অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विदर्भ पर्यटन : अकोला जिल्हा

मुंबई ते कोलकाता या मध्य रेल्वेमार्गावरील तसेच अजमेर-पूर्णा या मार्गावरील एक महत्त्वाचे जंक्शन असलेले अकोला रेल्वेने मुंबई, पुणे, कोलकाता, चेन्नई, हैद्राबाद, इंदोर, जयपूर, कोल्हापूर या शहरांशी थेट जोडलेले आहे. निजामशाहीच्या काळात हैद्राबाद संस्थानमध्ये समाविष्ट असणारे अकोला हे शहर ब्रिटीश काळात 19 व्या शतकात बेरार प्रांतात आले. अकोला जिल्ह्यातील अकोट येथे ब्रिटिशांची नागपूरकर भोसल्यांशी लढाई झाली होती. जुन्या किल्ल्यांचे अवशेष आजही अकोल्यात दिसतात. अकोला या शहराशी अकोलसिंग नावाच्या रजपूत सरदाराचा संबंध आल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. त्यानेच हे शहर वसविल्याचे सांगितले जाते व त्याच्या नावावरूनच शहराचे नाव अकोला ठेवण्यात आले. तर सफर करूयात पश्चिम विदर्भातल्या अकोला जिल्ह्याची !

नरनाळा

अकोट तालुक्याच्या उत्तरेला साधारण 24 कि.मी. वर सातपुड्याच्या उंच डोंगरावर नरनाळा किल्ला पसरलेला आहे.अकोल्यापासून याचे अंतर 66 कि.मी. आहे. नरनाळा किल्ल्याला अकोला जिल्ह्याचे मुकुट म्हटले जाते. जवळच नरनाळा अभयारण्य असून ते मेळघाटाचे प्रवेशद्वार आहे. गडाच्या खाली शहानुर नावाचे गाव आहे. पायथ्या पासुन गडावर जाण्याकरिता आता गाडीवाट आहे. तरीही कित्येक दुर्गप्रेमी पायीच गड चढणे पसंत करतात. पायथ्याशी वन विभागाच्या चौकीवर जाता येता नोंद करावी लागते, गडावर मुक्कामास परवानगी नाही. सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असलेला नरनाळा महोत्सव' जिल्हा प्रशासनातर्फे दरवर्षी येथे आयोजित केला जातो.

भौगोलिक माहिती

गड जमिनीपासून 3161 फुट उंच आहे. गडाचा विस्तार हा 382 एकर असून गडाच्या कोटाची (तटबंदी) लांबी 24 मैल आहे. एकूण दोन लहान व एक मोठा असा मोठा पसारा असणारा हा बहुदा महाराष्ट्रातील सर्वात विस्तीर्ण गिरीदुर्ग असावा. मुख्य गड नरनाळा या नावाने ओळखल्या जात असून जाफराबाद नावाचे दोन उपदुर्ग पूर्व-पश्चिमेला आहेत.

किल्ल्याबद्दल

गडाच्या प्रवेशाला 5 दरवाजे लागतात त्यांवरून या गडाच्या सुरक्षा व्यवस्थेची कल्पना यावी. सर्वात आधी शहानुर दरवाजा, मग मोंढा दरवाजा, त्यानंतर अत्यंत सुरेख कलाकुसर असलेला महाकाली दरवाजा, असे करीत आपण गडावर पोहोचतो. गडाच्या मध्यावर सक्कर तलाव नावाचा विस्तीर्ण जलाशय आहे. याला बारमाही पाणी असते. हा तलाव याच्या औषधी गुणांकरिता पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.

तेल्हारा

तेल्हारा या गावच्या बाहेर दत्तवाडीला दत्ताचे एक देऊळ आहे. येथे दर दत्तजयंतीला यात्रा भरते.

गावातून एक पावसाळी प्रवाह असलेली गौतमा नावाची छोटी नदी वाहते. ही पूर्णा नदीची उपनदी आहे. नदीच्या प्रवाहाच्या मध्यात आणि गावाच्या दक्षिणेकडे गौतमेश्वराचे देऊळ आहे. तेथील शिवलिंग फार पुरातन आहे. गावातील लटीयाल भवानी मंदिर, विठ्ठल मंदिर, दुर्गादेवी, मारोती मंदिर, गजानन महाराज मंदिर, महानुभाव पंथी कृष्ण मंदिर या सर्व प्रसिद्ध देवस्थानांसाठी तेल्हारा अकोला जिल्ह्यातील विशेषत्वाने ओळखले जाते.

पातुर

पातूर येथे वाकाटककालीन लेण्या आहेत. त्या अजिंठा पर्वतरांगेतील डोंगरात तयार करण्यात आलेल्या आहेत. या गुंफासदृश्य आहेत. येथे कोरीवकामही सुरेख आहे पण सद्यस्थितीत या लेण्या उपेक्षित आहेत. विदर्भावर तिसऱ्या व चौथ्या शतकातील वाकाटक घराण्यातील शेवटचा राजा हरिषेण याने त्याच्या वराहदेव या प्रधानाकडून त्या तयार करवल्या असे सांगण्यात येते. दुसरे मत असे आहे की, त्या पहिल्या ते चौथ्या शतकात कोरल्या गेल्या आहेत.

कारंजा-सोहोळ अभयारण्य

हे अभयारण्य अकोला जिल्ह्यातील सुमारे 18 चौ. कि.मी. क्षेत्रावरील छोटेसे अभयारण्य. मुक्त वन्यजीव संचार असलेले अभयारण्य, स्थलांतरित पक्ष्यांचा मुक्काम असलेला ऋषी तलाव अन् कारंजाचे गुरू मंदिर असा तिहेरी संगम या सहलीत साधता येतो.

कारंजा सोहोळ काळवीट अभयारण्याची निर्मिती मुळात शहरानजीकच्या शेतजमिनीवर हुंदडणाऱ्या काळविटांना हक्काचे आश्रयस्थान देण्याच्या उद्देशाने झाली. इ.स.वी. सन 2000 साली राज्य शासनाने या अभयारण्याची घोषणा केली. कारंजा परिक्षेत्रातील कारंजा, गिर्डा, दादगाव सोमठाणा या नियतक्षेत्रातील हजार 781.40 हेक्टर वनक्षेत्राचा अभयारण्यात समावेश करण्यात आला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी कारंजा यांच्याकडे अभयारण्याचे व्यवस्थापन आहे. अभयारण्याच्या दक्षिण बाजूने अडाण नदी वाहते, तर पूर्वेकडे यवतमाळ जिल्ह्याची सीमा असून, पश्चिमेस मंगरुळपीर तालुक्याची सीमा आहे. हे अभयारण्य अजिंठा डोंगराच्या परिसरात बहरले असून, अडाण नदीचे पाणी अभयारण्यासाठी वरदान ठरले आहे. या अभयारण्यात काळविटांसह नीलगाय, रानडुक्कर, तडस, कोल्हा, रानमांजर, ससे, मोर, सायाळ, मुंगूस, मसन्याऊद आदींचे दर्शन घडते. तसेच पक्षी प्रजातींचेही वास्तव्य आहे. यामध्ये मुख्यत्वे सर्पगरुड, माळ टिटवी, दयाळ, स्वर्गीय नर्तक, सोनपाठी सुतार, मराठा सुतार, हळद्या, कोतवाल, कवड्या, डोमकावळा, वेदराघू, खाटीक, चंडोल, राखी वटवट्या, तितर, बटेर आदींसह सुमारे 145 पक्ष्यांचे दर्शन घडते. अभयारण्यात मुख्यत्वे पळस, खैर, बेहडा, कळंब आदी वृक्ष प्रजाती आहे.

गवताळ प्रदेश

मोठी गवती कुरणे अलीकडे लुप्त झाल्याने त्यांचे त्यांच्यावर गुजराण करणाऱ्या प्राणी, पक्ष्यांचे दर्शन घडत नाही. मात्र, कारंजा सोहोळ अभयारण्यात गवताळ प्रदेश मोठ्या प्रमाणावर असल्याने या ठिकाणी अनेक पशुपक्ष्यांचा अधिवास आहे. तसेच जंगल फारसे दाट नसल्याने नीलगायींचे कळप, काळविटांचे कळप, रानडुक्कर आदींचे दूरवरून दर्शन घडते. अभयारण्यास भेट देण्यासाठी अकोला वन विभाग किंवा वनपरिक्षेत्र अधिकारी कारंजा यांच्याशी संपर्क साधावा. तसेच अभयारण्यानजीक ऋषी तलाव असून, या तलावावर हिवाळ्यात पाहुण्या पक्ष्यांचा मुक्काम असतो. यामध्ये मुख्यत्वे रंगीत करकोचे, उघड्या चोचेचा करकोचा, चम्मचचोचे, सँडपायपर, नकटा, ब्राम्हणी डक, स्पॉटबिल डक आदींसह अनेक पक्ष्यांचे निरीक्षण करता येते.

मुर्तिजापुर

डेबू अर्थात संत शिरोमनी गाडगेबाबा यांचे बालपण मुर्तिजापूर येथे त्यांच्या आजोळी गेले. संतांच्या पदस्पर्शाने पुनीत मुर्तिजापुर संत पुंडलिक महाराज यांची भूमी म्हणूनही प्रसिद्ध आहे. येथील पुंडलिक नगर येथे संस्थानचे पुंडलिक महाराज मंदिर आहे. परिसरातील भाविक मोठ्या भक्तिभावाने मंदिरास भेट देतात.

बाळापुर

बाळापुर हे मुघलांचे एलीचपुर(अचलपुर) नंतरचे महत्वाचे सैन्य दलाचे केंद्र बनले होते. अकबर पुत्र राजकुमार मुरड 1596 साली बेरारचे मुख्यालय असलेल्या बाळापुर येथेच स्थायिक झाला. त्याने बाळापुर पासून नजीक शहापुर येथे स्वतःसाठी एक सुंदर राजवाडा उभारला जो सद्यस्थितीत फारसा सुस्थित नाही. 1757 साली इस्माइल खान नबाब यांनी बाळापुरच्या भव्य किल्ल्याची उभारणी केली होती. किल्ल्यात संत मौलवी मासूम शाह यांची समाधी आहे. एक भव्य ऐतिहासिक किल्ला दुर्लक्षिला गेल्याचे आढळते.

बाळापूर येथील मिर्झाराजे जयसिंगाची पाच घुमटांची छत्री प्रेक्षणीय आहे.

अकोला शहर

नेहरू पार्क

बच्चा कंपनी आणि कुटुंबियांसह प्रेमी युगुलांचे आकर्षण असलेले नेहरू पार्क अकोला वासियांची सुटीची संध्याकाळ अधिक रम्य करते. येथील लाकडी पुल, संगीताच्या संगतीने नाचणारे रंगीबेरंगी पाण्याचे कारंजे, फुलबागा, गर्द झुडपं, लहान मुलांची आकर्षक खेळणी सारे काही लोभसवाने !

अशोक वाटिका

बुद्ध धर्मियांचे धर्मस्थळ असलेले अशोक वाटिका शहराच्या मध्यवर्ती स्थित असून येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे पुतळे आहेत. शहरवासी येथे प्रार्थनेसाठी जमतात.

डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ

1960 च्या दशकात महाराष्ट्र शासनाने राज्यात कृषी विद्यापीठांची स्थापना करण्याचे नियोजित होते त्यावेळी अकोला हे अशा विद्यापीठासाठी उपयुक्त आणि सोयीचे ठिकाण होते कारण 1905 पासून स्थित कृषी महाविद्यालय अकोल्यात अस्तित्वात होतेच. मात्र काही राजकारण्यांच्या मते हे विद्यापीठ पश्चिम महाराष्ट्रात राहुरी येथे स्थलांतरित होणे अपेक्षित होते. 17 ऑगस्ट 1967 चा विदर्भ तसेच अकोलावासीयांचा संघर्ष आणि पोलीस गोळीबारात मोर्च्यातील 9 विद्यार्थ्यांचा मृत्यू; या आहुतीची प्रचिती 20 ऑक्टोबर 1969 साली अकोल्याच्या कृषि विद्यापीठात झाली ज्याचे नामकरण विदर्भपुत्र भारताचे कृषीमंत्री डॉ.पंजाबराव (उपाख्य भाऊसाहेब) देशमुख कृषि विद्यापीठ असे करण्यात आले. विदर्भातील या कृषी विद्यापीठाचा मुख्य परिसर अकोला येथे असून दरवर्षी येथे विद्यार्थी कृषी शाखेतील निरनिराळ्या उपशाखांमधुन शेतीचे तांत्रिक आणि प्रत्यक्ष शिक्षण घेतात. या परिसरातील हिरवीगर्द वनराई, फळझाडे, कधी नीरव शांतता तर कधी पक्षांचे गोड गुंजन मनास भावते ! या परिसरात फिरण्याची मौज काही निराळीच कारण शरीरासह मनालाही प्राणवायु देणारी अजब जादू ईथे आहे.

मंदिरे

हरिहरपेठ हे जुन्या शहर परिसर भागात असून इथे जुनी वस्ती आहे. येथील पुरातन विठ्ठल मंदिर फार प्रसिद्ध आहे. अकोल्यातील राजराजेश्वराचे मंदिरातील शिव हे अकोल्याचे ग्रामदैवत असून श्रावण महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. येथील लोकं पूर्णा नदीवरून कावडीने पाणी आणून मंदिरातील शिवलिंगावर अभिषेक करतात. याशिवाय येथील जलाराम मंदिर, बिरला मंदिर, बारा ज्योतिर्लिंग मंदिर, बालाजी मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, राणी सती धाम, जैन मंदिर, गुरुद्वारा, खटु श्याम मंदिर भाविकांची सहिष्णु शक्ती स्थळे आहेत.

अकोला जिल्ह्यात गाविलगड व अजिंठ्याच्या डॊंगरराळ भागात जास्त वने आहेत. वनात साग, ऐन, खैर, अंजन, इत्यादी वृक्ष आढळतात. तसेच मोर, रानकोंबडा, इत्यादी पक्षीही वनांत आहेत. पातूर तालुक्यात साग, चंदन, आढळते तसेच चारोळीचे उत्पादनही होते. मोर्णा आणि काटेपूर्णाच्या जलाशिर्वादाने पावन अशा अकोला शहर आणि जिल्हाची भटकंती आपणास नक्कीच भावली असेल !

लेखन आणि संकलन - तृप्ती अशोक काळे

नागपुर, मोबाईल- ८२७५५२१२६३

माहिती स्रोत:महान्युज

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate