे जलकुंभ बांधण्यात आले आहे. येथे एका कपारीतील पाणी गरम ते दुसऱ्‍या कपारीतील पाणी थंड होते, असे पायथ्याशी राहणारे आदिवासी सांगतात. आता मात्र, दोन खोल्यांमधील भिंत पडल्यामुळे पाणी थंड आहे. ज्वालामुखीच्या शांत झालेल्या मुखातून येथे गरम पाणी आणण्यात आले, असे काही नागरिक सांगतात. तसेच येथील पाण्याचा एक उपसर्गही आहे. गडावरुन 14 ते 15 किमी असलेल्या मोहिदपूर गावात या गडावरील पाण्याचा आउटलेट आहे. वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी येथे लिंबू टाकले तर मोहिदपूर येथे निघत होते, असे नागरिक सांगतात. सध्याही येथे पाण्यात निळ टाकली तर मोहिदपूर येथे निळे पाणी निघते. डोंगराच्या कडा समोरील बाजूने दगडांनी बांधल्या आहेत. मध्यप्रदेशच्या बाजूने डोंगरावर एक बुरुज आहे. एवढेच एक बांधकाम येथे दगडांनी व डोंगराच्या भुपृष्ठावर केलेले आहे. अन्यथा सर्व बांधकाम हे दगडांमध्येच आहे. हा बुरुज खालून दिसतो. याचे बांधकाम दगडांमध्ये असून, शत्रूवर नजर ठेवण्यासाठी छिद्र आहेत. किल्ल्याच्या पायथ्याशी उत्तरेकडून एक अष्टकोनी विहीर व मंदिर आहे.

शिवाजी महाराजांचा पदस्पर्श

सोळाव्या शतकात हा किल्ला हैदराबादच्या निजामांच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून औरंगजेबाच्या तावडीतून निसटून वेशांतर करून रायगडावर जाताना ते बऱ्‍हाणपूरवरुन मैलगडावर आले होते. येथे ते वास्तव्यास राहणार होते. औरंगजेबाने शिवाजी महाराजांना पकडून देणाऱ्‍याला मोठे बक्षिस जाहीर केले होते. त्यावेळी किल्लेदार असलेल्या गोसावीला शिवाजी महाराज मैलगडावर मुक्कामास आले असल्याचे समजले. त्याने बक्षिसाच्या लालसेपोटी औरगंजेबाला ही माहिती देण्याचे ठरविले. त्याचा सैनिकांशी केलेला हा वार्तालाप त्याच्या सुनेने ऐकला व तिने गडावर असलेल्या प्रवाशांमध्ये जावून शिवाजी महाराजांना ही माहिती दिली. त्यामुळे शिवाजी महाराज तत्काळ येथून निघून गेले.

इ.स. 1801 च्या सुमारास वऱ्‍हाडात गाजीखान नावाच्या व्यक्तीने सैन्य जमवून लुटालूट चालविली होती. त्यामुळे द्वितीय रघुजी भोसले यांनी यशवंतराव भवानी शंकर काळू याच्या अधिपत्याखाली पाच हजार सैन्य देवून पाठविले. गाजीखान हा मैलगड किल्ल्यात बसला होता. काळू यांनी या किल्ल्यावर तोफांनी मारा सुरु केला. किल्ल्यावर सैनिकांच्या हल्ल्यानंतर गाजीखानला पराभवाचे लक्षण दिसताच तो लष्करी साहित्य सोडून पळून गेला.

कसे जाल

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदपासून तीन ते चार किमी अंतरावर असलेल्या डोंगरावर हा किल्ला वसलेला आहे. वनविभाग किंवा या किल्ल्याची माहिती असलेल्या व्यक्तींना घेवून जाणे योग्य आहे.

जवळचे रेल्वेस्थानक - अकोला येथून 70 ते 75 किमी अंतरावर जळगाव जामोद आहे.

जवळचे विमानतळ - नागपूर येथून 320 किमी अंतरावर जळगाव जामोद आहे.

लेखक : विवेक चांदूरकर, वाशिम

माहिती स्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 8/15/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate