অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लढवय्या राणेखानाचे देवपूर

लढवय्या राणेखानाचे देवपूर

वेशीवरच्या पाऊलखुणा : लढवय्या राणेखानाचे देवपूर

नाशिकच्या नसानसात ऐश्वर्य अन्‌ शौर्य दडलेलं आहे. त्याच्या पाऊलखुणा गावागावांमध्ये आजही अनुभवयाला मिळतात. मात्र या पराक्रमी आणि इतिहास घडविणाऱ्या रणधुरंधरांचा इतिहास अजूनही अज्ञातवासात खितपत पडलेला दिसतो. त्यांच्या शौर्याला त्यांनी उभारलेल्या ऐश्वर्यसंपन्न इतिहासाला पुनर्वैभव मिळवून देण्याची अन्‌ ते जपण्याची गरज आहे, असे सिन्नर तालुक्यातील देवपूर हे गाव पाह‌िलं की वाटायला लागतं. राणेखाणाचे शौर्य, भागवतबाबांची महती अन् शाहीरांची गुरूभूमी या इतिहासाने देवपूर सजले आहे. मात्र देवपूरचा हा प्रवास अस्वस्थ तर करतोच पण, नाशिकचा वारशाची स्थिती पाहून ह्दय पिळवटून निघते.

देवपूर अन् राणेखानाच्या इतिहासाला पानिपतच्या लढाईचा संदर्भ आहे. त्यामुळे हा इतिहासही जाणून घेणे रोमांचक ठरते. १४ जानेवारी १७६१ ला अहमदशहा अब्दाली आणि मराठे यांच्यात पानिपतचं तिसरं युद्घ झालं. या युद्धात नानासाहेब पेशव्यांबरोबर १२-१३ वर्षांचे अगदीच नवखे महादजी शिंदे सहभागी झाले होते. मात्र मराठ्यांचे पानिपत होऊ लागलं. ‘पानपतांत शेवटच्या दिवशीं जेव्हां उरलेले लोक पळाले, तेव्हां महादजीही परत फिरला. वाटेत एका पठाणानें त्याला डाव्या पायावर सांग मारून जन्माचा लंगडा केला असतां, राणाखान (राणेखान) नांवाच्या एका मराठे लष्करांतील माणसानें त्याला शेवटपर्यंत निभाऊन आणलें. त्याबद्दल खानास महादजीनें भाऊ मानून व पुष्कळ इनामें देऊन योग्यतेस चढविलें.’ असा उल्लेख इतिहासाच्या पानात मिळतो. राणेखान एक पखाली (पाणी वाहणारा) होता. जखमी अवस्थेतेतील महादजींना त्या धामधूमीतून राणेखानाने पुन्हा आपल्या मुलखात आणलं.

राणेखानाच्या निष्ठेवर खूश होत त्याला इमान म्हणून सिन्नर तालुक्यातल्या देवपूर, पिंपळवाडी, निमगांव, पास्ते गावची जहागिरीही दिली. राणेखानास देवनदीचा सहवास आवडल्याने त्याने वास्तवासाठी देवपूरची निवड केली. आतापर्यंत एवढाच राणेखानाचा इतिहास सांगितला जातो. मात्र दिल्लीवर नियंत्रण ठेवण्याच्या मराठ्यांच्या मनसुब्यातील सर्वांत मोठा अडथळा मोडून काढण्यात महादजी शिंदेंचा पराक्रम आणि कारर्किद तेवढीच मोलाची ठरली. यात राणेखानाची त्यांना मिळालेली साथदेखील मोलाची ठरली आहे. याची अनेक उदाहरणे इतिहासात नोंदविलेली आहेत. तसेच नगरमधील पारनेर तालुक्यातील जामगावातील महादजी शिंदेंचा वाडा पाहिला की, राणेखानाला हा भाग इनाम देण्याचे कारण लक्षात येते. पाऊलखुणांच्या निमित्ताने राणेखानाच्या वेगळ्या पैलूंचा हा प्रवास उलगडत जातो.

सिन्नर-शिर्डी रस्त्यावर १२ किलोमीटरवर देवपूर फाटा लागतो. या फाट्यापासून डावीकडे वळायचे अन्‌ पाच किलोमीटवर देवपूर गाव लागते. गावाजवळ येताच दगडी बंधाऱ्यातून डोकावणारी देवनदी दर्शन देते. हा बंधारा इंग्रजांनी बांधल्याचे ग्रामस्थ सांगतात. रस्त्याच्या डावीकडे उभी असलेली मरीआई व खंडोबांचे मंदिर दर्शन देतात. खंडोबा मंदिरासमोर अर्धा शिल्लक असलेला उभा दगडी दीपस्तंभ देवपूरच्या इतिहासाची अवस्था सांगू लागतो. अजून थोड पुढे जाऊन डावीकडे वळाल्यावर आपण गावाबाहेरच्या वेशीसमोर असलेल्या पारावर पोहोचतो. पारामागे लहानमोठी दोन-चार मंदिरे पहायला मिळतात. पखाल्याचा सरदार झालेला लढवय्या राणेखानाने देवपूराभवती कोट बांधत कोटात भव्य वाडावजा हवेली बांधली. कोटाला दोन दरवाजे आहेत. दोन्हीची अवस्था दयनीय आहे. त्यातल्या त्यात पारासमोरचा उत्तरदरवाजा सध्या याला महात्मा गांधी प्रवेशद्वार असेही म्हटले जाते. याची स्थिती बरी आहे. तर बडाबागेकडे तोंड करून असलेला पश्च‌िम दरवाजा आता कोसळण्याच्या स्थितीत आहे.

याची सुंदर बांधणी मात्र तासभर खिळवून ठेवते. गावातील दगडी पाटांवर उभी घरेही त्यावेळचे ऐश्वर्य दाखवितात. राणेखानाने हिंदू-मुस्लिम असा भेदभाव कधी केला नाही, असे मनोहर गडाख व भागवत गडाख सांगतात. याच धर्मसमभावाचे दर्शन घडवीत राणेखानाने गावात मशीद व त्याच्याच शेजारी हनुमान मंदिरही बांधले ते आजही पहायला मिळते. ते पुढे असेही सांगतात की, राणेखान हा प्रामाणिक अन्‌ निष्ठावान होता. आपल्याला मिळालेल्या सत्तेचा त्याने कधीही गैरवापर केला नाही. गावात प्रवेश करताना राणेखान वेशीबाहेरच घोड्यावरून उतरत अन्‌ हवेलीपर्यंत पायी चालत जात. यातून त्यांची प्रजेबद्दलची आपुलकी त्याने अनेक माध्यमातून दाखवून दिली होती. म्हणूनच त्याच्याबद्दलच्या अनेक चांगल्या अख्यायिका गायिल्या जातात. मशिदीसमोर अन्‌ देवनदीच्या काठावर उभी असलेली राणेखानाची चार मजली हवेलीने देह ठेवला आहे. मात्र हवेलीचे अवशेष आजही राणेखानाचा इतिहास जागा करतात. पानिपताच्या पराभवानंतर त्याचा बदला चुकवायला अकरा वर्ष लागली अन् तो बदला दिल्लीवर नियंत्रण मिळवित महादजी शिंदेंनी चुकता केला.

यात त्यांना राणेखानाची मोलाची साथ मिळाली. अनेक लढाया अन्‌ कुरघोड्या मोडून काढण्यात राणेखान वस्ताद होते. १७८७ मध्ये जयपूरचा राजा प्रतापसिंग व महादजी शिंदे यांच्या लढाईत सरदार राणेखान सहभागी होता. महादजी शिंदे उत्तर हिंदुस्थानांत प्रबल झाला तेव्हां गुलाम काद‌‌िरच्या छळापासून बादशहाची मुक्तता करण्याकरितां इ. स. १७८८ साली राणेखानास दिल्लीस पाठविले होते. गुलाम का‌‌द‌िर व इस्मायलबेग यांनी दिलेला आग्र्याचा वेढा उठवून दोन्ही सैन्यांत २४ एप्रिल १७८८ रोजी भरतपूरजवळ झालेल्या लढाईंत त्यांचा पराभव करण्यात १७८८ मध्ये सरदार राणेखानाचा पराक्रम मोठा होता. अनुपगीर गोसावी म्हणजे हिंमतबहादूर गोसावी. दिल्लीच्या शहाअलमने त्याला राजा हिंमतबहाद्दर ही पदवी दिली होती. कुरापतींसाठी प्रसिद्ध असलेल्या अनुपगीरने गोसाव्यांचें एक छोटेसे सैन्य तयार केले होते. गोसाव्यांचा सरदार म्हणून तो प्रसिद्ध होता. त्याने आपल्या कुरापतींमुळे अयोध्येचा नबाब, होळकर, बुंदेलखंडचा अलीबहाद्दर, नाना फडणिस, दत्ताजी शिंदे, जयपूरकर, जोधपूरकरकरांना देखील हैराण केले होते. अनुपगीरला शरण आणण्याची कामगिरी राणेखानाकडे सोपविण्यात आली.

१७८९ मध्ये राणेखानाने त्याचा बंदोबस्त करीत पाटीलबावास शरण आणले. तसेच बादशाहीला हैराण करणाऱ्या गुलाम कादिरच्या बंदोबस्तामुळे मराठ्यांची गेलेली पत व प्रतिष्ठा परत मिळून उत्तरेत त्यांचा वचक पूर्ववत बसला, हे श्रेय महादजी अर्थातच राणेखानाचेच. अलीगडचें पूर्वीचे नाव रामगड असून नजीबखान रोहिल्याने ते बदलले असा उल्लेख गोविंदराव पुरूषोत्तम यांच्या १७८३ च्या पत्रात आढळतो. पत्रात ते म्हणतात,‘नजीबखानानें ज्या रामगडचे अलीकडे अलिगड म्हणोन नांव ठेविले आहे, तेथें जाऊन किल्ला खालीं करून पादशाही (हिंदूशाही) अंमल बसवावा असा राणेखान व रायाजी पंत यांचा विचार आहे. (राजवाडे खंड. १२. ५०, ३६).’ असा उल्लेख मिळतो. हिंदू व मुस्लिम सत्तेत रण पेटले असताना राणेखान पादशाहीसाठी महादजी शिंदे बरोबर रणांगणात लढत होता. यावरून राणेखानाची महादजींबद्दलची निष्ठा समोर येते. राणेखानाच्या अशाच अनेक कामगिरींचा लेखाजोखा मात्र पडद्याआड राहिल्याचेही देवपूर पाहताना लक्षात येते. कारण तेथे हा पराक्रम सांगणारी माहिती मिळत नाही.


राणेखान २२ डिसेंबर १७९१ ला कायमचा देवपूरच्या मातीत एकरूप झाला. राणेखानाचा मृत्यू हा देखील अज्ञात इतिहास आहे. देवनदी काठावरील राणेखानाच्या महालाच्या प्रवेशद्वारासमोरच नदीपलिकड राणेखानाने आपले आई-वडील अन्‌ नर्तकी यांच्या कबरीसाठी बडाबाग नावाची शाही कब्रस्तान तयार केली होती. या बडाबागेतच नंतर राणेखानाची दगडी बांधणीची व नक्ष‌ीकाम केलेली सर्वात मोठी व सुंदर कबर आज पहायला मिळते. बडाबागेला किल्ल्यासारखा पूर्व दरवाजा आहे. या दरवाज्यात उभे राहिले की, राणेखानाची हवेली दिसते. मात्र बडाबागेभवतीचा भक्कम कोट पडला आहे. अनेक कबरींची नासधूस झालेली दिसते. राणेखानाची कबर एक मराठा-मुस्लिम वास्तुशैलीचा उत्तम नमुना आहे. सुंदर कबरीची इमारत, कोरीव काम केलेले दरवाज्यांच्या कमानी, खिडक्या व नक्षीदार घुमट, त्यावरील नक्षीकाम, मनोरे, इमारतींना जोडणारी दगडी पायवाट अन्‌ कारंजे दुलर्क्षित पाहून मन हेलावते. या परिसराची सुंदरता म्हणजे प्रत्यक्ष अनुभवणेच योग्य. शांत परिसर अन् नदीकिनारी असलेली ही सुंदर समाधी राणेखानाचे व्यक्त‌िमत्त्वही उलगडते.

देवपूर बाबा भागवतांची संजीवनी समाधी गाववेशीतून आत गेल्यावर उजव्या हाताला आहे. समाधीवास्तू एखाद्या वाड्यासारखी दुमजली आहे. इमारतीच्या मध्यभागी बाबांचे समाधीस्थान आहे. भागवत बाबा मूळचे नगरसूलचे. त्यांचे वडील महादेवबुवा व आई उमाबाई हे कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी जात असताना गर्भवती असलेल्या उमाबाईंना देवपूरात पुत्र झाला. हाच पुत्र पुढे बाबा भागवत म्हणून प्रसिद्ध झाले. भागवत बाबांनी ग्रामस्थांच्या हितासाठी खूप कामे केली. त्यांची ख्याती ऐकून दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी त्र्य‌िंबकराव डेंगळ्यांच्या हस्ते बाबांसाठी त्या काळात दोन हजार रुपये व वस्त्रं पाठविली. मात्र बाबांनी ती नाकारत ते धन ग्रामस्थांसाठी उपयोगात आणले. फर्दापूर हे गाव भागवत बाबांना इनाम म्हणून मिळाले होते. वावी गावातून किर्तन शिकण्यासाठी भागवत बाबांकडे आलेल्या परशरामाला बाबांनी तू शाहीर असल्याची जाणीव करून देत मार्गदर्शन केले. पुढे तोच शाहीर परशराम म्हणून प्रसिद्ध झाला. या शाहीरांनी देखील आपले गुरू म्हणून बाबा भागवतांचा उल्लेख केला आहे. म्हणूनच शाहीर अमर शेख यांनी गावात १९५५ ला शाहीर संमेलन घेतले होते. या संमेलनात दोनशे शाहीर सहभागी झाले होत अन् हे संमेलन दोन महिने सुरू होते. ही नोंद देखील देवपूरच्या इतिहासातील एक अनोखे पान आहे. गावात १९६० पासून बोहाड्यांची परंपराही बंद झाली आहे. गावात अनेक मंदिरे आहेत.

देवपूर गावाला राजकीय दृष्ट्याही महत्त्व आहे. नंतरच्या काळात देवपूरवर कम्युनिस्टांचा प्रभाव दिसतो. कम्युनिस्टांचे व नाना गडाखांचे देवपूर म्हणून गावाला ओळख आहे. मात्र हा वारसाही पुसट होत आहे. ऐतिहासिक, धार्मिक अन् राजकीय वारसा अंगभूत असलेल्या देवपूरचा देव्हारा मात्र आता रिकामा वाटतो. देवपूरकडे कोणीच लक्ष देत नाहीत, असे म्हणण्यापेक्षा आमचे देवपूर आम्हीच जपू, अशी इच्छाशक्तीही निर्माण होणे गरजेचे आहे. राणेखानाचे ऐश्वर्य, भागवतबाबांची महती अन्‌ शाहीरांची भूमी विस्कटलेली पाहून डोळे भरून येतात. देवपूरचा इतिहास मातीमोल होणार आहे का? हा प्रश्न मन पिळवटून टाकतो.

लेखक : रमेश पडवळ

अंतिम सुधारित : 7/28/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate